भारतीय संगीतातील वाद्य

माझ्या छोट्या दोस्तांनो,
तुम्हाला अगदी लहानपणापासून मोबाईल, टी.व्ही. या गोष्टी पाहायला मिळतात आणि आवडतातही, हो ना? पण तुम्हाला आठवतं का, तुम्ही रडायला लागल्यावर, आईने गोड गोड आवाजात ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ हे गाणं म्हटलं होतं, आजीने ‘डोल बाई डोल’ म्हणत झुलवलं होतं, बाबांनी ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’ म्हणत आकाशातली चांदणी दाखवली होती, तर छोट्या ताईने टाळ्या वाजवत हसवलं होतं. या सगळ्या आवाजांत जी जादू होती, तिने तुम्ही रडणं विसरून जायचा आणि खुदुखुदू हसायला लागायचा. अशाच काही छान छान जादूच्या गोष्टी मी तुमच्या आई-बाबांना सांगून ठेवणार आहे. 

 माझ्या मित्र-मैत्रिणींनो,
आपलं छोटंसं मूल ज्या खोलीत झोपतं ना,तिथे मंद संगीत नेहमी लावून ठेवा. खास करून सतार,संतूर असं प्रसन्न वाद्य संगीत. (Instrumental Music) खरं तर संगीताचे सूर ऐकवायची ही सवय मुलांना गर्भावस्थेत असल्यापासून लावली तर अधिक उत्तम. या सुरांचा मुलांच्या मनावर चांगला परिणाम होतो. पर्यायाने त्यांच्या तब्येतीवरही. नकळतपणे कानावर पडलेले हे सूर, त्यांचं मन शांत करतं, त्यांना शांत झोप लागते. तसेच वाढत्या वयात ती रागीट, चंचल न होता, शांत स्वभावाची होतात. 
थोडी मोठी झाल्यावर,मुलांना छोटी छोटी गाणी आवडतात. त्यांना व्हिडिओज दाखवण्यापेक्षा,गाणी नुसती ऐकवणं कधीही चांगलं. गाणी मराठी,इंग्रजी कोणत्याही भाषेतली असली तरी काहीच फरक पडत नाही. कारण मुलांना आवडतात ते सूर आणि त्याचा ठेका. ‘चांदोबा चांदोबा भागलास का’,‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’,‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’,‘झुकुझुकु झुकुझुकु अगीनगाडी’,‘Happy Bithday to you’, ‘Twinkle Twinkle little star’, ‘Baba black sheep’, ‘Five little ducks’अशी कोणतीही गाणी लावून, त्याबरोबर आपण स्वत: टाळ्या वाजवून, चेहऱ्यावर गमतीशीर हावभावासह (with action)म्हटलं, तर मुलं ती गाणी खूप enjoy करतात, आनंदाने ऐकतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल,पण आलटून पालटून एक आठवडा ही गाणी ऐकली की, त्यांना त्यातील अनेक शब्दसुद्धा लक्षात राहायला लागतात. 
विविध प्रकारच्या musical toys बरोबर खेळण्यानेसुद्धा चांगला फायदा होतो. त्यातील ऑन-ऑफ स्वीच हाताळणे, त्याच्या हालचाली निरखणे हे मुलांना सहज जमते. निरनिराळ्या प्राणी-पक्षांचे आवाज काढायला शिकवतानाही, अशीच काही गाणी आपण जुळवू शकतो. 
‘एक आला भूभू ... भू भू भू’, ‘एक आली माउ.... म्याव म्याव’, अशी गाणी हाताने ठेका धरून म्हणता येतात. 
हे सर्व करताना मोबाईल किंवा व्हिडिओजचा वापर कटाक्षानं टाळाव. म्हणजे लहान वयात डोळ्यांवर ताण पडत नाही आणि बोलणं, हातांचा वापर करणं, एकाग्रतेने शब्द ऐकणं, म्हणणं अशा अनेक गोष्टींची सवय लागते. 
पूर्ण दिवसातून एखादा व्हिडिओ दाखवायचाच झाला, तर तो सचित्र गोष्टींचा दाखवावा.
टी.व्ही.वर लागणारा सुगम गाण्यांचा कार्यक्रम किंवा लहान मुलांचा सा रे ग म प सारखा कार्यक्रम मुलांना सोबत घेऊन पाहावा. त्यात प्रत्यक्ष गातांना कलाकार दिसतात. अनेक वाद्यं वाजताना दिसतात. त्यातून त्यांना गायन किंवा वादनाची गोडी लागू शकते. त्यांच्या मनाला काय आवडतंय, याचाही अंदाज येऊ शकतो. त्यांनी एका जागी बसून तो पाहाणं अपेक्षित नाही, पण चांगलं संगीत कानावर पडणं महत्त्वाच. टी.व्ही.वरील नाचगाण्याची चित्रपटगीतं त्यांना अजिबात दाखवू नये. त्यांच्या वयाला न शोभणाऱ्या विषयावरील चित्रपटगीतं ऐकणं किंवा त्याबरोबर नाच करायला लावून त्याचं कौतुक अजिबात करू नये. 
शेवटी काय, जे पेराल ते उगवेल म्हणतात ना! मग त्यांच्या संस्कारक्षम वयात चांगलं संगीत,चित्र,गोष्टी,निसर्गात रमण्याची सवय अशा गोष्टी त्यांच्यासाठी जाणीवपूर्वक करायला हव्या. मग पुढे वयाच्या ७व्या,८व्या वर्षी त्यांना आवडेल त्या कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण द्यायला काहीच हरकत नाही. अगदी शाळेचा अभ्यास कितीही असला तरीरोज थोडा वेळ अशा कलांच्या अभ्यासासाठी देणं आवश्यक आहे. त्यानं अभ्यासाचं नुकसान न होता, मुलांच्या मनाला विरंगुळा मिळतो,मनावरचा ताण नाहीसा होतो आणि ती अधिक उत्साहाने अभ्यास करतात.

-------------------------------

-मधुवंती पेठे 

[email protected]