डोक्याने विचार करताय?  

   आजच्या आधुनिक युगात जेव्हा विज्ञान-तंत्रज्ञान झपाटयाने आपल्या जीवनात क्रांती घडवून आणत आहे, तेव्हा या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूल्य अपार आहे. आपल्या समाजाचे प्रश्न समजून घ्यायला, ते सोडवायला आणि समाज खऱ्या अर्थाने समर्थ बनवायला प्रत्येकाजवळ वैज्ञानिक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे.

   वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमके काय? याचे उत्तर देताना त्याला  अनेक वाट फुटतात. कशाकशावर विश्वास नको याची मोठी यादी केली जाते. देवावर विश्वास नसणे, रूढी, परंपरा यांना विरोध करणे इ. परंतु ही यादी महत्त्वाची नाही. पण आपला विश्वास कशा-कशावर असायला हवा, कोणत्या गोष्टींवरचा विश्वास बळकट करायचा, हेच आपल्याला जाणून घ्यायचे आहे.

विज्ञानाच्या वाटचालीत सत्यावरच्या श्रद्धेला अतोनात महत्त्व आहे. जे तर्काने सिद्ध होते. जे प्रयोगाच्या चाचण्यांतून तावून सुलाखून निघते, ते सत्य स्वीकारलेच पाहिजे. हा विज्ञानाचा आग्रह असतो. असे सत्य मान्य करणे बऱ्याचदा कठीण भासते. त्यासाठी वैज्ञानिकाला संघर्षही करावा लागतो. हा संघर्ष नेहमी सत्य विरुद्ध सत्याचा आभास किंवा भ्रम असा असतो. अर्थातच तर्काच्या कसोटीवर आणि प्रयोगांच्या कसोटीला भ्रम टिकू शकत नही. गॉलिलिओने केलेला संघर्ष, डार्विनने सहन केलेला विरोध ही याचीच उदाहरणे आहेत. गॉलिलिओ हा ‘मेकॅनिक्स’ या विषयाचा जनक समजला जातो. त्यांनी ‘हायड्रोस्टॅटिक तराजू’ बनवला होता. दुर्बिण वापरून आकाश निरीक्षण केले. ‘गतीचे नियम’ मांडले.

आपला सिद्धांत प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा पायंडा गॉलिलिओने पाडला.

  वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी गॉलिलिओचे प्रयत्न अभ्यासायला हवेत. निरीक्षण, आकलन यातून प्रयोगाची मांडणी समजायला हवी. प्रयोगाच्या निष्कर्षाची विश्वासार्हता पडताळता आली पाहिजे. इतके सर्व समजून घेताना ‘कार्य-कारण’ संबंध (cause and effect relationship) मनावर ठसायला हवा. विज्ञानाचा कोणताही प्रयोग म्हणजे या विश्वासाचेच एक दृश्य रूप आहे, हे उघड आहे.

      हा विश्वास फक्त प्रयोगशाळेपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. तो रोजच्या व्यवहारात आला पाहिजे. ‘कार्य-कारण’ सिद्धांतावरचा विश्वास वाढतो. असा माणूस बुवाबाजीच्या मोहात सापडण्यापासून दूर राहतो. यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एक महत्त्वाचे सूत्र मिळते व कृती अशी असावी की, ती अत्यंत विचारपूर्वक केलेली असावी. विचार व कृती यांची अतूट सांगड ही विज्ञानाची खरी शक्ती आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन असणे याचा अर्थ, जीवनाच्या अन्य क्षेत्रातही हेच धोरण, हाच मार्ग अवलंबणे होय. शिक्षक विज्ञान विषय शिकवताना, प्रयोग शिकवतात, त्या मागचे हे तत्त्व विद्यार्थ्यापर्यत पोहोचवले तर फारच मोलाची कामगिरी ठरेल. अजून एक सकारात्मक पैलू आहे तो म्हणजे ‘प्रयोगशीलता.’

प्रयोगशीलतेमध्ये दोन गोष्टी अंतर्भूत आहेत. एकतर आपले म्हणणे, आपले निष्कर्ष हे ‘प्रत्यक्षाच्या कसोटीवर’ पारखून घेणे. दुसरी गोष्ट म्हणजे ‘नव्या नव्या पद्धतीने गोष्टी करून पाहणे.’ जुनी पद्धत किंवा रूढी  बदलण्यासाठी धैर्य लागते, चिकाटी लागते. प्रयोगशीलतेत हे सर्व अंतर्भूत आहे.

        शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी यांत्रिकपणे प्रयोग करतात. पुस्तकाबाहेरील किंवा नवीन प्रश्नांचा कंटाळा करतात. स्वतः प्रयत्न करून अभ्यास करण्यापेक्षा क्लासेसना महत्त्व देतात.

         इथे पुन्हा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो गॉलिलिओच्या  वैज्ञानिक वाटचालीचा आणि त्याचबरोबरीने न्यूटन, रुदरफोर्ड यांसारख्या अनेकानेक संशोधकांचा स्वत:साठी, स्वत:च्या देशातील समस्यांचा परिहार करण्यासाठी ही विज्ञानाची वाट किंवा दृष्टी स्वीकारायला हवी. शेतीपासून बांधकामापर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रयोगशीलता रुजवू या.