कोकणातील घरं

आठवणींच्या आधी जाते, जिथे मनाचे निळे पाखरू

खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू....

उन-पाऊस या गाजलेल्या मराठी चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या की, माझं नेमकं असच व्हायचं. शेवटचा पेपर संपतोय कधी आणि मी गाव गाठतेय कधी असंच व्हायचं मला. पेपर संपला की त्याच दिवशी रात्री एस.टी. पकडून आजीबरोबर तिच्या भावाकडे, म्हणजे बाबांच्या आजोळी जायचं आणि सुट्टीचा आनंद घ्यायचा हा आमचा अलिखित नियम होता.

रात्रीची गाडी पकडून आम्ही गावी जायचो. पहाटे पहाटे कधीतरी जाग यायची आणि दिसू लागायची. रस्त्याच्या कडेला दिमाखात उभी असणारी लाल चिऱ्याच्या दगडी बांधणीची घरं. हा चिरा पाहिला की मन साद घालायच, पोचलो रे....! कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला चिऱ्याच्या दगडाने बांधलेली घरं आढळतात. याचं मुख्य कारण म्हणजे कोकणात असणाऱ्या चिऱ्याच्या खाणी आणि त्यामुळे दगडांची असणारी उपलब्धता. या दगडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बांधलेल्या घरात उन्हाळ्यात शीतलता असते आणि थंडीत ऊब असते. त्यामुळे हवेत भरपूर आर्द्रता असलेला घामाघूम करणारा उन्हाळा कोकणात सुसह्य होतो.

रात्रभर झोपून प्रवास केल्यानंतर जागेपणीचा तो एक तास नकोसं व्हायचं. गडग्याजवळ नेहमीप्रमाणे मामी, आजी वाट पाहत असायची. गडगा म्हणजे घराला घातलेल दगडी कुंपण. गुरं-ढोरं आत येऊ नये म्हणून हे कुंपण घातलेलं असत. आत गेलं की सगळ्यात आधी डोणीवर जाऊन पाय धुवायचे. आजोबांच्या घरी मागच्याच अंगणात (कोकणात याला खळं म्हणतात) एक मोठी विहीर होती. त्या विहिरीला लागूनच दगडी न्हाणीघर म्हणजे बाथरूम होत. तिथे ही डोणी होती. द्रोणाच्या आकाराची म्हणून द्रोणी, पुढे अपभ्रंश होऊन डोणी हा शब्द तयार झाला, असं मी पुढे केव्हातरी ऐकलं.

कोकणातल्या अनेक घरात विहिरींमध्ये हात रहाट आणि पाय रहाट असे दोन प्रकारचे रहाट दिसून येत. आमच्या गावी सुरुवातीला दोन्ही प्रकारचे रहाट होते. हात रहाट म्हणजे आपण टी.व्ही.वर पाहतो तो हाताने ओढून पाणी काढायचा रहाट आणि पाय रहाट म्हणजे विहिरीच्या अगदी कडेला लागून असणाऱ्या एक फळीवर बसून हात आणि पाय दोघांनी मिळून ओढायचा रहाट. या पाय रहाटाला मातीची गाडगी म्हणजे छोटी मडकी बांधलेली होती. त्यात पाणी जमा व्हायचं आणि एका पन्हाळीतून डोणीत पडायचं. हे सगळं पाहिल्यावर तंत्रज्ञान फक्त शहरातच असतं हा माझा गैरसमज पुसला गेला. रहाटाचा आणखी एक दुर्मीळ प्रकार मी कोकणातल्या एका गावात पाहिलाय. त्याला ओकती म्हणतात. एका मोठ्या बांबूच्या खालच्या टोकाला कळशी बांधलेली असते. या बांबूला ९० अंश कोनामध्ये दूर एक बांबू जोडलेला असतो. हा दुसरा बांबू वरवर सरकवत नेला की कळशी खाली जाते आणि बांबू खाली ओढला की ती कळशी भरून वर येते.  


दगडांच्या देशा असं महाराष्ट्राला म्हटलं जातं याचा पुरेपूर प्रत्यय आपल्याला कोकणात येतो. बघा नं आतापर्यंत आपण जेवढ्या गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या दगडाच्या किंवा मातीच्याच तर होत्या. आधुनिक तंत्रज्ञानाने कोकणात शिरकाव केला असला तरी मातीशी असणारी ही नाळ कोकणाने टिकवून ठेवली होती. म्हणूनच तर मिक्सरने मसाला वाटला जात असला तरी जेवणाला खरी चव आजीने पाट्यावर वाटलेल्या मसाल्यालाच यायची. इकडे खायला कुरकुर करणारी मी तिकडे पानात पडेल ते अगदी ओरपून जेवायचे.


जातं... आपण हे फक्त हल्ली सिनेमात पाहतो. कारण पीठ तर चक्कीवरूनच येतं आपल्या घरी. पूर्वी मात्र रोजच ताज पीठ दळून घेऊन स्वयंपाक करायची पद्धत होती. या जात्याचेही वेगवेगळे प्रकार कोकणात आढळतात. पहिला प्रकार म्हणजे जातीण अर्थात जातं. ज्यावर धान्य दळून पीठ, रवा, भरड केली जाते. धान्य किती प्रमाणात घातलं जातं आणि कसं फिरवलं जातं यावर ठरत त्याचं काय होणार ते.. पीठ, रवा की भरड. दुसरा प्रकार म्हणजे घिरट. यावर भाताची (न सोललेल्या तांदुळाची) फोलपट काढली जातात. आमच्या घरात काही दगडी भांडीही होती. साठवण केलेलं मीठ, लोणचं रोजच्या वापरासाठी काढून घ्यावं लागायचं. त्यासाठी बाउलसारखी ही भांडी वापरली जात. दगडांचा हा असाही वापर तिकडे होतो.

कोकण, तिथली संस्कृती इथेच संपत नाही. अजून खूप गोष्टी आहेत. कोकणातलं घर, स्वयंपाकघर, अंगण, तिथल्या वापरातल्या अन्य काही वस्तू, तिथल्या माणसांचा नारळासारखा गोडवा, फणसासारखा रसाळपणा. त्याविषयी पुढच्या लेखात बोलू या. तोपर्यंत मज्जा करा, खूप आंबे खा, खेळा, वाचा, आनंद घ्या आणि आनंद द्या.....

 

  

-मृदुला राजवाडे

-[email protected]