कमलपुष्प
हिरवा चाफा कमळ निळे
सुखद सुमांचे गंध मळे
 
कवी यशवंत देवांची ही साधीशी कविता फार मोठा आणि वेगळा आशय मांडणारी, असली तरी त्यातल्या या वरील दोन आेळी मात्र माझ्या विशेष आवडीच्या आहेत. 
किती सुख होतं या ओळी  म्हणताना. 
त्यातील चाफा हा आपल्या माहितीचा असतो. इथे तिथे कधी सहज भेटलेलाही असतो,  पण निळं कमळ; ते मात्र मोठं तालेवार फूल. सहजी दृष्टीस पडणारं नव्हेच. मला लहानपणापासून या कमळांचं भारी आकर्षण वाटायचं. कमळ असलेली चित्र फार भुरळ घालत. पण एकदा प्रत्यक्ष उमललेलं राजस कमळ पाहिलं तेव्हा, वाटलं चित्रात दिसणाऱ्या फुलापेक्षा प्रत्यक्षात दिसणारं याच रूप किती अनुपम आहे. पांढऱ्या शुभ्र कमळातील ती गोल पिवळी तबकडी त्यावर मऊ मुलायम असे पिवळे सोनेरी केसर. त्यात बंदिवान व्हायला झेपावणारे काळे, पण मयुरवर्खी रंग मिरवणारे भुंगे. सगळचं किती लोभसवाणं. पाकळ्यांचा शुभ्र सात्विक रंग आणि जोडीला असलेला मंद सुगंध. अगदी अवर्णनीय. 
कमळ
भारतात अगदी विपुल प्रमाणात सापडतं ते पद्म म्हणजेच लक्ष्मी कमळ. ज्याचा रंग हलका गुलाबी असतो. सर्वसाधारणपणे याला पाच पाकळ्या असतात. आठ, बारा आणि अगदी एकशेआठ पाकळ्यांची सुद्धा कमळं बघायला मिळतात. पांढरं कमळ पुष्प म्हणजे पुंडरीक, तर नीलवर्णीय पुष्कर. सर्वसाधारणपणे कमळासारखी दिसणारी, पाण्यात वाढणारी सगळी फुलं म्हणजे आपण कमळं समजतो; पण तसं मुळीच नसतं. नि॑फिएसी या एकाच कुळात मोडणाऱ्या या सगळ्या पाणवनस्पती असल्या तरी यांच्या फुलांमध्ये मोठा फरक आहे. 
श्वेत कुमुदिनी
 
कमळाची पानं आणि फुलं पाण्यापासून उंच वाढतात.  या फुलांच्या मध्यभागी गोल, सुरेख तबकडी असते. त्यातील किंजात गोल वाटोळ्या बिया तयार होतात. त्या रूजून पुढे नवे रोप  होते. याशिवाय  कमळ फुलांसारखी दिसणारी आणि पाण्यात वाढणारी दुसरी वनस्पती म्हणजे वॉटर लिली. हिला पोसर असंही एक नाव आहे. बाजारात किंवा एखाद्या देवस्थानाबाहेर जी कमळ फुले विकली जातात ती बरचेदा या वॉटर लिलीची फुले असतात. यांचं देखणेपण जराही उणं नसतं. उलट कमळ फुलांपेक्षा अधिक वेळ ही फुलं पाण्याबाहेर टवटवीत राहतात. यांच्यात अनेक रंग बघायला मिळतात. 
काही वॉटर लिली या चंद्रविकसी असतात. ज्या रात्री चंद्र प्रकाशात उमलतात. 
थायलंड,  व्हिएतनाम सारख्या देशात यांची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. यांच्या देठामधील तंतूंपासून वस्त्र विणलं जातं.  ज्यांला  लोटस सिल्क म्हणून ओळखतात. हे खूप महाग असतं.  याशिवाय फुलातील केसरांपासून लोटस टी बनतो. हे झालं  वॉटर लिलीबद्दल.  
कमळाचे औषधी उपयोगही अनेक आहेत. शीतल गुणकारी कमळ पाकळ्यांपासून कमलकंद बनतो. याच्या बिया कोवळ्या असताना कच्या खाल्या जातात. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असतं. कमळाचे पाण्यातील कंद भाजीसाठी वापरले जातात; तर बिया भाजून लाह्या बनतात. 
अशी ही बहुउपयोगी जलपुष्प आपल्याला घरच्या घरी सहज लावता येत नाहीत. 
 पण मोठ्या गच्चीत किंवा एखाद्या बागेत यांची लागवड करता येते. 
 या लेखासोबत मी माझ्या बागेत वाढवलेल्या सुंदर कमळ पुष्पांचे फोटॊ जोडतेय. ते पाहिलेत की, या फुलाच्या सौंदर्याची तुम्हाला कल्पना येईल आणि माझ्या सारखेच तुम्ही ही याच्या प्रेमात पडाल. 
- मैत्रेयी केळकर
 (लेखिकेची स्वतःची गच्चीवरची  केलेली बाग आहे.  त्यांचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास आहे. त्या शिक्षिकाही आहेत. )