अभिवादन संतश्रेष्ठ तुकारामांना
दिंनाक: 14 Mar 2017 12:13:54 |

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना नम्रभावाने अभिवादन करू या! संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माच्या मंदिराचा पाया घातला. त्या मंदिराचा कळस म्हणजे संत तुकाराम महाराज! संत तुकारामांच्या साक्षात शिष्या संत बहिणाबाई यांनी म्हटले आहे -
‘‘ तुका झालासे कळस । भजन करा सावकाश’’
संत तुकारामांचा जन्म इ.स. 1608 साली देहूच्या पावनभूमीत झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले-मोरे. आईचे नाव कनकाई. त्यांच्या घरामध्ये विठ्ठलभक्ती परंपरेने चालत आली होती. इ.स. 1630 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. दोन वर्षांच्या या भीषण संकटातून महाराष्ट्राला जावे लागले. त्याची झळ स्वत: तुकाराम महाराज व त्यांच्या कुटुंबाला लागली. डोळ्यासमोर घरातील माणसांचे मृत्यू झाले. शेती, व्यवसाय इ.चे नुकसान पाहावे लागले.
संत तुकाराम महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, त्यांची संतपदाची वाटचाल, आध्यात्मिक विकास हे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, संत नामदेवांचे अभंग, संत एकनाथ महाराजांचे साहित्य, पुराणे, शास्त्रे यांचा अभ्यास केला, चिंतन केले. भजन, कीर्तन, श्रवण, मनन, आत्मचिंतन, आत्मानुभव यांतून आपले जीवन घडवले. बाबाजी चैतन्य यांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले. ‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र दिला. ते त्यांचे गुरू होते.
संत तुकारामांची अभंगवाणी प्रसिद्ध आहे. त्यांच्या अभंगांनी, वाणीने, उपदेशाने महाराष्ट्रावर खोल संस्कार केले आहेत. लक्षावधी वारकरी पिढ्यानपिढ्या ते अभंग भजनातून गात आहेत. आपल्या कीर्तन-प्रवचनांतून त्यांचा अभ्यास करीत आहेत. आपल्या वाणीतून संत तुकाराम सतत महाराष्ट्राशी बोलत आहेत. त्यांचे चरित्र, त्यांचे तत्त्वज्ञान, सामाजिक जाणीव, आध्यात्मिक अनुभूती हा वर्षानुवर्षे महाराष्ट्राच्या अभ्यासाचा-चिंतनाचा विषय आहे. आपल्या अभंगांविषयी ते म्हणतात,
‘‘करितो कवित्व म्हणाल हे कोणी ।
नव्हे माझी वाणी पदरीची ॥
माझीये युक्तीचा नव्हे हा प्रकार ।
मज विश्वंभर बोलवितो ॥
काय मी पामर जाणे अर्थभेद ।
वदवी गोविंद तेचि वदे ।
निमित्त मापासी बैसविलो आहे ।
मी तो काही नव्हे स्वामिसत्ता ॥
तुका म्हणे आहे पाईकचि खरा ।
वागवितो मुद्रा नामाची हे ॥
त्यांची ही भूमिका किती नम्रतेची आहे, हे लक्षात येते.
संत तुकारामांनी आपल्या हजारो अभंगांतून रसाळ, उत्स्ङ्गूर्त उपदेश केला आहे. सामान्य माणसांना जगण्याचा मार्ग दाखवला आहे. ‘विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा॥ असे म्हणून विठ्ठल भक्तीचा उपदेश केला. ‘पंढरीचा महिमा’ सांगितला. ‘जाय जाय तू पंढरी। होय होय वारकरी॥ असे सांगितले. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवूनिया॥ या प्रसिद्ध अभंगातून त्यांनी केलेले वर्णन वाचताना डोळ्यांत भक्तीचे अश्रू उभे राहतात.
संत तुकारामांनी महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण केली, हे त्यांचे महान कार्य होय. सामाजिक समतेचा आग्रह त्यांनी धरला. भेदभाव पाळू नका, असे सांगितले. अहंकाराचा त्याग करण्यास सांगितले. ते म्हणतात,
‘‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वर - पूजनाचे ॥
समाजातील दु:खीकष्टी माणसांना जवळ घेतो, त्यांचे दु:ख दूर करतो, तोच खरा संत. किंबहुना असा दयेचा, मायेचा वर्षाव करणारा संत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचीच मूर्ती असते. संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात,
‘‘जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्ता ॥
ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥
तुका म्हणे सांगू किती । तोचि भगंवताची मूर्ती ॥
संतांची लक्षणे, भक्तांची लक्षणे अतिशय सूत्रबद्ध रीतीने त्यांनी सांगितली आहेत. ‘तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥ ‘भूतांची दया हे भांडवल संता ।’ अशी सूत्रे त्यांनी सांगितली. क्षमा करण्याचे महत्त्व सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘क्षमाशस्त्र जया नराचिया हाती ।
दुष्ट तयाप्रती काय करी ॥
तृण नाही तेथे पडला दावाग्नि ।
जाय तो विझोनि आपसया ॥
अशा सुंदर अभंगातून त्यांची प्रेमळ मूर्ती दिसते. तसेच आपला समाज कसा निर्मळ, शुद्ध, कलंकरहित असावा, याची तळमळ दिसते.
