शब्द वैभव

दिंनाक: 24 Mar 2017 11:18:36
भाषिक विकासासाठी पालकांनी साधलेला संवाद महत्त्वाचा

 

"माझ्या मुलीला,  तिला नक्की काय हवंय,तिला काय वाटतंय  हे सांगताच येत नाही.सुरुवातीला लहान आहे म्हणून सोडून दिलं, पण आता ६ वर्षांची झाली ती नीट बोलत नाही,नुसती रडते, नाहीतर चिडते.” समुपदेशनासाठी आलेली राधाची आई तिच्याविषयीच्या काळजीपोटी बोलत होती.

राधाबरोबर बोलताना लक्षात आले की, तिचा शब्दसाठा बराच अपुरा होता.अक्षर ओळख,शब्दांचा योग्य वापर,वाक्यरचना या मूलभूत पायऱ्या तिच्या बाबतीत अर्धवट राहिल्या होत्या .त्यातून ती इंग्रजी माध्यमातील त्यामुळे, तर प्रश्न अजूनच गंभीर होत चालला होता.राधाच्या बाबतीत तिचा भाषिक विकास झाला नसल्यामुळे ती सध्याच्या समस्येला तोंड देत होती.आजकाल बऱ्याच मुलांबाबत अपुऱ्या भाषिक विकासाची समस्या दिसून येतेय .

भाषा हा बुद्धिमत्तेतील एक महत्वाचा घटक आहे.कारण भाषा आणि विचार हे हातात हात घालून जातात.भाषेबाबत ती ऐकणे, बोलणे, ओळखणे, वाचणे आणि लिहिणे  या  टप्प्यातून ती विकसित होत जाते.सगळ्यात जास्त ऐकण्याच्या माध्यमातून भाषा जास्त प्रमाणात शिकली जाते.त्यामुळे मुलांशी जितके जास्त बोलले जाईल, तितका त्यांचा शब्दसाठा वाढत जातो.

वरील उदाहरणातील राधा ही एकुलती एक मुलगी, दिवसभर पाळणाघरात राहणारी,घरी हे तिघंच.आई-बाबा त्यांच्या कामाच्या व्यापातून तिच्याशी कामापुरतं बोलतात,एकूणच त्यांच्या घरात संवाद जरा कमीच.यामुळे झाले असे की, राधाचा शब्दसाठा तर वाढला नाहीच तर भावनिकरीत्याही ती अस्थिर झाली.कारण भावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करता येतो, हे तिला समजूच शकले नाही.

भावनांच्या प्रकटीकरणामध्ये भाषा हे खूपच महत्त्वाचे माध्यम आहे.लहान मूल रडते तेव्हा त्याला भूक लागली की, झोप आली,की पोटात दुखतंय,की उचलून घ्यायला हवंय हे त्याच्या जवळची माणसं लगेच ओळखतात.मात्र मुल दोन-तीन वर्षाचे झाले कीत्याला वाटणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करण्याची संधी दिली गेली पाहिजे. उदा., ३ वर्षांचा सोहम जेव्हा रडू लागतो,तेव्हा सोहमची आई,तुला भूक लागली आहे का?,कंटाळा आलाय का?मी तुला काही मदत करू का?असे प्रश्न विचारून त्याला वाटणाऱ्या भावनांची खात्री करून घेते आणि मग प्रतिसाद देते .

मुलांशी भरपूर बोलणे,त्यांना बोलू देणे,त्यांचे बोलणे लक्षपूर्वक एकणे इ.कृतींमधून लहानपणपासूनच मुलांमध्येभाषेची आवड आणि त्याचा योग्य वापर या गोष्टी साध्य होणार आहेत.पुढील काही कृतींमधून मुलांमधील शब्दवैभव वाढण्यास आपण त्यांना मदत करू शकतो.

वय  ० ते दीड वर्ष : बाळांशी भरपूर बोलावे मात्र स्पष्ट,हळू व नेमके.

वय दीड ते ३ वर्ष : १) चित्र,आजूबाजूचा निसर्ग यांचे जास्तीत जास्त शब्द वापरून वर्णन करावे  उदा., हे बघ जास्वदाचे फूल, याचा रंग आहे लाल,ताईच्या दप्तराचा रंग लाल आहे,इ. २) सोप्या व छोट्या गोष्टी सांगाव्यात .

वय तीन ते पाच वर्ष : १) काना, मात्रा, वेलांटी नसलेल्या काही गोष्टी मुलांना वाचून दाखवाव्यात, २) भरपूर चित्र असलेली पुस्तके यासाठी निवडावीत, ३) आपण स्वतः वाचून हावभावासहित पुस्तके वाचून दाखवावीत.

वय पाच ते आठ वर्ष : १) अक्षर ओळख वाढवण्यासाठी ठरावीक अक्षर एका वाक्यात किती वेळा आले आहे ते शोधणे, २) शब्दसाठा विकसित होईल यासाठीचे खेळ खेळावेत जसे,शब्द भेंड्या,एकाच अक्षराने सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द आठवणे,एखाद्या क्रियापदाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करणे. उदा., वाटणे- चटणी वाटणे,भीती वाटणे,गिफ्टस वाटणे.३) मुलांना गोष्ट वाचण्यास सांगणे व त्यावर चर्चा करणे इ.

घासावा शब्द|तासावा  शब्द |  तोलावा शब्द |बोलण्यापूर्वी

थोडक्यात समजणे |थोडक्यात समजावणे | मुद्देसूद बोलणे | ही संवाद कला. 

   ही संवाद कला मोठेपणी साध्य होण्यासाठी पहिल्या आठ वर्षांमधील आई-बाबांची मेहनत खूप साहाय्यभूत ठरणार आहे .

 

- रश्मी पटवर्धन.

[email protected]