चाफ्याचे मोहक रंग


 'चाफा' म्हटलं की, आठवतात ते फक्त कवी 'बी'च  म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते ! तसा तो पु.शी. रेगेंचा आणि जी. ए. चासुद्धा आहेच. मग उरला सुरला सगळ्यांचा! तुमचा-आमचा सगळ्यांचा.  

या चाफ्याचं मला फारच अप्रूप वाटतं, अनेक रूपात, अनेक गंधात दिसणारा चाफा; प्रत्येक वेळी आपली छाप सोडून जातो. फुलांच्या ताटव्याला आपलाच गंध देतो. इतकं त्याच्या गंधाचं वेगळेपण, आपल्याला त्याचा शोध घ्यायला भाग पाडतं. रंगाच्या निमित्ताने हा पहिल्यांदा आपल्या भेटीला येतो की, गंधाच्या दरवळीने तेच नेमकं आकळत नाही, पण त्याचा रंग आपल्याला भावतो. कधी कधी तर गंधावरून त्याची स्पर्धाही लागते.

चाफ्याचे किती प्रकार वर्णावे! रंगाने याची ओळख जशी होते, तशीच गंधानेही आपला रंग सांगणारा हा एकमेवच असावा. म्हणूनच याचं गूढ अनेकांना उकलता आलं नाही.  कवी 'बी'नाही  किती उकललं कुणास ठावूक!  

माझी पहिली ओळख ज्या चाफ्यासोबत झाली, तो चाफा म्हणजे 'देवचाफा' देवळालीतील खंडोबाच्या टेकडीवर पाहिलेला देवचाफा या टेकडीवर खंडोबाच्या मंदिराशेजारी आपला मंद गंध आणि आपले अस्तित्त्व नकळत सिद्ध करत होता. या फुलांची अंगठी बनवून ती बोटात घालून टेकडी उतरत होते. पांढरा रंग आणि त्यामध्ये असलेली किंचितशी पिवळी झाक यांनी तयार झालेलं हे पाच पाकळ्यांच फूल मला आजही आठवतं आहे. शाळेत गेल्यावर मला 'बी'चा चाफा भेटला. आणि मग सुरू झाला या चाफ्याचा नव्याने शोध कधीही न संपणारा. आजही मी चाफ्याचा शोध घेतंच आहे. आता नव्याने देवचाफ्याचं नामकरण झालंय 'गार्डन चाफा'. अनेक सोसायट्यांची, टॅावरची शान वाढवत पुन्हा एकदा नजरेत भरू लागलाय, हा शांत, लोभस चाफा. किती शांत असावं या चाफ्यानं, आपल्या पानाचीही सळसळ न करता आपला गंध दरवळत ठेवणाऱ्या या देवचाफ्याचेही किती रंग असावेत लाल, जांभळा आणि तिन्ही रंग एकत्र करून निर्माण झालेला देवचाफा. म्हणूनच मला या चाफ्याचं जास्त अप्रूप.

आहेत ना! अजूनही आहेत यात. त्यातला भुईचाफा तर अगदी निराळा. जांभळ्या रंगात, भूमीतून वर येणारा पु.शिं. रेगेंच्या कथेतलं एक मिथक होता तो. तेव्हा त्याचाही शोध घ्यावासा वाटला. कवठीचाफाही असाच गूढ निर्माण करतो आणि त्याच्या जोडीला नागचाफाही. लालसर-अबोली झाक असलेला. नागाच्या फण्यासारखा दिसणारा, हाताच्या ओंजळीत न मावणारा, नारळाच्या झाडासारखा सरळ उभा तटस्थ वाढलेला. फांद्यांच्या खाली वेलीसारखं उमललेला 'नागचाफा' म्हणूनच वेगळा भासतो. राहता राहिला फूल बाजारात आपला भाव वाढवून तोऱ्यात दिसणारा हा 'सोनचाफा'. रंगाने कसा आहे, हे तुम्हाला सांगायलाच नको. कुणाला काही द्यायचं म्हटलं, तर हीच चाफ्याची फुलं द्या! घेणाराही खूश आणि देणाऱ्याचाही नकळत भाव वाढतो.  नाही का!

इतकं चाफ्याचं पुराण सांगितलं तरी माझ्या मनातला चाफा फक्त 'देवचाफा' आहे! माहीत नाही, पण चिंचपोकळी स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. १च्या समोर असलेलं कब्रस्थान माझ्या नेहमी लक्षात राहिलं, तेही या देवचाफ्यामुळेच. या कब्रस्तानात सगळीकडे असलेली देवचाफ्याची झाडं, पांथस्थांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. कारण तोही असाच आपली पानं गळून फक्त फुलांनी बहरलेला दिसतो. जणू सगळीकडे आनंदाचा गंध पसरवत असतो. किंवा कुठेतरी विसाव्याच्या ठिकाणी असलेला ओबड-धोबड फांद्यातून गुंतागुंत करत वाढलेला असला तरी माळरानातही एक उमेद जागवणारा असतो. म्हणूनच या चाफ्याचा रंग त्याच्या गंधात अंतर्भूत होऊन आपल्या रंगाचही अस्तित्त्व न कळत विसरायला भाग पडणारा आहे. म्हणूनच तो मला हवा हवासा वाटला कायमच...

- शारदा गांगुर्डे

[email protected]