व्याघ्रासन

 

गेल्या रविवारी मित्राच्या घरी गेलो होतो. सुट्टी म्हणजे सगळे मजेत असतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात तिथे खूप गोंधळ, गोंगाट चाललेला दिसला. मित्राच्या दोन गोंडस भाच्यांनी रडून घर डोक्यावर घेतलं होतं.

“मुग्धा, स्निग्धा .... इकडे या बघू. मला सांगा काय झाल ते”,मी म्हणालो. रडवेल्या चेहेऱ्यानेच फुगलेले गाल घेऊन त्या माझ्याजवळ आल्या.

“आम्ही प्राणी बघायला कात्रजच्या बागेत गेलो, तर बाग बंद होती. आम्हाला छान छान प्राणी बघायचे होते.“

“एवढंच ना?अगं, ते सगळे प्राणी उलट तुम्हाला भेटायचं म्हणून इथं घरीच आलेत!!!”

“अय्या हो ssssकुठायतssss?” इवलेसे डोळे जास्तीत जास्त मोट्ठे करून दोघी ओरडल्या.“तुम्ही डोळे मिटा बघू आणि मी सांगितलं की उघडा.”त्यांनी डोळे मिटल्यावर मी योगासनांमधील व्याघ्रासनाची पोझ घेतली.“हं, आता उघडा डोळे.”त्यांनी डोळे उघडल्याबरोब्बर मी वाघासारखा तोंडाचा मोठा आ वासत डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला चढवला.सगळं रडणं, रुसणं विसरून क्षणार्धात दोन गोंडस पऱ्या माझ्याबरोबर खेळात सामील झाल्या. नंतर जवळजवळ तासभर आम्ही योगासनांमधील वेगवेगळ्या पोझेस आणि त्याच्याशी साधर्म्य असलेले प्राणी, पक्षी, निसर्गातील घटक असा खेळ खेळत धम्माल केली. हे वाचून तुमच्याही मनात खूप उत्सुकता निर्माण झाली असेल ना? मग तुम्हालाही सांगतो हा मजेशीर निसर्गयोग कसा खेळायचा ते!

आपण एका मोठ्या जंगलात आलो आहोत बरं का! इथे खूप खूप झाड आहेत (वृक्षासन करावं) या जंगलात की नाही भरपूर प्राणी देखील आहेत.

ओळखा पाहू कोणते आसन आहे?

वाघ-व्याघ्रासन, सिंह-सिंहासन/सिंहमुद्रा, हत्ती-गजमुद्रा, ससा-शशांकासन, फुलपाखरू-बद्धकोनासन, गरुड-गरुडासन, मोर-मयुरासन, चतुर/टोळ–शलभासन.

वडाच्या एका मोठ्ठ्या झाडाखाली एक वारूळ दिसतंय. त्यातून एक मोठ्ठा नाग फुस्सssssअसा आवाज करत फणा काढून बाहेर आलाय (भुजंगासन करावं).

आपल्याला एक तळ दिसतंय. त्यात बगळा(बकासन, मासा(मत्स्यासन), कासव(कूर्मासन) होडी-पोटावरचे नौकासन, नौका-नौकासन,  हंस-हंसासन दिसले का?

निसर्गातूनच आलेले हे आसन

याचप्रमाणे मारुती-हनुमानासन, इंद्रधनुष्य–कमान(पूर्ण चक्रासन), धनुष्य-धनुरासन, डोंगर-पर्वतासन, दरी–पाठीवरचे नौकासन, पर्वत-ताडासन, उडवण्याचा पतंग-पतंगासन, विमान-विमानासन, कबुतर-कपोतासन, चंद्र-अर्धचंद्रासन, मांजर-मार्जारासन अशी आसनेही करता येतील.

 

भारतीय परंपरेतील योगशास्त्र हे आता सगळ्या जगभर विस्तारलंय. पातंजलयोगात यम, नियम, आसने, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी आठ अंगे आहेत . पण त्यातला आसन हा भाग मात्र फारच लोकप्रिय आहे. हठ्योगातील इतकी विविध आसन ही आपल्या ऋषीमुनींना कशी सुचली असतील बरं असा विचार नेहमी आपल्या मनात येतो. अहो, सतत निसर्गाच्या सान्निध्यात राहून, त्याच्याशी मित्रत्व राखूनआणि त्याचं चिंतन करून त्या निसर्गाचेच वेगवेगळे घटक आपल्या पूर्वजांनी आसन म्हणून स्वीकारले. आपलं  शरीर-मन तंदुरुस्त राखणारी ही आसने आपण तर दररोज करायला हवीतच आणि आपल्या मुलांनीही ती लहानपणापासूनच आवडीने करावीत, यासाठी त्यांच्याशी वर सांगितलेला निसर्गयोग खेळायला हवा. या खेळातून आपल्या आत लपलेलं बालपणही हळूच डोकावेल!

-मनोज पटवर्धन

-[email protected]