ती ‘सावित्री’ ......

दिंनाक: 10 Mar 2017 13:10:54
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

 


सावित्री जोतीबा फुले. आमची माय. रात्रंदिवस खस्ता खाल्लेली, समाजाकडून नाकारली गेलेली, तरी धीराने उभी राहिलेली. आभाळभर माया दिली तिने, निरपेक्षपणे. कायम आपल्या ध्येयावर ठाम राहून. वेळ पडली तर पुरुषाशीही दोन हात केले तिने. परंपरेने नाकारलेले शिक्षणही दिलं तिने. बुद्धीला बळहीमिळालं तिच्याचमुळे.

केवढं अथांग होतं तिचं मन. तिनं किती सार्थ केला सहजीवन या शब्दाचा अर्थ. नेकीने उभी राहिली नवऱ्यासोबत. त्याच्याकडूनच घेतला तिने समाजसेवेचा वसा. ‘उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका’, या संस्कृतीची निष्ठावान कार्यकर्ती. टाकते कसला. सांभाळला तिनं तो नेटानं मरेपर्यंत. इतका प्रिय झाला तिला तो वसा, कवटाळून बसली शेवटच्या क्षणापर्यंत. साधासुधा नाही हो वसा. समाजसेवेचा वसा. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून घेतलेला वसा.

सुरुवातच झाली तिची शिक्षणापासून. स्वतः शिकली, लिहू, वाचू लागली. पण तेवढ्यावर काही थांबली नाही. शिक्षणाचा वसा, दुसऱ्याला द्यावा हा नवऱ्याचा शब्द प्रमाण मानला आणि लागली कामाला. नवऱ्याला सोबत करत सुरू केली की, तिने शाळा. साधीसुधी नाही हो! समाजाने शिक्षण नाकारलेल्या घटकांची शाळा. बाईमाणसाची आणि दीनदलितांची शाळा. शाळा तयार, पण कुणी येईचना. बाईमाणसाला शिकवायला ही जातीने उभी राहिली. मानधन म्हणून शेण-माती आणि कुचेष्टा मिळाली हो तिला. पण हे मानधन तिला खूप शक्ती देत होतं, तिचा संयम वाढवत होतं. बाई जातीसाठी काही तरी केल्याच समाधान देत होतं. जोडीला संसारही करत होती आपलेपणानं. ओढगस्त असेलच नाही तिला त्या वेळेला. नवरा समाजकार्य करणारा, जातीजमातीतून नाकारला गेलेला आणि अखंडपणे समाजसुधारणेचा ध्यास घेतलेला. या ध्यासाला तिने खतपाणी घातलं, कायमच. जिद्द खूप होती तिच्याकडे. दृष्टी होती, दूरदृष्टी होती. काम करतच राहिली. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता. उमजून, समजून करत राहिली.

समाजालाच तिनं आपलं घर मानलं, कुटुंब मानलं. म्हणून तर केशवपन झालेल्या, विहिरी जवळ करणाऱ्या आपल्या नणंदा-बहिणींना ती जवळ करू शकली. त्यांच्या या घरात काशी अशीच आली आणि तिच्या मुलाला दत्तक घेऊन, सगळ्या बाई जातीचीच ती ‘आई’ झाली. करुणा, प्रेम यांनी ओतप्रोत भरलेली कनवाळू मनाची ती, बाईला जिवंत जळताना कशी पाहील? त्यांचे केस काढून त्यांना विद्रूप झालेलं कसं सहन करील? उभी राहिली ती; नवऱ्याला सोबत घेऊन उभी राहिली. मुळावरच घाव घालायचा ठरवलं तिनं आणि नापितांनाच आपल्या बाजूनं करून घेतलं. त्यांनी ही संप केला की हो. केवढी मोठी उलथापालथ करत होती ही नवरा-बायको मिळून. आपलं आयुष्य पणाला लावून चालू होतं हे सगळं.

किती मोठे प्रश्न हाताळले तिने. किती निगुतीनं विचार करत होती ती. विधवाविवाह संस्था. त्यासाठी प्रयत्न. यशस्वी प्रयत्न. त्याची स्थापना आणि एका विधवेचा पुनर्विवाह. काळाच्या पुढे जाऊन, समाजाला नाकारत.

तिने स्वतःचा एक अजेंडा ठरवला होता. नवऱ्याच्या सोबतीने. (सहजीवनच हे.)स्त्रीच्या म्हणून असलेल्या भावनांची गरज लक्षात घेऊन तिच्या मुलांनाही न्याय देण्यासाठीही ती लढली. नुसती लढली नाही तर त्यांना आपलंसही केलं. केवढं मोठं धाडस. केवढा मोठा निर्णय. केवढा मोठा विचार. काळाच्याही पुढचा आणि नेमका. त्याच धाडसातून, त्याच विचारातून तिने सत्यशोधक समाजाचंही काम केलं. मदतीचा हात सदैव पुढे. तिच्या नवऱ्याचा मृत्यूही तिने हिमतीने पचवला. त्याच्या अंत्ययात्रेला मडकं हिनेच धरलं बरं. (!)आजूबाजूच्या समाजात सती जाणारी बाई होतीच की, पण ही सती नाही गेली. एक ज्योत पेटवली आणि क्रांतीची ज्योतझाली. नवऱ्याच्या निधनानंतरही हिचा वसा आपला सुरूच.खंड नाही पडला त्यात.

बाईच्या जातीला विरंगुळा म्हणून ती लिहीतही होती काही बाही. खरं तर कविताच. समाज सेवेचा वसा इतका मुरलेला अंगात की, त्यातूनही समाजच मांडला तिने. लिहीत होती, वसा सांभाळत होती, काम करत होती, समारंभांचे अध्यक्षस्थान भूषवत होती. सगळं करत होती. मनाजोगं जगत होती, नवरा नसला तरी सहजीवन होतच तिच्यासोबत. अखंडपणे.

काम करण्याचं एकही क्षेत्र सोडलं नाही तिने. प्लेगच्या साथीत, पण ती उभी राहिली नऊवारी साडीचा पदर खोचून. त्यातच लागण होऊन गेली ती. धडपडत्या पायांना आधार देऊन गेली ती. उतली नाही, मातली नाही, घेतला वसा टाकला नाही, पण वसा देऊन मात्र गेली ती. तिच्या अनाम, असंख्य लेकींना.... 

-डॉ. अर्चना कुडतरकर

[email protected]