पालकत्व
माझी मुलगी मला विचारत होती, "आई, मी बाळ होते त्याआधी कुठे होते? मी आधीच का नाही आले तुझ्याकडे? " मी नेहमीप्रमाणे उत्तर दिलं  की , "बाप्पा, म्हणाला तुमची तयारी नाही झाली अजून आई-बाबा व्हायची. म्हणून तुला देतच नव्हता किती दिवस तो आमच्याकडे. " हे उत्तर तिला पटलं, पटायचं.
म्हटलं तर, हे उत्तर मी तिला नेहमीच द्यायचे . पण आज अचानक अजून एक किस्सा घडला.  तो असा -
 
माझी मुलगी सुटीतला उपक्रम म्हणून दिवसभराच्या खेळानंतर संध्याकाळी नेहमी प्रमाणे ५ ओळी लिहायला बसली होती. आणि सुदैवाने आज तिचा बाबा ऑफिसातून लवकर आला होता. त्यामुळे त्याला तिच्या बाजूला बसून तिच्याकडून या ओळी लिहून घ्यायचं काम आपसूकच लागलं होतं. तेवढ्यात त्याने टीव्हीचं बटन दाबलं. त्यावर ती बाबाला म्हणाली, "बाबा, आज माझा अभ्यास घ्यायची जबाबदारी तुझी आहे." वय वर्षे ५ पूर्ण असलेल्या मुलीने हे म्हणत बाबाकडे कटाक्ष टाकला.
 
एकतर या प्रसंगातले हे तिचे बोलणे वयानुसार पुढचं होतं. वर ती ते कुठून शिकली हा प्रश्न विचारणंही चुकीचंच होतं. कारण मुलं आपलं बोलणं ऐकत असतात आणि आपल्याकडूनच खूप काही शिकत असतात. लहानवयात त्यांची दृकश्राव्य पद्धतीने ग्रहण करण्याची क्षमता सर्वाधिक असते. पण या प्रसंगातला तिने वापरलेला 'जबाबदारी' हा शब्द मला विचार करायला लावणारा ठरला.
 
आधी सांगितलेल्या किस्स्यात, 'आई-बाबा म्हणून तयारी पूर्ण झालेली नसणे' आणि नंतरच्या किस्स्यात 'जबाबदारी घेणे' या दोन्हींचा संबंध लावत मी अस्वस्थ झाले. खरंच आई-बाबा म्हणून आपली काय जबाबदारी आहे?
१. मुलांचे पालन पोषण करणे . मग यात कपडे, खाणे-पिणे, घर या मूलभूत गरजा आल्याच.
२. त्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी उत्तम शाळा, कॉलेज  निवडून देणे, विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी विविध क्लास लावणे. 
३. त्यांना चांगल्या सवयी लावणे, चांगले संस्कार करणे. (यात मोठयांशी कसे वागावे यापासून सकाळी लवकर उठावे पर्यंत सर्व सवयी आल्या.) 
४. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
 
मला सुचलेल्या अजून काही जबाबदाऱ्या खाली दिल्या आहेत. तपशीलातल्या असल्या तरी पाल्यांच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या आहेत. 
 
१. आपण वस्तू कशा उचलतो, त्या कशा हाताळतो, त्या कशा वापरतो, त्यांना कसं सांभाळतो हेही ते पाहूनच शिकतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीपासून, घरापर्यंत कोणत्याही गोष्टी यात आल्या.
उदाहरणार्थ, 
 • घरात आल्यावर बूट चपला कसे काढून ठेवतो.
 • बाहेरून घरात आल्यावर आपापल्या वस्तू म्हणजे पिशवी, दप्तर, डबा, रुमाल, सॉक्स, पाकीट , मोबाईल , इत्यादी आल्यावर जागेवर ठेवतो का? 
 • बदललेले कपडे जागेवर ठेवतो का?
 • कपडे कसे वाळत घालतो?
 • जेवताना पानात उष्ट्या हाताने वाढून तर घेत नाही ना?
 • पानात  अन्न टाकत नाही ना? अन्नाचे महत्त्व जाणतो की नाही? जेवताना मनापासून जेवतो का? जेवताना टि.व्ही. लावतो का? 
 • खेळलेले खेळ नीट ठेवतो का?
 • अभ्यास करताना आपापल्या वस्तू स्वतः घेऊन बसतो की नाही?
 • सगळ्या नवीन आणलेल्या, मिळालेल्या वस्तू  वापरायला काढायची घाई करत नाही ना?
 • पुस्तकं, वस्तू नीट हाताळतो की नाही?
२. जशा वस्तू तशीच माणसं. आपण कुणाशी कशा पद्धतीनं बोलतो, कसं उत्तर देतो, कसे प्रश्न विचारतो, कसा संवाद साधतो, कुणाला केवढा मान देतो हेही ते पाहूनच शिकतात.
 
