चिमुरडयांची शाळा  

आज ठरलेल्या लोकलच्या डब्यातील खिडकीत बसणारे दरेकर काका आलेले  नव्हेते, चर्चेअंती समजले की आज ते नातवाच्या नर्सरीच्या प्रवेशाकरता सकाळी सहापासून रांगेत उभे आहेत. मग काय विचारता? डब्यात शाळा, शाळा-प्रवेश, पैसा, भ्रष्टाचार यांवर गप्पांचा फड रंगला. मी काहीही बोललो नव्हतो तरीही अस्वस्थ मात्र झालो होतो.

मुलानं कोणत्या वयात शाळेत जावं? मुलानं कुठल्या (प्रकारच्या आणि माध्यमाच्या) शाळेत जावं? वयाच्या कोणत्या वर्षी शाळेत जावं? काय आणि कोणत्या रीतीनं शिकावं? कोणत्या वयात काय शिकावं? या आणि अशा प्रकारच्या अनंत प्रश्नांची चर्चा आपल्याकडे सातत्यानं सुरूच असते. जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळेच्या वेळापत्रकाआधी सात-आठ महिने आधीच  या विषयाची चर्चा आपल्या विश्‍वात सुरू होते. लहानग्या मुलांना शाळेत अडकवलं जाऊ नये, त्यांच्या स्पर्धात्मक मुलाखती होऊ नयेत या विचारानं बनवले जाणारे शासकीय नियम, त्यांना वळसे घालण्यासाठी उतावीळ असलेल्या शाळानामक व्यवस्था आणि दीड वर्षाच्या आपल्या मुलाला अमक्याच शाळेत प्रवेश मिळावा, म्हणून रात्ररात्र शाळेबाहेर रांगा लावणारे पालक हे आपल्याकडचं वार्षिक चित्र आहे.

 या विषयाची एक दुसरी बाजू आहे त्यावर मला जास्त चिंता वाटते, खरंच पालकांना शाळा हवी असते की पाळणाघर? आपण मुलांना शाळेत का घालतो? शाळेत जाऊन मुलांनी शिकावं हा एक हेतू झालाच; परंतु आपल्या नोकरी-व्यवसायाला जाणारे आई-बाबा आणि घरी नसलेल्या आजी-आजोबांमुळे मुला-नातवंडांना सांभाळायला घरी कोणी नसतं, म्हणून अशा मुलांसाठी आपण शाळेच्या रूपात एक पाळणाघरच शोधत असतो का?

शाळा ही जशी शिकण्याची जागा, तशीच पालकांच्या अपरोक्ष काही तास मूल सांभाळण्याचीही ती जागा (होत) आहे.

खरंच मूल कुठे शिकतं? यावर विचार व्हायला हवा. शाळेत, घरात, परिसरात, क्लासमध्ये, पाळणाघरात की आणखी कुठे? खरं तर हा प्रश्नच दुय्यम आहे. तरी पण ....

‘मूल शिकतं कुठे?’ यापेक्षाही मूल कसं शिकत, मुलाला शिकवण्याची पद्धत काय असावी, कोणत्या वातावरणात ते शिकतं, मुलाचं शिकणं म्हणजे नेमकं काय? या व अशा काही मूलभूत प्रश्नाकडे आजच्या या नोकरदार पालकांनी पाहायला हवे. या विषयाकडे विविध पैलूंनी अधिक लक्ष द्यायला हवं.

तसे पाहिले तर मुलाला स्वच्छंदपणे खेळायला, बागडायला मिळत असेल, त्याची चांगली काळजी घेतली जात असेल, देखभाल होत असेल, त्याच्या नैसर्गिक क्षमतांच्या सहजविकासाला जिथे प्रोत्साहन मिळत असेल असं कुठलंही ठिकाण छोट्या मुलांच्या शिक्षण प्रारंभासाठी चांगलं. २-३ वर्षांची मुलंही अशा ठिकाणी उत्तम रमतात. घरी आली की भरपूर बोलतात. गप्पा मारतात. प्रश्न विचारतात. कारण, त्यासाठीची ऊर्जा मुलांना ‘त्या’ ठिकाणी मिळालेली असते. अशा ठिकाणांना भले काहीही म्हणा, अंगणवाडी, नर्सरी किंवा आणखी काही. मुलाला कितव्या वर्षी शाळेत घालावं? शाळांचं स्वरूप जर कोंडवाड्यासारखं असेल तर मुलाला फार लवकर घालूच नये शाळेत. अगदी शाळेतच नाही घातलं तरी कितीसा फरक पडणार आहे? परदेशात विशेषतः युरोपीय देशात पूर्वी आणि अगदी आजही मुलं सात-आठ वर्षांची झाल्याशिवाय त्यांना शाळेत घातलं जात नाही. आपल्याकडेही पूर्वी तसं होतं.

