इस्रोमधल्या महिला वैज्ञानिक
 
महाराष्ट्राला मोठी वैचारिक आणि सुधारक परंपरा लाभली आहे. स्त्रीशिक्षणाचे जे बीज या भूमीत रोवले गेले, त्याचा पुढे महावृक्ष होत असलेला आपण पाहतो आहोत. याच पवित्र ज्ञानवृक्षाला पहिल्या भारतीय स्त्रीशास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी, मानववंशशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे, सागरशास्त्रज्ञ डॉ. आदिती पंत, पहिली टेस्ट-ट्यूब बेबी जन्माला घालणाऱ्या डॉ. इंदिरा हिंदुजा आणि अशीच अनेक सकस फळे लागली.
 
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाची ही पताका समर्थपणे पुढच्या पिढीने घेतली आहे.
 
नुकतेच भारताने विक्रमी संख्येने उपग्रह अवकाशात स्थापित केले. हे अवकाश तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या काही स्त्रीशास्त्रज्ञांची ओळख आपण जागतिक महिलादिनानिमित्ताने करून घेऊ.

 

१५ फेब्रुवारी २०१७ : सगळ्यांच्या मनात हुरहूर दाटलेली...पोटात १०४ उपग्रह घेऊन रॉकेट निघणार...समोरच्या पडद्यावरचे आकडे दर क्षणाला बदलत जातात...एकीकडे आपल्या कामावरचा, बुद्धी आणि मेहनतीवरचा आत्मविश्वास आणि दुसरीकडे थोडीशी धाकधूक...काउन्ट डाउन शून्यावर येतो आणि अग्निज्वाळा उफाळून येतात...प्रचंड शक्तीनिशी रॉकेट अवकाशात झेपावते ... आणि मग टाळ्यांचा कडकडाट ... डोळ्यात आनंदाश्रू! पण अनेक आव्हाने अजून उभी आहेत… म्हणून आनंद आवरून पुन्हा लगेच कामाकडे वळलेले हात अन डोळे ...

हे सगळं वातावरण होतं इसरोच्या (Indian Space Research Organization) लाँचपॅड कंट्रोल रूम मधलं.

असे उत्तुंग यश मिळवून देणारे कित्येक क्षण इसरोने गेल्या काही वर्षात देशाला दिले. चंद्रयान-1 असो, मंगळयान असो वा नुकतीच पार पडलेली  १०४ उपग्रहांची विक्रमी मोहीम असो, सगळ्या देशानेच नव्हे तर जगानेही शाबासकीची थाप इसरोला दिली. या यशात सहभागी असणाऱ्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे सगळीकडे मोठे कौतुक झाले. या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या गटात काही चेहऱ्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ते चेहेरे होते कष्टाळू, कणखर, तेजस्वी आणि बुद्धिमती स्त्रियांचे!

कोण आहेत या स्त्रिया? यशोशिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी कोणकोणते कष्ट उपसले, आव्हाने पेलली? त्यातल्या काही महिलांची ही ओळख.....

टेसी थॉमस : भारताची "मिसाईल वूमन" असा बहुमान प्राप्त झालेल्या ज्येष्ठ  अभियंता आणि शास्त्रज्ञ आहेत टेसी थॉमस. DRDO  अर्थात 'डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन'मध्ये क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या प्रमुख पदावर काम करणाऱ्या टेसी थॉमस या पहिल्या भारतीय महिला आहेत. अग्नी-४ या क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

टी.के. अनुराधा : अगदी लहान वयात आकाशाचे आकर्षण निर्माण होऊन पुढे  त्यातच आपले करिअर घडवण्याची खूणगाठ अनुराधा यांनी मनाशी बांधली होती. गेली ३४ वर्षे त्या इसरोमध्ये तंत्रज्ञ आहेत. त्या भारताच्या महत्त्वाकांक्षी अशा भूस्थिर उपग्रह मोहिमेच्या संचालिका आहेत. आपल्या रोजच्या संदेशवहनासाठी आवश्यक असणारे हे भूस्थिर उपग्रह भारतासाठी अतिशय यशस्वी ठरले आहेत. इसरोमधील सर्वांत ज्येष्ठ स्त्रीशास्त्रज्ञ असा लौकिक असणाऱ्या अनुराधा यांनी आजवर अनेक तरुण स्त्रीशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांना आपल्या कामाने प्रेरित केले आहे.

