वैशाली सरोदे : मेळघाटातल्या जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षिका 

 

 

 

 

 

 

 

शिक्षकाचे नाव: वैशाली विश्वासराव सरोदे

शिक्षण :- एम .ए.,  डी.एड.

शाळेचे नाव : जि. प. पूर्व माध्यमिक शाळा  गरजदारी, ता. चिखलदरा , जि. अमरावती .

 

वैशाली  विश्वासराव  सरोदे या  मेळघाटातल्या  जिल्हा परिषद  गरजदरीच्या शाळेत सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.  येथील  दुर्गम भागातली बोलीभाषा कोरकू, गोंडी  आहे. बोलीभाषा आणि व्यवहारभाषा  यातील  मोठ्या फरकामुळे वैशाली सरोदे यांना अध्यापनात अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः मराठी भाषेचे अध्यापन करताना प्रमाण भाषेची  अडचण येत होती.  ही अडचण सोडवण्यासाठी वैशाली सरोदे यांनी कोरकू आणि मराठी यांमध्ये  दुवा साधण्यासाठी  विविध अध्यापन साहित्य तयार केले. त्यासाठी त्या स्वतः दोन वर्षे तेथील गावांमध्ये राहून ‘कोरकू’ भाषा  शिकल्या. येथील  मुलांच्या रोजच्या वापरातील वस्तूंची नावे वेगळी आहेत; हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या वस्तूंचा वापर शैक्षणिक साहित्य म्हणून  केला. मुलांच्या  दृक्-श्राव्य क्षमता ध्यानात घेऊन, त्यांच्या परिचयाच्या वस्तूंपासून  मुळाक्षरांसाठी चित्रकार्डस आणि अंकलिपी तयार केली. वस्तूचे चित्र, त्याचे मराठीतील आणि कोरकू भाषेतील नाव असे तक्ते तयार केले. मराठी आणि कोरकू भाषा जोडता येतील असे ऑडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये ध्वनिमुद्रित केले. ते विद्यार्थ्याना ऐकवले. मराठीतली बडबडगीते कोरकूमध्ये भाषांतरीत केली.शब्दसंग्रह वाढून कोरकू शब्दकोश तयार झाला. खेळ, नाटुकल्या यांचे सादरीकरण केले. जोपर्यंत विद्यार्थी  भाषेशी जवळीक साधत नाहीत, तोपर्यंत त्यांना शाळेत येण्यात, अध्ययनात रस वाटणार नाही; हे वैशाली सरोदे यांनी जाणले  होते. श्रवण, भाषण, वाचन, लेखन या भाषा शिकण्याच्या पायऱ्या चढताना बोलीभाषेच्या आधारे प्रमाणभाषेची सवय विद्यार्थ्यांना लागेल. हे लक्षात आल्यावर वैशाली  सरोदे यांनी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी  'आम्ही पण मराठी वाचणारच...' हा उपक्रम राबवायचे ठरवले. त्यासाठी स्थानिकांची, सहकारी शिक्षकांची  मदत घेऊन धडपड केली. शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाची दरी कमी झाली. परिणामी विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची नियमितता वाढू लागली. विद्यार्थ्यांना अध्ययनात  रस वाटू लागला. एका महिन्याच्या सरावानंतर विद्यार्थ्यांचे उच्चार स्पष्ट झाले. त्यातून वाचनाची आवड निर्माण झाली. मराठीचे अभ्यासक्रमाचे पुस्तक, त्यातील कविता यांचे वाचन सुरू झाले. बोलीभाषेतून प्रमाण मराठीकडे येण्यासाठी हा उपक्रम  उपयोगी ठरला. महाराष्ट्रात विविध आदिवासी भाषा बोलल्या जातात. अशा क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता पूर्ण करता येतील.

 [email protected]