उदाहरणार्थ,
 • वडीलधाऱ्यांशी नीट वागतो की नाही ?
 • उलट उत्तरे देतो का?
 • घरकाम करणाऱ्या, स्वच्छता कर्मचारी असणाऱ्या  व्यक्तीशी कसे बोलतो?
 • नवीन भेटणाऱ्या माणसाशी कसे बोलतो?
 • कुणीही विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे कशी देतो ? (शाळेत, आसपास भेटणाऱ्या व्यक्ती , मित्रपरिवाराचे पालक यांना)
 • न पटलेल्या विषयावर कसे वागतो?
 • नको असलेल्या गोष्टी कुणाला न दुखावता कशा थांबवता येतील?
याशिवाय वैचारिक जबाबदाऱ्याही आहेत.
   ३. आपण जर आपल्या आजारांविषयी, आपल्या आवडीनिवडीविषयी, आपल्या वैचारिक प्रक्रियेविषयी पालक म्हणून  मुलांना जाणीव करून दिली, तर तीही त्यांना होते.
 
उदाहरणार्थ,
 
 • आपल्याला बरे नसताना डॉक्टरकडे जाताना मुलांनाही घेऊन गेलो तर आपले आणि पालकांचे डॉक्टर वेगळे असल्याची जाणीव त्यांना होते. (याशिवाय  त्यांना आपोआप लहान मुलांचे डॉक्टर, होमिओपथी डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर असे फरकही कळतील. ते त्यांना ज्ञान म्हणून महत्त्वाचे आहेत.) यातली जबाबदारी यादृष्टीने महत्त्वाचे म्हणजे आपल्याला बरं नाही, काय होतंय, अशा वेळेस आपण कशा प्रकारची मदत करायला हवी, हे त्यांना जाणवतं.
 • आपल्याला कुठे बाहेर जायचे असले की, कोणता ड्रेस घालावा हे आपण त्यांच्याशी चर्चा करून, त्याचा कार्यकारणभाव समजावून सांगितला, तर ती प्रक्रियाही त्यांना कळते.
 • आपण निर्णय घेताना ते का घेत आहोत, त्यामागे आपण कोणत्या वेळी  कोणता भाग महत्त्वाचा मानत आहोत, हे त्यांना सांगितले, तर ते त्यांना समजते. 
 • आपल्या कामाचे स्वरूप तुम्ही त्यांना सांगितलेत, त्यातल्या  जबाबदाऱ्या सांगितल्यात, तर त्यांना आपण महत्त्व देतोय. ते पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, हेही त्यांच्या लक्षात येते. कधी कधी आई-बाबा थोडंसं बरं नसतानाही महत्त्वाचे काम पूर्ण करायला ऑफिसला जातात, त्यातून त्यांना समाधान मिळते. तेव्हा अशा वेळी त्यांना त्रास देऊ नये हेही ते आपोआप शिकतात.  
खरं तर प्रत्येक पालक आणि मूल यांच्यातलं नातं अनन्य असतं. आपण रोजच या गोष्टी मुलांच्या संदर्भात अनुभवत असतो. पण त्याचं तारतम्य बाळगून जर या गोष्टींकडे डोळसपणे पाहिलं तर तो पाल्य-पालक  नात्यातला संवाद ठरू शकतो. मग करताय ना संवादाला सुरुवात. 
 
 
याव्यतिरिक्त तुम्हाला काही सुचतंय का हो? नक्कीच सुचत असेल, आपल्या मुलांचे प्रश्न, त्याला आपण दिलेली उत्तर सगळं आठवतही असेल. त्याबद्दल नक्की लिहा आणि आम्हाला पाठवा. ई-मेल आयडी खाली दिलेला आहेच. 
 
-पल्लवी