हरिण

 

माणसाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जसे अविर्भाव चेहऱ्यावर दाखवता येतात, तसेच काहीसे सर्व प्राण्यांच्या चेहेऱ्यावर कायमस्वरूपी कोरल्यासारखे वाटतात. सरसकट कायमस्वरूपी नाही म्हणता येणार, पण बहुतांश प्राणी-मात्रांसाठी मात्र आपण असं म्हणू शकतो. अर्थात यासाठी निरीक्षण आणि त्या प्रजातीचे वर्तन (behavior) माहीत असणे आवश्यक आहे. चिमणीपासून ते अगदी हत्तीपर्यंत आपण हे अविर्भाव अनुभवू शकतो. चला तर मग, एक फेरफटका मारून येऊ, बघू काय काय दिसतं ते!

सकाळी सहाच्या सुमारास टेकडीवर किंवा जंगलामध्ये चक्कर टाकायला सुरुवात केली की, आपल्याला सर्वप्रथम जाणवते ती शांतता. तेव्हाच्या स्थितीवरून आपण अंदाज लावतो सुद्धा की, आज खूप प्रसन्न वातावरण आहे किंवा आज खूप मरगळल्यासारखं का वाटतंय बरं... हळूहळू उजाडायला लागतं, तसं तसं ही शांतताभंग होऊ लागते. किंबहुना जंगलाला जाग येऊ लागते, हे म्हणणं उचित ठरेल. छोट्या छोट्या पक्षांच्या किलबिलाटाने याची सुरुवात होते. सातभाई (Jungle babblers) किमान ७-८ च्या संख्येने इकडून तिकडे कलकलाट करत हिंडत असतात. यांच्या चेहेऱ्यावर कायम गोंधळलेले किंवा वैतागल्यासारखे भाव असतात.

कोतवाल

कोतवाल (Drongo) जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा तो कायम दरडावण्याच्या तयारीत दिसतो. म्हणूनच बहुदा त्याला ‘कोतवाल’ म्हणत असावेत. अनेक पोपट (Rose ringed or Plum headed parakeet) उडताना दिसतात, ते तर सदानकदा चिडल्यासारखेच दिसतात. पोपट असो वा पोपटीण. भाव तसेच कायम. अनेक माशिमार (Flycatchers) सदैव लगबगीत दिसतात.

स्वर्गीय नर्तक :सौजन्य - मंदार मोटे

स्वर्गीय नर्तक (Asian paradise flycatcher) मात्र अंघोळ करून उन्हात एखाद्या फांदीवर बसला असेल तर मात्र त्याचा डौल पाहण्यासारखा असतो. एखाद्या अतिशय राजबिंड्या आणि देखण्या राजपुत्रासारखा भाव चेहेऱ्यावर असतो. मोर सतत खाली मान घालून काहीतरी टिपत असतो. याला पाहिल्यावर याला राष्ट्रीय पक्ष्याचा योग्य मान देऊन गौरवण्यात आलं आहे असं वाटून जातं.

पिंगळे

मधूनच पिंगळे ( Jungle/ Spotted owlet ) ओरडायला लागतात. ते असतात कुठेतरी समोरच, पण काही केल्या पटकन दिसत नाहीत आणि नजरेस पडले की, ते आपल्याकडेच त्रासिक नजरेने पाहत असतात. त्यांची ही नजर पाहिली की मला पुलंचं वाक्य आठवतं, “काय शिंची कटकट आहे." जणू काही हेच त्यांना नजरेतून सांगायचं असत. एक तर हे पिंगळे असतात १८ ते २० सें.मी.चे आणि त्यातून camouflage झालेले असतात. त्यांना शोधता शोधता बऱ्याच जणांवर, “काय शिंची कटकट आहे, कुठे बसलंय ते owlet" हे म्हणण्याची वेळ येते.  

जरा कोवळं उन अंगावर यायला लागलं की, हरणांचे आणि सांबरांचे कळप दिसू लागतात. आपली चाहूल लागली की, एकदम अलर्ट होऊन पाहायला लागतात. त्यांच्या नजरेत कायम भीतीदायक भाव दाटून आलेले असतात आणि त्यातून जवळ एखादं पाडस असेल तर मात्र संपलंच. साहजिकच आहे म्हणा ते. मला कायम वाईट वाटतं हे पाहून. बघा ना, दिवसातला प्रत्येक क्षण त्यांना सावध राहावं लागतं, वाघ आणि बिबट्याच्या भीतीने. कळपामधली एखाद्याची शिकार होताना पाहायची आणि आपल्याला अजून एक दिवस मिळाल्याचा सुस्कारा सोडायचा. चरायला बाहेर पडताना त्यांच्या मनात नक्की येत असेल की आज कोणाचा शेवटचा दिवस?? फार अवघड आहे हे जीवन. ही अशी क्षणाक्षणाला असणारी काळजी जर माणसाच्या नशिबी आली तर? विचार करून पाहा बरं काय उद्ध्वस्त होईल आयुष्य !

 

 

-अमोल बापट 

[email protected]