आईचं असणं

 

रंग म्हणजे निळंशार आकाश, वसंत ऋतुत झाडाला फुटलेली पोपटी पालवी, सप्तरंगांचं विहंगम दृश्य असणारं इंद्रधनुष्य आणि रंग म्हणजे निर्मळता कशाला म्हणतात ते सांगणारं पाणीसुद्धा. आज अनेक रंग आपलं आयुष्य व्यापून राहिले आहेत. पण केवळ दिसतात ते रंग नव्हेत. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावाचेही निरनिराळे रंग असतात. कधी आनंद, कधी रुसवा, कधी दु:; तर कधी हर्षही. स्वभावांचे हेच रंग आयुष्य रंगीबेरंगी करतात. मार्च या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने आपण आढावा घेणार आहोत एका महत्त्वाच्या व्यक्तीचा अर्थात आईचा. तिने आपल्या आयुष्यात भरलेल्या रंगांचा दीर्घ पट उलगडण्यासाठी हे फार छान निमित्त आहे.

आमच्या शेजारचा चिंटू उगाचच आईवर रागावतो. त्याला वाटतं की, उगाचच चिडते ही आई. मला खेळायचं असतं हे तिला समजतच नाही. कधीकधी तर काहीच कारण नसतानाही चिडते. माझी काही चूक नसतानाही ओरडते. तुम्हालाही असं वाटतं का हो? असेल ना. खरं सांगू मलाही वाटायचं. आईचा जाम रागपण यायचा. आज मोठं झाल्यावर त्या घटनांचं महत्त्व आणि त्या मागच्या भावना मला जास्त प्रकर्षाने जाणवतात. नोकरी करणारी असो वा गृहिणी असो आईचं नेहमीच आपल्याकडे लक्ष असतं. आपलं खाणं-पिणं, झोपणं, अभ्यास करणं, आपल्या स्पर्धा-शिकवण्या हे आणि इतकंच तिचं विश्व असतं. स्वतःच्या आवडीनिवडी, छंद बऱ्याचदा आपल्यासाठी बाजूला सारते. आपली काळजी करताना घरातल्या अन्य माणसांनाही जपत असते ती. याच्याही थोडं पलीकडे जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येतं की, स्वतःच्या आईवडिलांना सोडून ती सासरी, आपल्या पतीच्या घरी राहायला आलेली असते. काहीवेळा तिने आपल्यासाठी सुरू असलेलं करिअर मागे सोडलेलं असतं. ती नोकरी करत असेल तर तिलाही काम वेळेवर संपवायचं टेन्शन असतं, नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी अनेकदा स्पर्धेला तोंड द्यावं लागतं, घरातले सगळे ताणतणाव सांभाळायची कसरतही करायची असते.

जीवनाच्या रंगपेटीतल्या वेगवेगळया छटा तिच्या एकाच जन्मात पाहायला मिळतात. मुलगी, गुणी विद्यार्थिनी, चांगली पत्नी, गृहकृत्यदक्ष सून, प्रेमळ आई, कधी कर्तव्यदक्ष नोकरदार तर कधी उत्तम व्यावसायिक, कधी मैत्रीण तर कधी शिक्षिका. आईला जर एका रंगाची उपमा द्यायची असेल, तर तिला पांढऱ्या रंगाची उपमा अधिक श्रेयस्कर ठरेल. जिथे जिथे गडद रंगाची छाया असते, तिथे तिथे हा पांढरा रंग स्वतःचं अस्तित्व सोडून मिसळतो आणि त्या गडद रंगाला उजळून टाकतो.

मित्रांनो, आज एक गंमत करा. सहज म्हणून आईला एक प्रश्न विचारा. तुझा आवडता पदार्थ कोणता? आजवर कायम हा प्रश्न तिने तुम्हाला विचारला असेल ना! आजीला, बाबांना, ताईला मदतीला घेऊन तो पदार्थ करा, तिला खाऊ घाला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा. तिचा इतका उजळलेला चेहरा तुम्ही कधी पाहिला नसेल. यापुढे कधी आई चिडली, रागवली तर त्यावर प्रतिक्रिया देण्याआधी तिच्या चिडण्यामागील कारण समजून घ्या. त्या क्षणापासून एक समजूतदार नागरिक होण्याच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू झालेला असेल.

-मृदुला राजवाडे

[email protected]