 

 

 

 

 

 

 

 मुलानं कोणत्या वयात शाळेत जावं हा मुळात मूलभूत प्रश्न होऊच शकत नाही. हा अति अपेक्षेपोटी व बालकाची सोय ( आपल्या सोयीकरिता) हाच हेतू अधिक आहे. मात्र तो कुणी कबूलच करणार नाही. आज शहरांच्या गल्लीबोळात प्ले ग्रुप व नर्सरी यांची दुकाने उभी राहिली आहेत, ती या अशा पालक वर्गांच्या मानसिकतेतूनच. आपल्याकडे असलेली ‘पूर्व प्राथमिक वर्गाची शाळा’ नावाची जी व्यवस्था आहे, त्यावर आज विचार व्हायला हवा आहे.

खरं तर अशा शाळा फक्त घोकंपट्टी करून त्या निरागसांवर अन्याय करत आहेत. मुलांना पोपट करून पालकांना खूश करण्यात या दुकानदाराना धन्यता वाटते, तर टायबुटात आपल्या चिमुक्याला पाहून पालकांना धन्यता वाटते. मात्र यात बळी जातो त्या बालकाच्या बाल्यावस्थेचा. यातही एक दुसरा महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे की, या गल्लीबोळातल्या प्ले ग्रुप-जुनिअर, सिनिअर या पूर्वप्राथमिक शिक्षण वर्गात शिकविणाऱ्यांच्या योग्यतेबाबतचा. त्यांनी अशी कोणती पदविका किंवा पदवी मिळवली आहे; ज्यात त्यांनी बालमानसशास्र किंवा मुलं समजून घेण्याचा अभ्यास केला आहे? या वयातील मुलांच्या शिक्षणात या अशा शाळा केवळ यांत्रिकता घेऊन येतात. ही मुलं आपल्या कुटुंबात, समवयस्कात अनुभव घेत घेत शिकतात. त्याच वेळी आपण शाळा सांगून त्यांना आपल्यापासून दूर करीत असतो. खरं तर त्यांना खूप असे प्रश्न असतात जे त्यांना आपल्यालाच विचारायचे असतात. मात्र ते अनुत्तरीतच राहतात.

या लहान मुलांनी शिकण्याच्या प्रक्रियेतला सर्वांत गरजेचा आणि महत्त्वाचा भाग एका अर्थानं शाळा-बाह्यच असतो असे म्हटले तर वावगे होणार नाही. मुलांमधल्या सर्जनशीलतेला, विचाराला, त्यांच्या क्षमतेला विकसित  होण्यासाठी अवसर देईल असा परिसर उपलब्ध असणं ही मुलांच्या शिक्षणासाठीची पहिली व अतिशय मुलभूत अशी अट आहे. पण ही प्राथमिक अट तरी आपण कुठे पूर्ण करतो? मुलांना व्यक्त व्हायला, बोलायला वाव मिळावा, समवयस्क मुलांमध्ये रमायला, बागडायला मिळावं, भांडणांची आणि ती भांडणं परस्परांमध्ये सोडवण्याची संधी मिळावी, आपल्या शारीरिक क्षमता आणि आवडीनिवडी जोखण्याचे मार्ग मिळावेत हा या वयातील मुलांचा हक्क आहे. अशा वेळी गोदामात कोंडावीत अशी मुले कोंडली जातात तेही त्यांच्या पालकांच्या संमतीनेच हे त्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असे म्हणावे लागेल.

(लेखक प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक असून सध्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण , मुंबईयेथे कार्यरत आहेत.)

                                                                                                       ---- संतोष एस. सोनवणे

[email protected] .com