गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्षप्रतिपदा म्हणजेच मराठी नव वर्षाची सुरुवात. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातही चैत्रात उगादि या नावाने  नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो. नवीन वर्षाच्या आरंभासाठी चैत्राची निवड अगदी समर्पकच आहे, कारण चैत्र हा वसंतसखा आहे आणि वसंत हा नवोन्मेषाचा ऋतू. जगभरात वसंताचं नातं तारुण्याच्या नवतीशी जोडलेलं आहे. जपानी चित्रलिपीत तर तारुण्य हा शब्द वसंताच्या चित्रखुणेशिवाय लिहिताच येत नाही. स्वाभाविकच सर्वत्र या ऋतुराजाचं स्वागत उत्फुल्ल उत्साहानं होतं.

माणसंच्या दुनियेत याची सुरुवात बाजारपेठेतून होते. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर छोटया दुकानांपासून मोठया मॉल्सपर्यंत सगळीकडच नेपथ्य बदलतं. पिचकाऱ्याची जागा लहानमोठया तयार गुढया घेतात. फुगे आणि रंगाच्या पुडयांच्या माळांच्या जागी साखरेच्या पदकांच्या गाठी लटकू लागतात. दर्शनी कपाटात मसाला चायच्या पाकिटांऐवजी सरबतांच्या बाटल्या येतात आणि होळीच्या पुरणपोळीची चव जिभेवर रेंगाळत असतानाच 'खास गुढीपाडव्यासाठी तयार आंबे किंवा आमच्या झाडांवरून तुमच्या टेबलावर' अशा जाहिराती झळकू लागतात. 

या बदलाची 'हवा' हवेला आणि माणसानांही लागते. नाना-नानी पार्कात मफलर्स जाऊन आजी-आजोबांचे चेहरे पुन्हा ओळखायला येऊ लागतात. दुपारी चहाच्या टपऱ्यावरची गर्दी रसवंतीगृहांत दिसू लागते. घरोघरच्या आया-आज्या चैत्रांगणाच्या रांगोळीची तयारी करू लागतात आणि संध्याकाळी वजन घटवण्याच्या निमित्ताने तरुणाई टेकडया किंवा जिममधे जमू लागते. चिरतरुण झाडं या यौवनाच्या ऋतूचं स्वागत नव्या रंगगंधांनी करतात. जुन्या जाणत्या वडपिंपळांच्या अंगांवरही नवतीची लालस गर्भरेशमी पालवी झळकू लागते. कडुनिंबांचे शेंडे तांबुस चंद्रकोरींनी चमकतात. जवळपास सारीच झाडे नवीन पानांनी सजतात. या चैत्रपालवीच्या फिकट पोपटी ते लाल अशा अनेक मोहक रंगछटा असतात. 


याशिवाय वासंतिक फुलांची लयलूट असतेच. मोहरलेला आंबा आणि मोगरा पर्णवैभवाच्या सोन्याला सुगंध बहाल करतात. कश्मिरात टयुलिप्स रंगबहार उडवतात. बहव्याच्या सकवार फांदया सोनपिवळया घोसांनी लगडतात. नीलमोहर, सोनमोहर, लाल, पिवळे, गुलाबी कॅशिया, पायाशी पाकळ्यांच्या रांगोळ्या घालतात. खऱ्या आणि खोटया शिरिषाच्या पालवीच्या रेशीम पदरावर गुलाबी किंवा हलक्या हिरव्या फुलांचा कशिदा उमटू लागतो. तबू बियांची झाडं सोन्यानं मढवलेल्या नववधूसारखी भासतात. पळस, पांगारा वणव्यावाचून रान पेटवतात. 

हिवाळ्यात फांदयांचे हात उंचावून प्रार्थना करणारी योगी झाडं वसंतात भोगी रसिया कशी होतात? कुठल्या जादूच्या काठीनं या भिकारी सिंड्रेलांच्या राजकन्या होतात? झाडांना कसं कळतं की, हिवाळ्यात पानं गाळावी आणि वसंतात पालवावं? काहीच झाडं कशी वसंतात फुलतात?

 

याची उत्तरं शेकडो वर्षांपासून डीएनएतून संक्रमित होणाऱ्या झाडांच्या शहाणीवेत आहे. सूर्यप्रकाश कमी असतो, तेव्हा म्हणजे हिवाळ्यात; थंड प्रदेशातच नव्हे तर उष्ण कटिबंधातही शहाणी झाडं जीवन प्रक्रियांचा वेग कमी करतात आणि उर्जेची बचत करतात. त्यासाठीच पानांतल्या हरितद्रव्याचं पुनर्घटन करणं हळूहळू बंद केलं जातं आणि पानं पिवळी होऊन गळून पडतात. खोडात पानांचे फुटवे तयार होतात, पण थंडीत ते सुप्तावस्थेत राहतात. 

