चिवचिव चिमणी...

दिंनाक: 20 Mar 2017 12:29:27

 

चिऊकाऊच्या गोष्टीत भेटणारी चिऊ

अचानक तुझी आठवण झाली. तू दिसली नाहीस सकाळी. गेल्या कित्येक दिवसांपासून, तू कधीतरी येतेस. दिसली नाहीस तरी निदान तुझा आवाज येतो. कधी दूर आकाशात उडत असलेली दिसतेस. मला तू भेटलीस, तेव्हा मी वर्षा-दोन वर्षाची होते. तुझ्यापेक्षा उंचीने कितीतरी पट मोठी. तरी मला तू हवीहवीशी वाटायचीस. कारण तुझ्याशी गट्टी करण्याचं, माझी भाषा शिकत असताना तुझ्या भाषेत शिकण्याचं बाळकडू मला मिळत गेलं. आजूबाजूला वावरणारे अनेकजण होते. पण ती तूच होतीस, जी मला घडवत होतीस. तुझा आवाज आला की, मी तुला ओळखत होते. खिडकीजवळ जाऊन, दाराकडे धाव घेऊन तुला शोधत होते. तू दिसलीस की, टाळ्या वाजवून मी आनंद व्यक्त करत होते. कधी तू चिऊ, कधी चिऊताई तर कधी चिवचिव चिमणी ही झालीस... माझ्यासाठी.

आपल्या बालपणी सर्वात प्रथम आपल्याला भेटलेली आणि आपली गट्टी जमलेली ती चिऊताई, कशी कोण जाणे, पण तिने आपल्या बालवयाचा एक पटच व्यापून टाकलाय. जो आपण आपल्या पुढच्या पिढीला आंदण म्हणून देत आलोय. आपल्या अवतीभवती वावरत चिवचिवणारी चिमणी! कधी घराची पायरी ओलांडून आत आली नाही ती. अंगणातच वावरली, तिथच रमली, जमलंस तर घराच्या वळचळणीला बांधलं तिनं एखादं घरटं, नाही तर माणसांचा तिला तिटकाराच. असं असलं तरी माणसांशिवाय तिचं पान काही हललं नाही कधी.

या चिऊताईच्या गोष्टीतून म्हणा, कधी तिचा घास आई भरवत असताना म्हणा, ती आपल्याला हसवत आपलं अस्तित्व सिद्ध करत होती. आणि त्याच वेळी अगदी सहजपणे कधी आपलं नावही अशाच एका चिमणीला देऊन टाकत होती.

खरं तर चिऊताईला न ओळखणारा विरळाच असेल किंवा नसेलही. म्हणूनच आपल्या या चिऊताईला आपण दिलेलं हे आदरार्थी नावही आपल्याला बालवयातच संस्कारक्षम करून गेलं. एवढीशी ती, पण अंगण नसलेल्या शहरातल्या घरात डोकावून जाते. खिडकीजवळ येऊन आवाज देते. तिच्यासाठी काही ठेवलं असेल तर ते घेते, नाहीतर अशीच निघूनही जाते. एकटी येते किंवा आपल्या सोबतीनीना घेऊन येते. म्हणूनच तिला इंग्लिशमध्ये house sparrow म्हटलं आहे.

चिऊ-काऊच्या गोष्टीतून ती संकटात पडलेल्या काऊला मदतीचा हात कसा द्यायचा ते आपल्याला शिकवते; तर 'एकीचचं बळ' या गोष्टीत फासेपारध्यानं टाकलेल्या जाळ्यात अडकल्यावर सगळ्या चिमण्या ते जाळ घेऊनच उडतात आणि आपली सुटका कशी करून घ्यायची असते, हेही शिकवतात. 'कावळे दादा, कावळे दादा, माझा घरटा नेलास, बाबा?'
'नाही ग बाई, चिऊताई, तुझा घरटा कोण नेई? या बालकवींच्या कवितेतून एक कवी आपल्याला बालवयात समजत असतो. दुसरीकडे
तिच्यावर आधारित असलेल्या बडबडगीतातून ती आपल्या बोबड्या बोलाला एक तालही देते. चिमणे -चिमणे खोपा दे... असे म्हणत आपण मातीत तिच्या सोबत खेळ करत असतो. खोपा बनवत असतो.  कधी स्वप्नात येऊन आपल्याला तिच्यासोबत घेऊन जाते, कधी आपली सवंगडी होते, तर कधी आपली मैत्रीण होते. आपल्याला विहार करायला शिकवते.

अशी ही चिमणी काही बदलली नाही, पण आपण बदललो. ती आपल्या विस्मरणात गेली. आपण न बांधलेलं अंगण तिला पारखं झालं, आपण ते केलं. खिडक्यांना तावदानं लावून तिचा मार्ग बंद केला. म्हणूनच ती दूर दूर गेली आपल्यापासून. या शहराच्या बदलत्या रूपात जर आपणच हरवून चाललोय तर तिची काय गत.

एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशी मौखिक परंपरेनं जपलेली या  चिऊताईची गोष्ट कालौघात नष्ट तर होणार नाही ना? ज्या चिऊताईनं आपल्याला जगण्याचं बाळकडू दिलं, तिच्यासाठी आपण काही करावं, असं मनापासून वाटू लागलंय आज! सहजच नेटवर सर्च करता-करता लक्षात आलं की, आपल्या आधी अनेकांनी ही मोहीम हातात घेतलेली आहे. आपणच खूप मागे आहोत.

पण आपण 'देर से सही...' ही सुरुवात करायला काय हरकत आहे. या निसर्गाचा समतोल राखण्यासाठीसुद्धा या इवलुश्या चिऊताईचं तेवढंच योगदान आहे. हेही आपल्याला विसरता येणार नाही. मग लावू या ना!  आपण प्रत्येकानं एखादं रोपट आपल्या चिऊसाठी! आणि तयार करू या एखादं एक अंगण... तिच्यासोबत आपल्यासाठीही...

-शारदा गांगुर्डे

[email protected]