विद्यार्थ्यांना विज्ञान अध्ययनात अभिरुची वाटावी.शालेय विज्ञान शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे. विज्ञानाच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, भूर्गशास्त्र, शेतीशास्त्र इ. विविध शाखा आहेत. या विविध शाखातील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे, त्याचे आकलन चांगले व्हावे आणि त्या शास्त्रात विद्यार्थ्यांनी पुढचे पाऊल आणखी पुढे टाकावे अशी आपण अपेक्षा करतो. ही अपेक्षा पूर्ण करताना पुढील पायऱ्या विचारात घ्याव्या लागतील.

  1. वैज्ञानिक सिद्धांताचा बोध सुस्पष्ट व्हावा.

  2. वैज्ञानिक तत्वांची परिभाषा विद्यार्थ्यांना कळावी.

  3. कार्य – कारण भाव (वैज्ञानिक दृष्टीकोन) हा संपूर्ण आधुनिक विज्ञानाचा पाया आहे हे विद्यार्थ्यांना समजावे. मनात रुजावे.

  4. दैनंदिन व्यहारात वैज्ञानिक संकल्पनाचे बोध व्हावेत.

या संदर्भात ज्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात त्याबद्दल विचार करू या. प्रत्यक्षात असे अनुभवास येते की, विद्यार्थ्यांना शास्त्र विषयाचे आकलन नीट होत नाही, त्यामुळे त्यांना या विषयाची अभिरुची वाटत नाही. परिणामी विद्यार्थी विज्ञानाची विविध अंगे पूर्णपणे अभ्यासात नाहीत. विज्ञानाची आवश्यक तेवढी जान असलेले सुज्ञ विद्यार्थी अभावानेच तयार होतात. मुलभूत संशोधनाकडे विद्यार्थी वळत नाहीत. या वास्तवाचा अभ्यास करताना, पाठ्यपुस्तके आणि विज्ञान शिक्षणातील मुलभूत बोधीय अडचणी लक्षात घेऊ या.

भारताच्या शालेय शिक्षण यंत्रणेत पाठ्यपुस्तकाचे स्थान मध्यवर्ती आहे. अभ्यासक्रम म्हणजेच पाठ्यपुस्तके असे सर्वसामान्य समीकरण झाले आहे. पाठ्यपुस्तकांबरोबर इतर साधणे आणि मार्ग अवलंबून शिक्षणाचे अनेक चांगले प्रयोग झाले आहेत. उदा. एकलव्य विज्ञान शिक्षण प्रकल्प, पुण्याजवळ पाबळ येथील विज्ञानाश्रम इ. पण मोठ्या प्रमाणवर मात्र शालेय शिक्षणात पाठ्यपुस्तकांचे महत्त्व आपल्याला कमी करता आलेले नाही. मग पाठ्य्पुस्तकांकडेच देशात शैक्षणिक क्रांतीचे साधन म्हणून का स्वीकारू नये? दर १० – १२ वर्षांनी नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार होतात. खऱ्या अर्थाने चांगली आणि सुंदर पुस्तके आजही उपलब्ध होऊ शकली नाहीत.

शालेय स्तरावर एक अत्यंत चांगले विज्ञान पुस्तक लिहिण्यास जे परिश्रम आणि जी योग्यता लागते ती साधारण एका आंतरराष्ट्रीय पत्रिकेतून ५ – १० संशोधन लेख छापून घेण्याइतकी असते.

भारतात शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्धिष्ट म्हणजे ‘शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण’. यापासून आपण फार लांब आहोत. याचे कारण आहे कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम तसेच शैक्षणिक प्रेरणा आणि संधी यांच्यातील अभाव.

‘सर्वांची शिक्षणासाठी समान पात्रता असते’ हे कोणत्याही अभ्यासक्रमाचे मुलभूत तत्व असायला हवे. आपल्याकडे खऱ्या अर्थाने ते रुजलेले नाही आणि प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकात त्याची अभिव्यक्ती पूर्णतः झालेली नाही. विद्यार्थ्यांचे निरीक्षण, स्मरण आणि आकलन प्रबळ होईल अश्या कृतींची योजना पुस्तकात जरूर हवी आहे.

मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासावरही योग्य मार्गदर्शन देणे अभ्यासक्रमात आवश्यक आहे. याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे ‘भाषा’ तर्कशुद्ध भाषा समजणे हीसुद्धा विद्यार्थ्यांना भेडसावणारी समस्या आहे.

गेल्या ४ – ५ दशकात शिक्षणतज्ञांनी विज्ञानविषयक सार्वत्रिक चुका किंवा भ्रामक कल्पना यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. व्यहारिक भाषा लवचिक असते आणि तांत्रिक भाषा काटेकोर आणि संकुचित असते. हा फरक विद्यार्थ्यांना चुका किंवा भ्रम निर्माण करतो. उदा. मुलाने चेंडू वेगाने फेकला या वाक्यात वेग या संज्ञेऐवजी बल, उर्जा, शक्ती,  वगैरे संज्ञा घातल्या तर व्यहारात अर्थ फारसा बदलत नाही. परंतु भौतिकशास्त्रात हि प्रत्येक संज्ञा भिन्न आहे.

हा भ्रम किंवा अभास मनामध्ये नको व्हायला यावर इलाज म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्ट्या निर्दोष कल्पना रुजविणे. इथे गॅलिलिओ व न्यूटन यांनी दाखविलेला प्रयोगांनी सिद्धांत सिद्ध होता हा मार्ग स्वीकारायला हवा. हा आधुनिक विज्ञानाचा पाया आहे.

थोडक्यात विज्ञान शिक्षणाचे वास्तव आणि अपेक्षा यांची सांगड घालण्याचा प्रयत्नातील महत्त्वचा टप्पा म्हणजे तळमळीच्या आणि उत्साही शिक्षक, पालक आणि इतर संशोधकांचा सहभाग हाच आहे.

रेखा मुळे