खेळ.... चौथी गरज

दिंनाक: 18 Mar 2017 14:15:03
खेळ : जडण घडणीचा एक आवश्यक भाग

‘'अरे ऊठ आता त्या टीव्हीसमोरून'', “ठेव रे, तो हातातला मोबाईल", अशी वाक्य आता लहान मुलांसाठी घरोघरी देवांच्या स्तोत्रांपेक्षा जास्त ऐकू येतात. या यंत्र युगामध्ये लहान मुलांपासून अशी साधने दूर ठेवणं, त्याचा प्रभाव कमी करणं, हे सध्या तरी पालकांसाठी आव्हानात्मकच काम आहे. साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून थोडं मोकळ्या हवेत संध्याकाळच्या वेळी या बालकांनी खेळावं अशी तमाम सुजाण पालकांची अपेक्षा असते. अर्थातच, ती अपेक्षा अत्यंत योग्य आहे. पूर्वीप्रमाणे घराजवळच्या अंगणात वैगेरे खेळायला जागाच उरलेली नाही. सध्या त्या अंगणाला ‘पार्किंग’ म्हणतात. आता ‘अशा’ अंगणात आपल्या पिल्लाला खेळताना बघितलं की, त्या आईबाबाचं मन अगदी सैरभैर होतं. खरोखरीच, या मुलांना जागेअभावी "मोकळा श्वास" घेऊन मनसोक्त खेळता येत नाही, त्यासाठी खरोखरीचं आरोग्यपूर्ण (हेल्दी) असं वातावरण घराच्या अवतीभोवती नसतं. हे सगळं वाचून तुम्ही म्हणाल, "यात तुम्ही नवीन काय सांगताय, यावर एखादा तोडगा सूचवा." खरंय, हे सगळं आणि  नकारात्मकही वाटतंय, पण ते तसं नाहीये. या दुष्टचक्रातून, भूलभूलैयातून बाहेर पडायचा एकमेव मार्ग म्हणजे क्रीडांगणे.  

मुक्त खेळ

ही क्रीडांगणे, साधारणपणे ३ ते १२ वयोगटाच्या मुलांचे  मोकळ्या मैदानात, मोकळ्या वातावरणात विविध खेळांमधून शारीरिक आरोग्य, तसेच मानसिक आरोग्य शास्त्रीयदृष्ट्या जपायचा, जोपासायचा प्रयत्न करतात. शास्त्रीयदृष्ट्या म्हणजे मुलांच्या शारीरिक व मानसिक वयानुसार, एकसारखी क्षमता असणाऱ्या मुलांच्या गटानुसार, त्यांच्या रोजच्या जगाशी वेगवेगळ्या खेळातून संधान बांधत, बरोबरीने वेगवेगळे नवीन अनुभव (वयोगटानुसार) त्यांना देणे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे एक हसतं-खेळतं मुल पुढे जाऊन एक उत्तम नागरिक बनतं. म्हणजेच सध्याच्या काळात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही की, या वयाच्या मुलांच्या अत्युत्तम संगोपनात क्रीडांगणांचीही खूप मदत होते. इथे मुलांच्या सर्वांगीण विकासावर प्रामुख्याने भर दिला जातो. पण ही सगळी प्रक्रिया खूप खूप आनंद देणारी आणि हवीहवीशी वाटणारीच असते. हा वयोगट म्हणजे भविष्यात ‘माणूस’ म्हणून कसा घडेल हे ठरवणारा असतो, असे म्हणायला हरकत नाही. म्हणून कमीतकमी वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत तरी मुलांनी मुक्त खेळ खेळले पाहिजेत. त्याचं कारण असं की, त्या मुलाची स्वत:च्या बाबतीतली, तसंच त्याच्या अवतीभोवतीच्या जगाच्या बाबतीतली मतं, विचार बनायला लागतात. मुक्त खेळ खेळताना हार-जीत, दुसऱ्याची खेळण्याची पद्धत, वेळेचे गणित (टायमिंग सेन्स), खेळातले डावपेच हे फक्त प्रतिस्पर्धी म्हणून नाही तर ‘आपल्यासारखाच कुणीतरी’ समोर असताना अगदी सहजपणे विचारात घेतले जातात म्हणजेच ज्याला आपण ज्याला ‘स्पोर्टिंग स्पिरीट’ म्हणतो, ते वाढीस लागतं.

पारंपारिक खेळ

म्हणजेच क्रीडांगणात खेळताना समानता, हार-जीत, दुसऱ्याशी शेअरिंग, एकजूट असे सहचाराशी निगडित  गुणांचे संस्कार मुलांवर हसतखेळत केले जातात. तसेच मनाची एकाग्रता, हस्तकौशल्य, कल्पनाशक्तीची वाढ, विचारांना चालना, स्वावलंबन, आत्मभान, छोट्या छोट्या सामाजिक गोष्टींची जाणीव व त्याबाबतची संवेदनशीलता अशा स्वत:शी निगडित गुणांच्या वाढीसाठीही जाताजाता सहज, पण सातत्याने प्रयत्न होत असतात. हसत-खेळत निखळ आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करताना त्यांच्यातल्या संवेदनशीलतेची, कलेची जोपासना केली जाते. क्रीडांगणात मनमुक्त खेळावर, मनमुक्त अभिव्यक्तीवर भर दिला जातो. त्यामुळे तेथील प्रत्येक ‘प्रशिक्षक’ त्यांच्या मुलांच्या वयोगटानुसार महिन्याभराच्या खेळाचं, कलाकृतीचं नियोजन करतात. अधूनमधून सणांवार साजरे करणं, काही तज्ज्ञांची भेट घडवून आणणं, वेगवेगळ्या ठिकाणी सहली नेणं अशा गोष्टीही नियोजनात असतात. रोजच्या नियोजनात व्यायाम, प्राणायाम आणि विविध खेळ, वयोगटाप्रमाणे गाणी, गोष्टी, गप्पा यांचाही अंतर्भाव असतो. हे संपूर्ण नियोजन करताना फक्त मुलांचाच विचार केला जातो. ‘गोष्टी’ हे माध्यमही या वयाच्या मुलांसाठी खूपच परिणामकारक ठरते. याच नियोजनात सहामाही किंवा वार्षिक पालकसभांचाही अंतर्भाव आवर्जून केला जातो. या  सभांमधून पालकांना त्यांच्या पाल्यांबद्दलची निरीक्षणे, दिसून येणारे, घडत जाणारे बदल, त्यांच्यातली एखादी क्षमता की, जी खेळा दरम्यान, कृतीखेळा दरम्यान जाणवून येते त्याबद्दल सांगितले जाते. तसेच कधी विनाबाक्षीस स्पर्धा किंवा सर्वबक्षीस स्पर्धा, सुट्टीतली गंमत शिबीरे यांचीही जोड असते.

या सर्व प्रयत्नातून १२ वर्षापर्यंतच्या मुलामुलींच एक चांगलं, निरागस, हसतखेळत बालपण टिकवून ठेवण्याचा, मानस असतो. थोडक्यात, अशा क्रीडांगणामधून without policing, under observation ही मुलं अतिशय निरागस आरोग्यपूर्ण वातावरणात वाढतात. या सर्व वातावरणातून ती त्यांच्या आयुष्यासाठीचा आत्मविश्वास घेऊन बाहेर पडतात.

  • भाग्यश्री हलदुले
  • (लेखिका प्रत्यक्ष या वयोगटातल्या मुलांबरोबर काम करते. ती  समुपदेशनाच्या क्षेत्रात आहे. )