ऐन उन्हाळ्यात येणारे हे फुल यंदा मार्चमध्ये  

 

माझी लेक म्हणाली, “आई मे फ्लॉवर मार्चमध्ये कसं आलं? तिच्या या प्रश्नाने मनात विचारांचं चक्र सुरू झालं. ती सहज म्हणून गेली की, “याला आता मार्च फ्लॉवर म्हणू या.” खरंच हवामान किती बदललंय, मे महिन्यातल्या उष्णतेत येणार हे फूल मार्चमध्येच आलंय. आमच्याकडे हा मे फ्लॉवरचा कंद किती वर्षांपासून आहे हे आठवावंच लागेल. (गुगलवर अशा अनेक समर फ्लॉवर्सची माहिती उपलब्ध आहे.) कदाचित ३० वर्षांहून जास्त काळ होऊन गेला असेल. पूर्वी हे फूल मे महिन्यात यायचं. मागच्या वर्षी ते एप्रिलमध्ये आल्याचं आठवतंय आणि या वर्षी एकदम मार्चच्या मध्यावरच आलंय. 

लहान मुलांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू आपण शिकवतो, वॉटसॅपवरचा जोक म्हणून सोडा, पण खरंच केवळ उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हेच नाही, तर उनसाळा, हिवसाळा असेही ऋतू आता नव्याने तयार झालेत. दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे होळीच्या थोडं आधी पहाटे हवेत प्रचंड गारवा होता. उन्हाळ्यात सकाळी शाळेत जाताना मुलगी जॅकेट घालायची आणि १० वाजेनंतर तिला शाळेत प्रचंड उकडायचं. त्यामुळे ती आणि तिच्यासारखे शालेय विद्यार्थी आजारपणाची शिकार व्हायचे. तेच काय अहो, फिरायला जाताना सकाळी स्वेटर घालायची वेळ माझ्यावरही आली होती. हीच त्या बदललेल्या ऋतूंची, उदाहरण आणि परिणाम आहेत.

ग्लोबल वॉर्मिंगची ओरड, ओझोनचा थर कमी होणं, प्रचंड प्रदूषण तयार होणं, हिमालयातला बर्फ वितळायला लागणं, हे सगळेच हवामानातले बदल म्हणावे लागतील. नवनवीन ज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करून जितका आपण निसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय, तितकाच निसर्ग आपल्याला प्रबळ असल्याची जाणीव अधिक तीव्रतेने करून देतोय. हवामान उलटपुलट करून टाकतोय. विचित्र हवेमुळे विविध आजार निर्माण होतायंत. या आजारांवर औषधनिर्मिती होईपर्यंत अजून वेगळे आजार तयार होतात. आमचे डॉक्टर बरेचदा ‘एअर बाउंड इन्फेक्शन’ हा शब्द वापरतात. म्हणजेच हे सगळं हवामानातल्या बदलामुळे होतंय.

मध्यंतरी एक गोष्ट वाचली होती. कुणाची होती आठवत नाही. पण त्यात एक चौकोनी कुटुंब दाखवलं होतं. कदाचित पुढच्या २० वर्षांनंतरची ती कथा होती. (तरीही त्यात आईचं घरचं सगळ सांभाळताना दाखवली होती.) त्यातली आई घरात आलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे साठे तपासत होती. आणि ते तिच्या बजेटमध्ये बसतात की नाही, मागणी केल्यावर मिळतात की नाही, हे बहुधा तपासत असल्याचं आठवतंय. ते करतानाच ती    

आई आपल्या आठवीत आणि दहावीत असलेल्या मुलांना इतकंच खेळा, खूप हालचाल करू नका, इतकंच चाला, नाही तर तुमचा ऑक्सिजन संपेल असं सांगत असते. मुलगा दहावीचा विदयार्थी असल्यानं त्याच्यासाठी खास ऑक्सिजन पॅक ती ऑर्डर करते. कारण त्याला जास्त अभ्यास आहे. या कथेतून पुढच्या काळात आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल, असं दाखवलंय. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असतं असं मानलं जातं. त्यामुळे बरेचदा विज्ञान कथा आधी एखादी गोष्ट सांगते आणि मग ते सत्यात येते. 'जे न देखे रवी, ते देखे कवी' असं म्हणतात ते याचसाठी. बरचसे वैज्ञानिक चित्रपट येऊन गेले की, मग त्या गोष्टी घडताना दिसतात. सुपर हिरोज हेही अशा पुढच्या काळातल्या गोष्टींचा विचार करूनच तयार होतात. हे सगळं लक्षात घेतलं आणि खरोखर हवामान बदलावर नुसतं लक्ष ठेवलं, तर हे खरं होईल की काय, अशी भीती वाटते.

आपणच वायू, जल यांचे प्रदूषण करून, प्लास्टिक कचरा वाढवून इतका अन्याय करतोय की, तो निसर्ग हवामान बदलतोय. म्हणजे आपणच आपलं हवामान बिघडवतोय का? वृक्षतोड, सिमेंटच जंगल, नदी-सागरांचे प्रदूषण, वाळू उपसा, डोंगरांवर ट्रेकिंगच्या वेळी केलेली हानी किंवा प्रदूषण, प्लास्टिकचा वाढता वापर, गाडयांची प्रचंड वाढ, जागोजागचे विविध सण साजरे करताना वापरलेल्या कर्णकर्कश स्पीकरच्या भिंती हे सगळं आपल्याला टाळता येईल का? याचा विचार करणं आजच्या जागतिक हवामानदिनानिमित्त सुरू करू या. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो आपण आपल्या पातळीवर हे कसं काय करू शकतो हे तुम्हीही आम्हाला कळवा. तुमच्या प्रतिक्रिया वाईट हवामान बदलाला रोखणाऱ्या असू शकतील.  

- पल्लवी गाडगीळ

[email protected]