उन्हाळा आणि आंबा- फणसाची मजा
 
उन्हाळा सुरू झालाय. वातावरणातला उष्मा वाढलाय. सतत  गोडसर थंडगार काही तरी प्यावंसं वाटतयं हो ना? मस्त माझा प्यावा किंवा मॅगो-मस्तानी प्यावीशी वाटते. आईस्क्रीमच्या दुकानामधे जाऊन मॅगो आईसक्रीम विथ रियल मॅगो खावा वाटतो. अगदी बरोबर!
आंबा म्हणजे सगळ्यांचं आवडतं फळ. फळांच्या या राजाची शानच काही वेगळी. भरपूर प्रतीक्षा केल्यावर खायला मिळणाऱ्या या फळाची चव मात्र वर्षभर लक्षात राहाते. 
पण आपल्या आवडत्या आंब्याबद्दल आपल्याला फार माहिती नसते. 
महाराष्ट्रात प्रामुख्याने आंबा पिकतो, तो कोकणात. कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणच्या आंब्याची चव वेगळी असते. रायगड जिल्ह्यातील वेगळा रत्नागिरी हापूस किंचित जाड सालीचा. देवगड हापूस घट्ट रसाचा आणि पातळ सालीचा, चवीला गोड असलेला. त्यातही भर जमिनीचा गोडीला कमी. कातळावर वाढलेला आंबा अधिक गोड बंदराकडेचा किंचित खारट. 
राजापूरचा आंबा म्हणजे मोठं दांडग फळ. किंचित रेषेदार, पण चव रत्नागिरी हापूसला मागे टाकेल अशी. गोव्याचा आंबा माणकूर. चवीला एकदम निराळा, पण थोडा उशिरा तयार होणारा. 
याशिवाय केशर, पायरी, खोबऱ्या, शेंदऱ्या अशा कितीतरी स्थानिक जाती आढळतात, त्या वेगळ्याच आणि त्यांच्या चवीही वेगळ्या. 
माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या म्हणजे मे महिन्याच्या सुटीचं मुख्य आकर्षण म्हणजे आंबा हेच असे. 
माझ्या आजोळी चिपळूणला रत्नागिरी हापूस खूप मिळे. मामा तो विकत घेत असे. घरच्या अंगणात दोन हापूसची कलमं होती. तिचा आंबा उतरवून अढीत पिकायला घातलेला असे. शेतात दोन रायवळ आंब्याची उंच झाडं होती. त्याचे आंबे पडले की आम्ही ते वेचायला धूम पळत असू. रायवळचा रस अतिशय पातळ असे. चव गोड पण थोडी चिकाची चव लागे. दारावर हा आंबा विकायला कातकरणी येत. त्यांच्याशी शेकड्याचा भाव ठरवून मामा टोपल्या भरभरून तो आमच्यासाठी घेई 
मग काय आमची आंबा मेजवानी सुरू होई. मागीलदारच्या डोणीपाशी हा आंबा खाण्याचा कार्यक्रम रंगे. टोपलीतला आंबा डोणीतल्या पाण्यात धुवायचा देठ काढून चिक जमिनीवर पिळायचा की खादाडी सुरू. आंब्याचे ओघळ पार कोपरापर्यंत जायचे. मग कपडे खराब होतं. त्यामुळे आमची वानर सेना आदी मानवासारखी कमी कपड्यात आंबा भक्षण कार्यक्रम पार पाडे. अढीत पिकणारे आंबे हे आल्यागेल्या तालेवार पाहुण्यांना फोडी करून दिले जातं. रसाला पायरी वापरली जाई. टोकाला छोटं नाक असलेल्या देवगड पायरीचा रस साखरेसारखा लागे. मामीचं माहेर राजापूरचं, तिकडून राजापुरी आंबा येई. पण तो आळशी आंबा कित्येक दिवस पिकतच बसे. पार शाळा चालू होतं, आल्या तरी काही आंबे अगदी ढिम्म पिकत नसतं. 
कोळथऱ्याची मावशी खोबऱ्या आंबा आणे. तो असे भला-थोरला पण हिरवा आणि चवीला अगदी खोबऱ्यासारखा. आंजर्ल्याचे आजोबा एके दिवशी येतं, तेव्हा शेंदऱ्या आंब्याची एक पेटी, वेलची केळी, नारळं, कोकमं आणि पिके अळू आणत असतं. त्यातल्या शेंदऱ्या आंब्याची चव किंचित खारट लागे. 
आंब्याच्या या दिवसात त्या वेळी आम्हा मुलांना घरोघरी संध्याकाळी खास आंबा खाण्यासाठी आमंत्रण असे.
