'दे'.......

दिंनाक: 10 Mar 2017 15:20:24
मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर एक चतुरस्र व्यक्तिमत्व. आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं. त्यांची पहिली ओळख आपल्याला होते ती, ‘सांग सांग भोलानाथ...’ या गाण्यातून अगदी लहान असताना. जेव्हा आपल्याला कविता म्हणजे काय ते कळतही नसतं तेव्हा. हे आणि यासारखी असंख्य गाणी ऐकत आपण मोठे होतो आणि हे मोठे होत असतानाच आपल्याला कधीतरी बालभारतीच्या पुस्तकात परत एकदा मंगेश पाडगावकर कवितेच्या रूपाने भेटतात. तेव्हाही खरं आपल्याला इतकी काही भुरळ पडत नाही, जितकी आपल्याला ‘सांग सांग भोलानाथ...’ गाण्याने पडलेली असते. पण आपण त्यांच्या कवितांच्या प्रेमात मात्र पडत जातो, सतत त्यांच्या कविता वाचू लागतो आणि त्यांच्या कविता वाचनाचा मोह आवरता येत नाही.

पाडगावकरांच्या कविता वाचताना वयाचं बंधन राहत नाही. या कवितांनी आपला ताबा घेतला की, त्यांच्या कवितेच्या जगात आपली मुशाफिरी, सफर ठरलेलीच असते. ती का होते माहिती आहे का? त्यांच्या कवितेत विचार, कल्पना आणि भाषा यांचा एक सुंदर मिलाफ झालेला असतो. आणि त्यातून एकाच वेळी कवितेचा भावार्थ, कवितेतून कवीने साकारलेलं एक पूर्ण चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहत आणि एक सुंदर अनुभव आपल्याला बसल्या जागी मिळतो. याचा प्रत्यय येण्यासाठी त्यांची दे नावाची कविता इथे मुद्दाम देत आहे.

दे

ढगा, ढगा

पाऊस पाड, पाणी दे !

पक्ष्या, पक्ष्या

सुंदर, सुंदर गाणी दे ! 

वाऱ्या, वाऱ्या,

तुझ्यासारखं झुलू दे !

फुला, फुला

तुझ्यासारखं फुलू दे !

मोरा, मोरा

तुझ्यासारखं नाचू दे !

राना, राना

हिरवं पुस्तक वाचू दे !

झाडा, झाडा

उन्हात तुझी छाया दे !

आई, आई

कुशीत घेऊन माया दे !

‘दे’ हे कवितेचं शीर्षकच खूप बोलकं आहे. कवी हा निसर्गात रमणारा, निसर्गासाठी आसुसलेला आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून द्यावं अशी अपेक्षा करणारा आहे. निसर्गाला तो आपली आई मानतो आहे, म्हणून शेवटच्या कडव्यात तो म्हणतो, “आई, आई... कुशीत घेऊन माया दे !” निसर्गाची ही माया कवीला हवी आहे. पण त्याच वेळी निसर्ग आपल्यावर रागावलेला आहे, रुसलेला आहे, हे कवी कुठेतरी नकळतपणे मान्य करून जातो. निसर्ग रागावलेला आहे, याची उदाहरणे कविताभर पसरलेली आहेत. अगदी पहिल्याच कडव्यात तो म्हणतो, “ढगा, ढगा ... पाऊस पाड, पाणी दे !” आणि कवितेतल्या या पहिल्या कडव्यातल्या पहिल्या ओळीत त्याची पहिली अपेक्षा व्यक्त झाल्यावर मग पुढे ही अपेक्षा जर पूर्ण झाली तर हे हे घडणार आहे असं कवीला वाटतं राहतं. म्हणून मग पुढे येणारी वर्णन फार बोलकी होतातआणि ‘जर-तर’चं एक नवं विश्व तयार होतं. पाऊस पडला, पाणी मिळालं, तर पक्षी सुंदर गाणी गातील, तर वारा झुलेल, तर फुलं फुलतील, तर मोर नाचतील, तर रानं हिरवी होतील, तर झाडं वाढतील आणि सावली देतील आणि मग आपली ही धरणीमाता आपल्यावर खूप माया करू शकेल.

अपेक्षेने सुरू झालेली कविता संपते मात्र खूप करुण होऊन. तिचा शेवट माणसांचे आणि धरणीचे संपलेले भावबंध दाखवते आणि खूप हतबलही होते. माणसाचीही हतबलता व्यक्त करताना पाडगावकर कुठेही संयमाचा सूर सोडत नाहीत, खूप संयतपणे व्यक्त होतात, निसर्गाचा झालेला ऱ्हास आणि आता परत मानवाला झालेला पश्चातापही. म्हणून कवितेचं नावही आहे “दे”.

अखेर कवीला मान्य असलेलं दिसतं, की निसर्गच आपल्याला हे सुख देऊ शकतो.

अगदी लहानशी असणारी ही कविता आपला रूपबंधही मस्त सांभाळून आहे. चार कडव्यांच्या या कवितेत शब्दही ४४ आहेत. या चार कडव्यांच्या, ४४ शब्दांच्या कवितेत विरामचिन्हे मात्र २५ आहेत. या विरामचिन्हातून अपेक्षा करायला धजावलेल्या कवी मनाचे चित्र उमटलेले आहे. या कवीला मान्य आहे, की अपेक्षा करायलाही आपणच जबाबदार आहोत. म्हणूनच निसर्गाच्या ऱ्हासाला तो स्वत:ला जबाबदार धरतो आणि म्हणूनच कवितेचं निवेदन प्रथमपुरुषी येतं. भाषेला एक सौम्यपणा आपोआपच येतो आणि हा सौम्यपणा आपल्याला खूप काही सांगतो. शब्दांची द्विरुक्ती आणि त्यातून साधलेली अर्थघनता वाचकांचं मनोरंजन करतानाच त्यांना गंभीरही करते. कवितेचा ताल, शब्दांची लय यांचा एक उत्तम मेळ या कवितेत साधलेला आहे. ‘दे’ या एकाक्षरी शीर्षकातून मानवाच्या मागण्याच्या वृत्तीचे निदर्शन जसे होते आहे, तसेच त्याच्या स्वार्थी असण्याचेही होते आहे. म्हणून इथे विंदांच्या ‘देणाऱ्याने देत जावे....’ या कवितेची आठवण होते आहे. निसर्गाची देण्याची वृत्ती आपण मान्यच केलेली असते, त्याच्याकडून घ्यायचं आणि त्याला गृहीत धरायचं असा एक दृष्टीकोन आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो, तोच इथेही मिळतो.

कवितेची गेयता ही या कवितेची जमेची बाजू आहे.गेयतेमुळे कवितेतील शब्द गुणगुणले जातात आणि त्यामुळे वाचक दुखावला न जाता विचारप्रवृत्त होतो. ही कविता शेवटी जी अपेक्षा व्यक्त करते, ती अपेक्षा माणसाला परत आपल्या मुळाकडे घेऊन जाणारी आहे, असं वाटतं.

-डॉ. अर्चना कुडतरकर

[email protected]