बदलते रंग  

थंडी संपत आली की, आपल्याला रंगपंचमीचे वेध लागतात. झाडांच्या दुनियेत हा रंगोत्सव नित्याचाच तरीही नित्यनूतन असतो. वर्षभर झाडं त्यांच्या रंगश्रीमंतीची उधळण करून आपल्यालाही संपन्न करत असतात.

झाडांमधल्या अफाट रंगवैविध्याची मदार, मात्र पुढे दिल्याप्रमाणे अगदी मोजक्या रंगद्रव्यांवरच असते. कमी-अधिक प्रमाणात यांच्या मिश्रणातून आणि अदलाबदलीतून निसर्गाचा रंगपट साकारतो. यामागे अनुवंशिकता आणि पर्यावरणपूरकता या दोन मुख्य प्रेरणा असतात.

रंगद्रव्य

प्रमुख प्रकार

रंग

हरितद्रव्य

हरितद्रव्य

हिरवा

कॅरोटिनॉइडस

कॅरोटिन्स

पिवळा, केशरी, गुलाबी, लाल

फ्लॅव्हनॉइडस

अँथोसायनिऩ

पिवळा, लाल, निळा, जांभळा

 

अँथोक्झांथिन 

पांढरा पिवळसर

बीटालेन्स

बीटासायनिन

बीटाक्झांथिन  

लाल ते गडद जांभळा

 

रंग, झाडांच्या मुळांपासून फळांपर्यंत सर्वत्र आढळतात. खरं पाहता झाडांची मुळं हा अंधारात राहणारा भाग. पण साध्या भाजीच्या टोपलीत पाहिलंत तरी पांढरे मुळे, लाल मुळे, पिवळी-केशरी गाजरं, लाल-गुलाबी बीट अशी अनेकरंगी मुळं दिसतील. हे रंग कॅरोटिन्स, अँथोक्झांथिन आणि बीटालेन्समुळे निर्माण होतात. अंधारातील या अवयवातल्या रंगांच्या साठ्यांच कोडं नीटसं उलगडलेले नाही. परंतु जनुकीय बदलांमुळे हे घडत असण्याची शक्यता गाजराच्या जीनॅाम स्किवेन्सच्या अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे.

इतर अवयवांच्या मानाने रंगीत खोडांचे प्रमाण कमी आहे. निवडुंगांची हिरवी पानखोडे, सलगमचे जांभळट कंद़ आणि डॉगवूडची लाल खोडे, असे काही अपवाद वगळता़ बहुतेक सर्व कोवळी हिरवी खोडे नंतर काळपट तपकिरी होतात.

पानं मात्र कसलेल्या रंगकर्मींसारखी भूमिकेच्या गरजेनुसार रंगभूषा बदलतात. कोवळी पालवी बाळाच्या तळव्यासारखी लालस, तर कामकरी वयातली पानं हिरवी आणि पिकली पानं पिवळी असतात.

कोवळ्या बाळपानांचं शाकाहारी पशुंपासून रक्षण करण्यासाठी, त्यांत अँथोसायनिन जास्त असते; म्हणून ती लाल दिसतात. अन्नसिद्धीची जबाबदारी असलेल्या हिरव्या पानांमध्ये प्रकाश संश्‍लेषणासाठी आवश्यक हरितद्रव्य भरपूर असते. हरितद्रव्य हिरवा प्रकाश परावर्तित करते, त्यामुळे ही पाने हिरवी दिसतात. तर पिकल्या पानांमध्ये हरितद्रव्य नष्ट झाल्याने कॅरोटिनॉइडसचे रंग पिवळे दिसू लागतात.

बहुसंख्य झाडं हिरव्या पानांची असली तरी रक्तपर्णी म्हणजे पॉइनसेटियासारख्या झाडांची पानं अँथोसायनिनमुळे लाल, तर तांबडया माठासारख्या झाडांची पानं बीटालेन्समुळे जांभळट लाल दिसतात. याखेरीज व्हेरिगेटेड मनीप्लांटस कोलियस अशा झाडांत पानाच्या काही पेशींतील जनुकीय बदलांमुळे रंगीबेरंगी नक्षी तयार होते. शोभिवंत असल्यानं ही झाडं भलतीच "भाव" खातात.

