स्वयंपाकातले रंग

 
माझी आई नेहमी म्हणायची, आपण मेन्यू ठरवताना डावीकडच्या, उजवीकडच्या पदार्थांबरोबर त्यांच्या रंगाचाही विचार करावा. अगदी लहानपणापासूनच पाहुणे येण्यापूर्वी किंवा कोणत्याही सणाचा किंवा अगदी खास कार्यक्रमांचा  मेन्यू ठरवताना  ही चर्चा आमच्या घरी सर्व मंडळींमध्ये व्हायची. (कुटुंबातल्या स्त्री-पुरुष सर्व सभासदांमध्ये व्हायची .) विरुद्ध अन्न नको, खूप तेलकट नको, रंगाचा विचार हवा, असे सगळे मुद्दे मेन्यू ठरवण्याच्या चर्चेत व्हायचे. त्यामुळे घरातली वडीलमंडळी यासंबंधी काय वाचतात, कोणत्या ऋतूत काय खावं आणि खाऊ नये, कोणत्या वेळेला आणि कोणत्या प्रकारचे खाणे योग्य, वडिधाऱ्यांची अनुभवातून कोणती विचारसरणी तयार झाली आहे, हे आम्हा लहान मुलांना आपोआप समजायला लागलं होतं. (या चर्चा केवळ मेन्यू ठरवण्यापुरत्या नव्हत्या, तर कोणत्याही लहान-मोठ्या निर्णयाच्या प्रसंगी, किंबहुना रोजचा दिवस कसा गेला हे सांगण्यासाठीही व्हायच्या. बरेचदा जेवताना किंवा जेवणानंतर चर्चा व्हायची.)  लहानपणापासून वेगळं काहीतरी बनवण्याची हौस असल्यानं या चर्चांमधून, मी हे शिकत गेले आणि  तेव्हापासूनच पदार्थांच्या रंगाचा विचार माझ्या मनात जास्त ठसला. (माझ्यासारखे अनेक असतील, ज्यांना रोजचा स्वयंपाक नाही, पण वेगळे पदार्थ, हटके काहीतरी बनवायला आवडतं. हो ना?)
 
माझी आई नोकरी करणारी होती; पण वेळेचं गणित योग्य साधून, पूर्वतयारीनं (मी आणि माझा भाऊ ही) दोन्ही मुले रोजच्या, नेहमीच्या साध्या स्वयंपाकावर खूश कसे राहतील?, सर्व पदार्थ कसे खातील?, त्यांचा आहार परिपूर्ण कसा होईल? याचाही विचार ती करत असे. (ती स्त्री आहे म्हणून नाही, तर तिने स्वतःहून आपल्या घरातला स्वयंपाक व घरच्यांचे आरोग्य  हा तिच्या जबाबदारीचा भाग स्वतःच ठरवला होता म्हणून. घरातील स्त्री म्हणून करायला लागणं आणि तिने ते जाणीवपूर्वक स्वीकारणं यात फरक असतो.)  साध्या स्वयंपाकातही भाज्यांचा रंग, कोशिंबिरीचा रंग याचा विचार ती करत होती. म्हणूनच गाजराची कोशिंबीर असली, तर लाल भोपळ्याची भाजी न करता, कोणतीही हिरवी भाजी असावी किंवा हलकी पिवळी (म्हणजे फ्लॉवरची साधी पिवळी भाजी) असावी, असा विचार तिचा असे. सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर , बीट, मुळा सगळं असेल, तर ते ठेवायची खास छोटी थाळी आमच्याकडे होती किंवा काचेचा बाउल होता, ज्यात रंग आकर्षक दिसतील. मग ठेवायचं कसं?, त्याची रचना करायची कशी हे पुढे पुढे मलाही आवडायला लागलं. तिच्या या दृष्टिकोनामुळे तशी आवड माझ्यातही तयार झाली. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मग बाबांनीही मला सॅलेड डेकोरेशनच्या स्पर्धाना नेलं. त्यासाठी काही वेगळ्या सुऱ्या आणून दिल्या आणि मी त्यात वेगवेगळे प्रयोग करून त्यात विविध कौशल्य आत्मसात केली. (व्यक्तीच्या जडणघडणीत परिस्थिती आणि परिसर हे घटक परिणाम करत असतात.) कोणत्याही लग्नातल्या बुफेच्या सॅलेड, फ्रुट डेकोरेशनच्या भोवती मी बरेचदा घुटमळत असे आणि ते करून पाहत असे. बरेचदा घरी आलेल्या व्यक्तींनी या डेकोरेशनमुळे, टोमॅटोच्या परडीमुळे, कांद्याच्या कार्टूनमुळे, कलिंगडाच्या फुलांमुळे  माझ्या मुलाने आज सॅलेड खाल्लं , अशा प्रतिक्रियाही  मिळाल्या. (मुलांच्या आहारात आवश्यक अन्नघटक जावेत, त्यांनी ते खावं  यासाठी हाही पर्याय स्वीकारू शकतो.)  
 