एन वलरमती :  टी.के. अनुराधा यांच्यानंतर इसरोमधील सर्वात ज्येष्ठ स्त्रीशास्त्रज्ञ म्हणून लौकिक असणाऱ्या वलरमती यांनी भारताच्या जी-सॅटेलाईट १२ या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केले आहे. पूर्णपणे भारतात तयार झालेल्या रडार इमेजिंग उपग्रह  या  मोहिमेचेही संचालकपद त्यांनी भूषवले आहे. त्याकरता त्यांना तामिळनाडू सरकारचा डॉ. अब्दुल कलाम पुरस्कारही प्राप्त झाला आहे.   

एस सीता : खगोलशास्त्रात पीएच.डी. मिळवलेल्या सीता या इसरोमध्ये प्रकल्प संचालिका आहेत. उपग्रहांमध्ये जी शास्त्रीय उपकरणे (पेलोड्स) बसवलेली असतात त्यांचे सर्व काम त्यांच्या विभागात पार पडते. पुढील वर्षी निघणाऱ्या चंद्रयान-२ मोहिमेची आणि आदित्य या सौर मोहिमेची शास्त्रीय उपकरणे बनवण्याचे अतिशय आव्हानात्मक काम सीता आणि त्यांची टीम करते आहे.

मीनल संपत: अभियंता असणाऱ्या मीनल आणि त्यांची टीम यांनी मंगळयान मोहिमेची शास्त्रीय उपकरणे बनवण्याचे मोठे कार्य पार पाडले. सुमारे दोन वर्षे एकही सुट्टी न घेता, दिवसाकाठी १८ तास काम करणाऱ्या मीनल आणि त्यांच्या टीमचे  मंगळयानाच्या यशात मोठे योगदान आहे.

रितू करीधल : शालेय वयापासून आकाश निरीक्षणाची आवड असणाऱ्या रितू यांनी अंतरिक्षाचा अभ्यास हेच आपले ध्येय मानले होते. लहानपणी आकाशाबद्दल छापून येणारी प्रत्येक बातमी त्यांनी जपून ठेवली होती. मंगळयानाच्या ऑपरेशन्स विभागाच्या उपसंचालक असणाऱ्या रितू आपल्या यशाचे सगळे श्रेय आपले सहकारी आणि कुटुंबाला देतात.      

नंदिनी हरिनाथ : लहानपणी नंदिनी यांना स्टार ट्रेक या लोकप्रिय मालिकेमुळे आणि विज्ञानकथांवर आधारित चित्रपटांमुळे विज्ञानाची अतिशय आवड निर्माण झाली. पुढे अवकाशशास्त्रज्ञ व्हायचे त्यांनी निश्चित केले. आता त्या प्रकल्प उपसंचालक आहेत. शिवाय इसरो आणि नासा (नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, अमेरिका) या दोन मोठ्या संस्थांच्या संयुक्त मोहिमेच्या त्या प्रमुख आहेत. ही मोहीम २०२० साली पूर्ण होणार आहे.   

या आणि अशा अनेक स्त्रिया इसरोमध्ये मोठ्या जबाबदारीची कामे पार पाडत आहेत. तेथील काम स्त्रियांना आपले कौशल्य, बुद्धी आणि चमक दाखण्याची उत्तम संधी आहे, असे त्या मानतात. स्त्री म्हणून त्यांना इथे कधी दुय्यम वागणूक मिळत नाही. उलट सहकाऱ्यांमध्ये आणि कुटुंबामध्ये त्यांच्याविषयी अभिमानच आहे. या सर्व स्त्रियांनी आपले कुटुंब,  स्वास्थ्य आणि आपले काम यांची कसरत अनुभवली आहे. अनेक आव्हाने पेलत त्या देशाला आणि समस्त स्त्रियांना अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. दीपस्तंभासारख्या या निगर्वी आणि तेजस्वी स्त्रियांकडून प्रेरणा घेऊन अनेक तरुणी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढेही येतील यात काही शंका नाही!   

यंदाच्या ऑस्कर नामांकनात Hidden Figures नावाचा एक सुंदर चित्रपट चर्चेत होता. अमेरिकेच्या जॉन ग्लेन या अंतरिक्षवीराच्या यात्रेची पूर्ण तांत्रिक व्यवस्था सांभाळणाऱ्या अन ती यशस्वी करून दाखवणाऱ्या नासा या संस्थेतील ३ कृष्णवर्णीय स्त्रियांच्या संघर्षाची ही कहाणी. 'मानवी संगणक' म्हणून त्या नासामध्ये ओळखल्या गेल्या.  कदाचित भविष्यात इसरोच्या या वीरांगनांच्या कर्तृत्वावर असाच एखादा चित्रपट आपल्याकडे निघेल अशी आपण अपेक्षा बाळगू .

 

-अपर्णा जोशी, पुणे.

-([email protected])

(लेखिका तंत्रज्ञानविषयक सल्लागार व खगोल-अभ्यासक आहेत.)