उत्तम आरोग्याची पायाभरणी ही आई-वडिलांच्या आरोग्यावर व मातेने गरोदरपणातघेतलेल्या स्वतःच्या मानसिक व शारीरिक काळजीपासूनच सुरु होते. रोजच्या आयुष्यातली वाढलेली धावपळ, चिंता, ताणताणाव यांमुळे शरीराच्या पोषणाची गरज वाढते, हे लक्षात घेऊन आहाराचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते.आजकाल सुखवस्तू घरांमधून खाण्याची रेलचेल असते आणिदिवसातून ५ वेळा आहार विभागून घेतला पाहिजे हेसुद्धा आपल्याला माहिती असते. पण ० ते ८ वयोगटासाठी अधिक काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे ठरते.

पण आजकाल सगळ्यांनाच आपली मुलं 'सुपर किड्स' व्हावीशी वाटतात.. माझा मुलगा किंवा माझी मुलगी सर्व विषयात चमकली पाहिजे असा हट्टच जणू!! यात पालकांच्या भावना चांगल्या असल्या तरी आपले मूल घडवताना बदलावी लागणारी जीवनशैली मात्र सुधारायला पालक विसरून जातात आणि आजच्या गतिमान जीवनात,उत्तम आणि योग्य पर्यायाकडेसोयीस्कररीत्या कानाडोळा करून त्यातल्यात्यात बऱ्या पर्यायांची सहज निवड करून आपण वेळ मारून नेतो.

गतिमान जीवनशैली, दिवसभर काम करून थकून येणारे आई-वडील,टी.व्ही.-मोबाईलने  व्यापलेला वेळ या सर्वांमुळे आपल्या आहारातल्या अनेक उत्तम सवयी तुटलेल्या दिसतात. लहान मुलांसाठी येणाऱ्या अनेक जाहिराती आपण पाहतो... ‘मॅगीची’ जाहिरात तर त्याचे उत्तम उदाहरण आहे आणि आपल्यालाही "भूख लगे तो बच्चोन्को मॅगी दिजीये, पलभर मे तय्यार खानेमे मजेदार", हे खरे आणि सोयीस्कर वाटू लागते आणि याबाबत मुलेही कधी हट्टी बनतात ते आपल्याला कळतही नाही आणि मग त्यांचा हट्ट पुरवण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे उरत नाही.तर मग आपल्याला आपली मुले खरंच सुपर किड्स बनायला हवी, असतील तर पालकांनो आपल्यालाही सुपर आई आणि सुपर बाबा व्हावा लागेल. मूल अनुकरणप्रिय असतात, त्यामुळे जर पालकांनी स्वतःच उत्तम आहार, विहार व विचार ही त्रिसूत्री पाळली, तर घरोघरी ज्ञानेश्वर जन्मायाला वेळ लागणार नाही.

 

आपल्या घरांमधून साधारण घेतला जाणारा ठोक आहार हा खालील प्रमाणे असतो, 

 

सकाळी : चहा, कॉफी, दुध ,बिस्किटे ,खारी ,टोस्ट इ.

न्याहारी : उपमा, पोहे, साबुदाणा खिचडी,वडासांबर, इडली चटणी इ.

दुपारी : भाजी, पोळी 

संध्याकाळी : चहा, कॉफी, फरसाण ,वेफर्स ,सॅंडविच,सामोसे,दाबेली, भेळपुरी इ .

रात्री : भात आमटी भाजी पोळी / भाकरी ( ताक दही चटणी कोशिंबीर या पैकी काही तरी )

 

बघायला गेलं तर हा आहार प्रथमदर्शनी व्यवस्थित वाटतो, पण या आहारात बऱ्याच अन्नघटकांची कमतरता आढळते. त्यात सहजच खाण्यात येणारे बाहेरचे पदार्थ, हॉटेलिंग, पिझ्झा, बर्गर, थंडपेय हे वेगळाच. 

 

या सर्वांचे दुष्परिणाम दिसत असूनही बदल करायला आपण एवढे उत्सुक नसतो. या सगळ्यातून बाहेर पडायची इच्छा असते, फक्त पक्का निर्णय घेऊन, त्या निर्णयाशी ठाम राहण्याचा आपण कसोशीने केलेला प्रयत्न हेच काय ते हवे आणि त्यातून वयवर्ष ० –८ या कोवळ्या वयोगटामाधीलमुलांसाठी आपण काळजीपूर्वक आहाराचे कसे नियोजन करू शकतो याची माहिती आपण पुढील लेखामधून पाहू.

 

(क्रमशः)

 

 

- ऋचा झोपे

[email protected]

(लेखिका आहार तज्ञ आहे. )