आमच्या आळीत एक भडवळ्याच्या आजी होत्या त्या भडवळे, कराड आणि सांगली इथला त्यांचा घरचा आंबा आणत. आंबा तयार झाला की, एक दिवस आमंत्रण मिळे. मग मागील दारच्या अंगणात चटईवर आमची आंबा पार्टी रंगे. आजी एरवी फार कडक होत्या. पण या दिवशी मात्र त्या अगदी प्रेमाने, सुरेख फोडी करून देत, अनेक चवीचे आंबे खाऊ घालत. 
मागील आळीतल्या गद्र्यांकडे देवगड हापूसच बोलावणं मिळे. मळ्यावरली आजी रत्नागिरी हापूस खाऊ घाली. तर जोग वहिनींकडे त्यांच्या दारच्या आंब्याची मेजवानी असे. बाकी आज इथे तर परवा तिथे अस जवळजवळ रोजचं कोणा ना कोणाकडे बोलावणं ठरलेलं. सरते शेवटी सांवतांच्या घरचं गोव्याच्या आंब्याचं बोलावण आलं की, आमचे आंब्याचे दिवस सरल्याची जाणीव होई. 
आजकाल मात्र असा चवीचवीचा स्थानिक आंबा तर खायला मिळत नाहीच, पण इतक्या आपुलकीने आपल्या घरचा आंबाही कोणी खायला घालीत नाही. मुलांना मान देऊन कौतुकाने विविध चवींची आेळख करून देणाऱ्या त्या आंबा पार्ट्या बहुदा आमच्याकडेच होतं असाव्यात असं आत्ता वाटतं. त्या वेळी  मात्र हे काही वेगळं आहे असं मुळीच वाटलं नव्हतं. 
कापा आणि बरका खाण्याचे कौशल्य , आंबा चोखून आणि कापून खाण्याचे कौशल्य
आंब्याच्या दिवसात आंब्याच्या जोडीला इतर फळांची भरपूर रेलचेल असे. त्यात फणसाचा नंबर आधी लागे. कापा आणि बरका दोन्ही प्रकारचे फणस भरपूर खाता येत. काप्याचे गोड गरे एकदा सोलून तुकडे करून पुढ्यात आले की, सहज चावून खाता येतं. पण बरका फणस म्हटला की, आम्ही तो फोडायच्या आधीच तिथून पोबारा करत असू. पिकलेला फणस सहज हाताने फोडता येई. गरे पण पटापट सुटत काप्यासारखी त्यांच्याशी झटापट करावी लागत नसे. 
पण ते रसाळ गरे गिळणं ही एक कलाच होती. बरक्याचा गरा अलगद गिळून आठीळ बाहेर काढणं ज्याला जमे त्याचं फार कौतुक होई. बरका फणस लागे ही भरपूर. अगदी बुंद्यापासून फणस धरतं. फणस लगडलेलं ते लेकुरवाळं झाडं मोठं सुरेख दिसे. आमच्या मागीलदारच्या अंगणात अशी दोन बरक्याची सुरेख झाडं होती. काप्या फणसाची झाडं मात्र काहीशी उंच. त्याला फणसही फार उंचावर लागतं. 
पण कापा पिकेपर्यंत पावसाळ्याचे दिवस जवळ येतं. मग १३ जूनला घरी जाताना आजीने दिलेल्या जिनसांत काप्याचा एक हिरवा डाग हमखास असे. त्याचे इवले काटे सगळ्या प्रवासात टोचून टोचून सोबत करत. 
रातांबे म्हणजे कोकम फळं, तोरणं, भोकरं हेसुद्धा उन्हाळी सुटीचे साथीदार. जांभळं, करंद आणि अळू ही तालेवार आणि नाजूक फळं. यातली जांभळं, करवंद शहरात सररास बघायला मिळतात. पण अळू खास कोकणी फळ. गाभूळलेल्या चिंचेच्या रंगाचे गुळमट अळू, अळवीणीवरून दगड भिरकवून पाडण्यात आम्ही कितीतरी दुपारी घालवल्यात. ताजी फळं खाण्यातली मजा तर लुटलीच. त्या वेळी पण ती फळं वाळवून त्यांची आेसरी करून ती मुंबईत आल्यावर खाताना आजीच्या चिपळूणच्या आठवणीत रंगण्यातही बऱ्याच दुपारी वेचल्यात. 
सृष्टी नियमाने येणाऱ्या या चैत्र-वैशाखांत अशी ही फळांची सय पुन्हा ताजी होते आणि रंग-गंधाच्या हिंदोळ्यावर झुलवत अलगद कोकण फिरवून आणते. 
-मैत्रेयी केळकर