पानांच्या रंगोत्सवाचं वैभव पूर्ण दिमखात सामोरं येतं ते पानगळीच्या झाडांमध्ये. हिवाळ्याची चाहूल लागताच, ही झाडं एरवी सतत सुरू असलेली विभाजित हरितद्रव्याची पुनर्निर्मिती बंद करतात. हरितद्रव्याअभावी कॅरोटिन आणि अँथोसायनिन यांचे रंग उठून दिसू लागतात. मग पिवळ्या, शेंदरी, लाल, जांभळ्या रंगछटांनी नटलेल्या पानांमुळे अख्खं झाडच पेटत्या भुर्इनळ्यासारखं झळाळू लागतं. पानगळीच्या जंगलातली ही पानबहार तिथला कडक हिवाळाही सुखद करते.

फुलं म्हणजे झाडाचे अलंकारच. ते घडवताना निसर्ग बारीक कुसरीची कमाल करतो. एकाच फुलातही पुष्पकोश, पाकळ्या, पुंकेसऱ, स्त्रीकेसर सगळ्याचे रंग निराळे. परागीभवन करणारे किडे आकर्षित करण्यासाठी सुगंध व मकरंदाबरोबर सुरेख रंगांचं प्रभावी अस्त्रही फुलं वापरतात. त्याची भल्याभल्यांना भुरळ पडते. वाटाण्याच्या फुलांच्या रंगाची अशीच भुरळ जॉन ग्रेगर मेंडेलला पडली आणि जनुकशास्त्राचा पाया रचला गेला.

यावरही कडी म्हणजे घाणेरी, गुलबक्षी, मधुमालतीसारखी झाडे. यांच्या एकाच पुष्पतबकात किंवा घोसात अनेकरंगी फुलं असतात. यामागे गुंतागुंतीची जनुकीय प्रक्रिया असते.

फुलांच्या रंगपंचमीचा कळस म्हणजे रंग बदलणारी फुलं. यांचे रंग पर्यावरण आणि वय यांच्या परिणामाने बदलतात.

  हायड्रॅन्जियाच्या फुलांचा रंग मातीच्या आम्लतेनुसार बदलतो. आम्ल घटवले की, निळी फुले गुलाबी होतात आणि वाढवले की, गुलाबी फुले निळी होतात. जास्वंदीच्या काही प्रजातींत तपमानानुसार फुलं रंग बदलतात. ही फुलं पहाटे पांढरी, सकाळी गुलाबी, दुपारी लाल आणि संध्याकाळी पांढरट गुलाबी दिसतात. एकाच झाडाच्या हिवाळी आणि उन्हाळी फुलांच्या रंगातही फरक असतो.

जपानी वैगेलाच्या फुलांचा रंग वयाबरोबर पांढरा ते लाल असा बदलतो. मध नसलेल्या फुलाचा लालबुंद रंग मधमाश्यांना लांबवरून आकर्षित करतो, पण जवळ आल्यावर ते फूल टाळून मधाळ फुलं निवडायला मदतही करतो.

फुलांप्रमाणे फळांमध्येही वयानुसार रंगात बदल होतो. इथेही पिकल्या फळातलं हरितद्रव्य नाहीसं होऊन त्याची जागा इतर रंगद्रव्यं घेतात. हा रंग बीजप्रसारक प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी असतो.

एकूण काय तर निसर्गातला हरेक रंग उपयुक्त असतो आणि सुंदरही. तेव्हा आपण सगळे आपापला रंग जपू या आणि इतरांनाही त्यांचे रंग जपू देऊ या म्हणजे सगळं जगच विविध रंगाच्या एका इंद्रधनुष्यासारखं सुंदर होऊन जार्इल.

- स्वाती केळकर

[email protected]