थंडी ओसरू लागताच दिनमान आणि तापमान वाढतं. हा झाडं पालवण्यासाठीचा इशारा असतो, हे आपल्याला अनेक वर्षांपासून माहीत आहे. पण तापमानातला हा बदल झाडांना कसा कळतो, हे सुचवणारं संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. याची गुरूकिल्ली फायटोक्रोम या रंगद्रव्यात आहे. दिवसा प्रकाश शोषण्याचे काम करणारे फायटोक्रोमचे रेणू रात्री थर्मोमीटरचं काम करतात. वाढलेल्या तापमानामुळे फायटोक्रोमच्या रचनेत आणि प्रमाणात बदल होतो. त्यामुळे जनुकीय व जैवरासायनिक बदल घडून झाडं पालवतात. याखेरीज पाण्याची उपलब्धता आणि झाडाच्या आतल्या पाणी वाहून नेणाऱ्या पाइपसारख्या क्झायलेम पेशी यावरही पालवी येणं अवलंबून असतं. 

गंमत अशी की, बऱ्याच झाडांच्या फुलण्याच्या प्रक्रियेतही तापमान, दिनमान आणि फायटोक्रोम हेच महत्त्वाचे घटक आहेत. पानांत फायटोक्रोम दोन रूपात आढळतं पी.आर. आणि पी.एफ.आर. दिवसा पी.आर.चं रूपांतर जलद पी.आर. मध्ये होतं, तर रात्री हे पी.एफ. आर.चे संथगतीने पी.आर.मध्ये. पी.एफ.आर. उन्हाळी फुलांसाठी उपकारक असतो, तर हिवाळी फुलांसाठी अपकारक. 

वसंतातल्या रात्री लहान असल्याने सर्व पी.एफ.आर.चे रूपांतर पी.आर. मध्ये होऊ शकत नाही. परिणामी पी.एफ.आर.चे पानातले प्रमाण वाढते. पी.एफ.आर.चे रेणू विवक्षित प्रथिनांना चिकटतात. मग ही जोडगोळी फुलण्याशी संबंधित फलोरिजेन्स संप्रेरकांच्या जनुकांना सक्रिय करते आणि वासंतिक फुलं फुलतात. या संप्रेरकाचे काम जरी दॄग्गोचर असले तरी अजूनही फलोरिजेन्स झाडापासून मिळवण्यात यश आलेले नाही. हिवाळ्यातल्या मोठया रात्रींत सर्व पी.एफ.आर.चे रूपांतर पी.आर.मध्ये झाल्याने पानातले पी.एफ.आरचे प्रमाण घटते आणि  हिवाळी फुलं फुलतात. 

सदाफुलीसारख्या बारमाही फुलांत मात्र दिनमानाचा असा प्रभाव नसतो. 

टयूलिपसारख्या काही झाडांच्या फुलण्यासाठी उन्हाळ्यापूर्वी थंड हवामान ही गरजेची बाब आहे. या प्रक्रियेला व्हर्नलायझेशन म्हणतात. 

मोठया वृक्षांच्या फुलण्यासाठी मात्र झाडाचे वय, पोषक द्रव्ये, पाणी आणि जिबरलिन्ससारखी संप्रेरके यांचा वाटा मोठा असतो. 

निसर्गाने उपलब्ध संसाधनांच्या योग्य वापराच्या दॄष्टीने केलेली फुलण्याची ही विभागणी फूलशेती किंवा फळशेतीच्या पिकांत आता नामशेष होत आहे, कारण हावरट माणसाला सर्व काही बारमाही हवे आहे. तसंच झाडांच्या जाणतेपणामुळे वर्षानुवर्षे सुरळीत चाललेल्या  पानगळ - पालवीच्या ऋतुचर्येलाही आता माणसाच्या वेडेपणामुळे धोका निर्माण झाला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पालवी व फुले लवकर येत आहेत. यामुळे परागीभवन करणारे किडे, बिया पसरवणारे प्राणी, बिया रूजण्याची शक्यता सगळ्यावरच विपरीत  परिणाम होणार आहे. 

तेव्हा या गुढी पाडव्याला आपण  पेट्रोलसारखी इंधने कमीत कमी वापरण्याचा संकल्प करून पर्यावरण संवर्धनाची गुढी उभारू या. म्हणजे पुढची अनेक वर्षे फुलं फुलत राहतील … वसंत येत राहील... आणि आपल्या पुढच्या पिढ्याही आनंदी राहतील.    

-स्वाती केळकर 

[email protected]gmail.com