रंगांची उधळण.... 

दिंनाक: 17 Mar 2017 11:06:18
वसंतातला सूर्योदय

आज रंगपंचमी.  रंगोत्सव. होळीत रजतमाला जाळण्याचा प्रयत्न असतो , तर रंगपंचमी म्हणजे तो प्रयत्न सफल झाल्याचा आनंद साजरा करणं असतं , तेही रंग उधळून! रंग आपल्या आयुष्यात उधाण आणतात. रंग नसतील, तर आयुष्य बेचव, निरस , कंटाळवाणं  होऊन जाईल. निसर्गापासून माणसाच्या मनापर्यंत सर्वत्र रंगांनी आपलं प्राबल्य टिकवून ठेवलंय .   

ज्वाला आणि त्याचा एक लोभस रंग घेऊन येते होळी. आदिमानवाने दगडावर दगड घासून तयार केलेला नैसर्गिक ज्वाळेचा अस्सल रंग. प्रेरणा देणारा, उर्जा देणारा, आयुष्य देणारा. आपणच मग मागवून त्याला संस्कृतीचे वैगरे निरनिराळे रंग दिले. त्यात आपल्या मनातल्या वाईट विचारांना तिलांजली देण्याचा एक संस्कार पिढ्यानपिढ्या आपल्यावर होत राहिला. वाईटाला नकार आणि चांगल्याचा स्वीकार करण्याचा हा दिवस. या चांगल्याचा स्वीकार केला की, आपलं आयुष्य किती रंगीबेरंगी होतं हे सांगण्याचा उत्सव, रंगाचा उत्सव. मनाला सकारात्मक उर्जा देणाराही रंगच जणू. रंगांचा हा उत्सव म्हणजे निसर्गाचं आंदणच...आपुलकी, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर यांची शिकवण देण्याची ही आगळीवेगळी पद्धतच काहीशी. ‘रंग माझा वेगळा...’ जपणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मनात डोकावायला लावणारा आणि तरी आपल्या आजूबाजूला असणारे रंग बघायला प्रवृत्त करणारा उत्सव. मानसिक पातळीवरच्या या रंगपरिवर्तनाला देखणा मुलामा देणाराही हाच रंगोत्सव.

वसंत घेऊनच येतो खरी रंगांची उधळण, त्याची सुरुवातच होते मोहक. सूर्याच्या किरणांशी नातं सांगण्यासाठी आसुसलेला वसंत. आजूबाजूला सगळीकडे सोनेरी पिवळसर रंगाच्या निरनिराळ्या छटांची उधळण. दिवसाच्या निरनिराळ्या प्रहरी याच रंगाच्या छटांचं एक कोंदण होऊन राहत आपल्या मनात. जगण्याला सकारात्मक उर्जा देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या सुंदर रंगाचं सुंदर कोंदण. या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती हिरवाईही अगदी गडद होते, लक्षात राहण्याजोगी. जुनाट, मातकट कौलारही लक्ष वेधून घेतात, जाता-येता. ओक्याबोक्या झाडांना येणारा पालवीचा रंगही वासासकट आवडून जातो आपल्याला. निरनिराळ्या रानमेव्याचा नेत्रसुखद रंग आपल्या जीभेवरही तरळतो आणि अलगद डोळ्यांत उतरतो त्याचा आंबट तरी हवाहवाश्या चवीनं. रखरखत्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला येणारा हा शांत, सुखद हिरवा, जिवाचं जगणं हलकं करणारा रंग.... पण या सगळ्याचं एक अतूट, अपरिहार्य नातं आहेच सूर्याशी. तसं ते आपल्या प्रत्येकाचंच आहे.... पण वसंताचं आणि त्याचं दुष्ट लागण्याजोग आहे खास. अभिन्नस. नवलाईचं, सर्जनाचं.

रंगच आपल्याला खूप जवळून समजून घेतात आणि व्यक्त होतात, आपल्या डोळ्यांतून निरनिराळ्या पद्धतीने. आपलं अंतरंग जगासमोर मांडत..... रंग नाही फसवू शकत मनात दडलेल्या आपल्या “रंगाला”. त्याचच अप्रूप असतं... डोळ्यांतून ओसंडून वाहणाऱ्या अंतरंगातल्या रंगाचं. हे अंतरंगातले रंग काही समजुतीचे, काही असमजुतीचे, काही उगाच बेरंगशे.... आतल्याआत काळवंडलेले..... पण काही असतात तजेलदार... बहरून आलेले.... भन्नाट..... नवी उर्जा देणारे, नवे अस्तित्व देणारे.... आपले आतले... आपल्यासाठीचे.... नवी उमेद की काय म्हणतात ते देणारे... आलटून पालटून आपले येतात, त्यांच्या सोयीने... आभाळातल्या उन्हासारखे... थांगपत्ता न लागू देणारे... कधी कोवळीक सांगणारे, कधी निरागस भासणारे... अलगद उतरत जातात मनाच्या एका कोपऱ्यात... कायमचे... रंगांनी भारलेलं हे आपलं मन तुडूंब भरलेलं असतं कशाकशाने..... सतत कसला तरी एक रंग व्यापून असतो आपलं मन. कधी आनंदलेला, कधी निराशलेला, कधी कोमेजलेला, कधी तणावलेला, कधी उधाणलेला असतो हा रंग.... मनाचा रंग. भावनेलाही रंग असतोच हा, तो दिसतो मात्र आपल्या सोयीने.... आपल्याला हवी ती छटा दाखवणारा... आपला असणारा... आपला अस्सल रंग...आपल्या स्वभावाचा रंग... फक्त आपल्यालाच माहिती असणाऱ्या वसंतातल्या सूर्यसारखा प्रहरानुसार बदलणारा ... वेगवेगळ्या छटांनी बहरलेला, फुललेला आणि तरी फक्त आपलाच असणारा... 

-डॉ. अर्चना कुडतरकर 

[email protected]