पारंपरिक आहारातल्या थाळीमध्ये असलेल्या डावीकडच्या, उजवीकडच्या पदार्थांबद्दल जसा विचार आई करत होती; तसाच सार, आमटी, कढी, पातळभाजी, सूप, ताक, मठ्ठा  या जेवणात ओलावा देणाऱ्या, विविध रसपूर्ण गोष्टी देणाऱ्या पदार्थांचाही विचार करत होती. गोड पदार्थ कोणता आहे?, भाताचा प्रकार कोणता आहे? आणि त्यांची रंगसंगती यानुसार ती पातळ पदार्थ ठरवत होती. उदाहरणार्थ, दुधाचा कोणताही गोड पदार्थ असल्यास आंबट पातळ पदार्थ शक्यतो टाळायला हवा; पण त्यांचा रंगही पाहायला हवा. मग बासुंदी असताना कढी, ताक नको, टोमॅटो सार किंवा सूप नको; पण पालक सूप असले तरी चालेल. मग त्याबरोबर हिरवट भाजी व कोशिंबिरीचा राहिलेला रंग असलेली भाजी घातलेला भात हवा. थोडक्यात, ती भाजी घातलेला मसालेभात. पालक सूप आणि फ्लॉवर भात किंवा पुलाव असा मेन्यू असेल, तर मग चटणी हिरवी नको. मग साधी नारळाची पांढरी चटणी हवी.
 
पारंपरिक पदार्थ वेगळ्या रूपात मांडायचाही ती प्रयत्न करत असे. मग यात पोळी पिझ्झा, भाकरी पिझ्झा, फ्रँकी (ज्यात घरातली जी असेल, ती भाजी असायची, आम्हाला ते उशीरा कळलं.) विविध प्रकारच्या भाज्या घातलेल्या साध्या शेवयांचे उपमे (ज्यामुळे आम्ही मॅगीचा हट्ट धरला नाही), विविध थालिपीठं (यामध्ये बीटाचेही थालीपीठ असे कारण तो रंग आम्हाला आवडत असे), वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा वाटून घालून धिरडी किंवा डोसे किंवा इडली, विविध डाळींचे ढोकळे किंवा डोसे (यात मसूर डाळ जास्त घातली, तर रंग वेगळा येतो. हिरव्या मुगाची डाळ घातली, तर  रंग वेगळा येतो. मुगाची पिवळी डाळ घातली, तर पिवळट रंग येतो. या सर्वात विविध रंगाच्या भाज्या घातल्या, तर आणखीन वेगळा मोहक रंग आणि चव येते. ते मुलांना आकर्षक वाटते.) असे नानाविध प्रकार ती आकर्षक दिसण्यासाठी करत असे. चव, त्यातले पोषकद्रव्य याचाही विचार रंगसंगतीबरोबर असे. पण महत्त्वाचे म्हणजे ते आम्हाला खावंसं वाटणं. 
 
 
आपल्या आहारातले कितीतरी पदार्थ आपल्याला रंगांचं वैविध्य देतात. त्याचा आपण वापर करायला हवा, असं आई नेहमी म्हणायची. बघा हं . गाजर, लाल भोपळा भगवा रंग देतो. टोमॅटो लाल रंग देतो. हिरव्या भाज्या हिरवाच रंग देणार नाही का? पण त्याच अळूच्या भाजीत मुळा घातला, दाणे-खोबरं घातले, तर ती हिरवी भाजी आकर्षक दिसते. नुसता नारळ पांढरा रंग देतो. मग साधी सोलकढी केली (फोडणी न दिलेली, लसूण घातलेली, थोडंच आमसूल घातलेली.) तर पांढरा रंग ताटात मध्यभागी समोर राहतो. पण तीच सोलकढी नारळ दूध आणि बरोबरीने कोकम आगळ घालून केली, तर तिचा रंग आमसुली येतो. फ्लॉवर, कोबी या भाज्या पिवळ्या दिसतात. पण त्यात मटार, टोमॅटो , डाळी घातल्या तर त्यांचा रंग बदलतो. साध्या वरणात आपण किती प्रमाणात हळद घालतो, त्याप्रमाणे त्याची चव आणि रंग  अवलंबून असते. मग तो वरण-भात, त्यावर वाढलेलं तूप, पानात असलेली लिंबाची फोड, चटणी, कोशिंबीर, भाजी, ढोकळा, भजी, पोळी, पुरी, भाकरी, मसालेभात, उसळ, ताक, गोडाचा पदार्थ हे पारंपरिक पदार्थ थाळीत असले की, थाळी किती रंगांनी, चवींनी, रसांनी युक्त असते नाही का?
 
आईबद्दल, आईच्या पोषक आहार पोटात जाण्यासाठीच्या युक्त्यांबद्दल किती लिहावं?  तुम्हालाही आठवत असेलंच तुमच्या आईने केलेल्या युक्त्या! किंवा तुम्ही करत असलेल्याही ! मग उचला पेन, किंवा करा टाईप आणि पाठवा आम्हांला[email protected]com वर. आहार-विहार विभागात मुलांसाठीच्या उत्तमोत्तम पाककृती पाठवा. त्यातून मिळणारे पोषकद्रव्य कळवा. आमच्या आहार विहार विभागातले तज्ज्ञाचे लेख वाचा. लेखी प्रतिक्रिया द्या. कॉमेंटस टाका.  
 
-पल्लवी गाडगीळ