संत तुकारामांनी प्रयत्नांना महत्त्व दिले आहे. ‘असाध्य ते साध्य, करिता सायास। कारण अभ्यास तुका म्हणे॥ सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आपल्याला असाध्य अशी गोष्टही साध्य करून घेता येते, असे म्हणून यशाची वाटचाल करणार्यांना संत तुकारामांनी आत्मविश्वास दिला आहे.
आपल्या साधकावस्थेच्या वाटचालीचे चित्रण संत तुकाराम यांनी आपल्या अभंगांमध्ये ङ्गारच चांगल्या रीतीने करून ठेवले आहे. आपल्या मनावर नियंत्रण मिळवणे ङ्गारच अवघड असते, आपले मन चंचल असते. ते एकाग्र होत नाही. एकाग्र झाले तरी त्याची एकाग्रता टिकत नाही. मनात विकार, वासना, वाईट विचार येतच राहतात. अशा वेळी आपणच मनाच्या शक्ती ओळखल्या पाहिजेत. आपल्या मनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे. ‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश ।’ असे ते म्हणतात. ‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती ।’ असे म्हणून मनाचा, हृदयाचा निर्मळपणा कसा महत्त्वाचा आहे, हे ते सांगतात. मन हे सारथी आहे. ज्या प्रमाणे सारथी घोड्यावर नियंत्रण ठेवून रथ आपण ठरवलेल्या दिशेने, आपण ठरवलेल्या ठिकाणीच नेऊन पोहोचवतो, त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या सामर्थ्याचेही आहे. आपले यश-अपयश हे सर्व आपल्या मनावरच अवलंबून आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात -
‘‘मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ॥
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥
आपल्या मनाला सामर्थ्यवान करणे, आपल्या मनाच्या चंचलतेवर मात करून मन स्थिर करणे, हे आपल्याला समजले पाहिजे. आपल्या सर्व यशाचे मूळ कारण आपले मन आहे. हे समजणे, म्हणजेच साधना करणे होय. आपण अंतर्मुख होणे, स्वत:च्या मनाच्या शक्तींचा विकास हे आत्मोन्नतीचे लक्षण आहे. हे आपणच आपल्याला शिकवून येणार आहे. त्यासाठी मनाच्या दोषांवर, विकारांवर मात करून मन विवेकी करणे, मनाने मनाशी संवाद साधणे आवश्यक असते. ‘मनएवं मनुष्याणाम् कारणं बंधमोक्षयो:।’ हेच खरे. आत्मचिंतन करण्याची अशी प्रेरणा संत तुकाराम आपल्याला देतात.
एक कवी म्हणून संत तुकाराम महान होते; यात शंकाच नाही. त्यांचे ‘कवी असणे’ हे आपल्या मराठीचे भूषण आहे. ‘‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ अशा शब्दांत शब्द साधनेचे वर्णन ते करतात. आपल्या कवितेतील आशय, उत्स्फूर्तपणा, चिंतन हे सर्व काही स्वत:चेच असावे लागते. ‘तुका म्हणे झरा । आहे मुळीचा चि खरा ॥ असे ते म्हणतात. आपल्या कवित्वाचे श्रेय ते ईश्वराला देतात. ते म्हणतात, ‘मज विश्वंभरे बोलविले ॥
संत तुकारामांची निःस्पृहता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक असाधारण विशेष होता. सोने आणि माती समानच मानणे, हे माणसाला अवघड असते. संत तुकाराम हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन होते. राजांनी संत तुकारामांना देऊ केलेले धन, नजराणा त्यांनी नम्रतेने परत केला. या दोन महान व्यक्तींचा संवाद, त्यांची भेट, त्यांचे गुरू-शिष्य संबंध हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या सोनेरी पानाचा आपणच अभिमान बाळगला पाहिजे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पुण्यतिथी देहू येथे संपन्न होते. हा पुण्यदिवस ‘श्री तुकाराम बीज’ या नावाने ओळखला जातो. आजच तुकाराम बीज आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून हजारो वारकरी, भक्त श्री क्षेत्र देहू येथे एकत्र येतात. त्यांना विनम्र भावाने अभिवादन करतात.
आपणही संतश्रेष्ठ तुकारामांच्या कार्याचे, चरित्राचे, तत्त्वांचे, संतपणाचे, त्यांच्या अक्षय वाणीचे स्मरण करून त्यांना नम्रतेने नमस्कार करू या!
- श्रीराम वा. कुलकर्णी