रंगीत उदरभरण

दिंनाक: 10 Mar 2017 11:55:01

                              

उन्हाळ्यातला खास खाऊ                                

‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |

सहज हवन होते, नाम घेता फुकाचे ||

जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रम्ह |

उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म ||

    असे म्हणून आपण आपला पहिला घास घेतो. अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी खायचे नसते, तर ते पवित्र यज्ञकर्म आहे, असे समजून खायचे असते. श्लोकात आपण ‘नाम घेता फुकाचे’ असे म्हणतो. श्लोकातला हा ‘फुका’ म्हणजे अत्यंत कुशल स्वयंपाकी होता. जसे त्याचे आपण रोज श्लोकाद्वारे स्मरण करतो; तसेच रोज स्वयंपाक करणाऱ्या अन्नपूर्णेलाही धन्यवाद द्यायला हवेत.

    आपली भारतीय खाद्यसंस्कृती प्राचीन काळापासून अतिशय समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक ऋतुमानाप्रमाणे जसे राहणीमान बदलते, तसे अन्नपदार्थांमध्येही बदल करणे हितकारक असते. निसर्गामध्येही ऋतुमानाप्रमाणे फळे, फुले, भाज्या यांची विविधता दिसून येते. आयुर्वेदामध्येही प्रत्येक पदार्थ कोणत्या ऋतूमध्ये खावेत यासंबधी माहिती मिळते.

    माघ महिन्याच्या शेवट महाशिवरात्रीने होतो आणि तेव्हापासून काळपट पिवळसर रंग असलेला ऊसाचा रस पिण्यास सुरुवात करण्याचा संकेत दिला जातो. फाल्गुन महिन्याची चाहूल लागताच, उन्हाच्या चटक्याबरोबरच रंगाची उधळण करत येणाऱ्या होळी, रंगपंचमीची लहानथोर सगळेच आतुरतेने वाट बघत असतात. होळीच्या दिवशी केली जाणारी पुरण पोळी तर पिवळा आणि पांढरा यांचं मिश्रणच असते. जणू काही हा रंग आपल्याला या ऋतूने बांधूनच ठेवतो.

ऋतुमानानुसार बाजारात रंगीबेरंगी भाज्या, फळे अवतरलेली असतात. संत्री, मोसंबी, द्राक्षे, कलिंगड, अननस अशी फळे; तर गाजर, मटार, टोमॅटो, बीट, पुदीना, कडीपत्ता, सॅलेडची पाने, पालक, मुळा या सर्वांचे आकर्षक रंग आपल्या मनाला भावणारे असतात. त्यातला हिरवा, लाल, नारंगी, पिवळा पांढरा रंग आपल्याला भावतो, तसेच त्यातले अन्नघटक शरीर पोषणासाठी उत्तमपणे मानवतात. पोळी – भाजी, भात – वरण – आमटी अशा पारंपरिक अन्नाला पाहून नाक मुरडणारी मुले – मोठी माणसेही रंगीबेरंगी जिन्नसांनी बनवलेले पदार्थ मात्र आवडीने खातात. यासाठी थोडासा वेळ काढून आपली थोडी कल्पकता वाढवली, तर नयनसुख देणारे आणि पौष्टिक पदार्थ घरच्याघरी सहज बनवता येतात. पदार्थाच्या चवीला महत्त्व आहेच; पण त्याइतकेच महत्त्व आहे ते त्या पदार्थातील ‘सत्वाला’.

    उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान वाढते, घाम येतो व सारखी तहान लागते. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे पित्तप्रवृत्ती वाढते. यापासून आराम मिळवण्यासठी शहाळ्याचे पाणी, कोकम सरबत, लिंबाचे सरबत यांसारखी पेय उपयोगी ठरतात. बाजारात मिळणारी बर्फात ठेवलेली शीतपेय ही घसा आणि शरीराला अपायकारक असतात. लहान मुलांना तर खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचेही भान राहत नाही. नुसते पाणी देण्याऐवजी वरील पारंपरिक पेय मुलांना दिल्यास उन्हाळ्यात होणारे अपाय टाळता येतील. सब्जाचे बी भिजवून त्याचाही वापर सरबतांमधून करता येईल. विविध रंगांची ही पेये दिसायलाही खास असतात. कोकम सरबताचा रंग निराळा, कैरीच्या पन्ह्याच्या रंग निराळा.

    जेवणाच्या पदार्थामध्ये पचनाला हलके असे पदार्थ करता येतील. त्यातही आपल्याला रंगाचे वैविध्य राखता येते. त्यामध्ये मुगाच्या डाळीचे पिवळसर वरण, पांढरा दही – भात, काकडी, बीट, सॅलेडची कोशिंबीर, मोड आलेल्या कडधान्यांची भेळ वैगेरे.

    रसदार फळांचा वापर करूनही रंगीबेरंगी आणि पचनास हलके असे खाद्य पदार्थ बनवता येतात. त्यासाठी काही पदार्थांच्या कृती बघू यात.

  • द्राक्षे – अननसाचे रायते

साहित्य: दोन मध्यम वाट्या गोडसर दही, चार लहान चमचे साखर, अर्ध्या लिंबाचा रस, जिरेपूड, एक वाटी द्राक्षाचे तोकडे, एक वाटी डाळिंबाचे दाणे, एक वाटी अननसाच्या  फोडी.

कृती: दही घट्ट घुसळून त्यात मीठ, साखर, जिरेपूड, लिंबाचा रस घालवा. वरील सर्व फळांचे तुकडे, डाळिंबाचे दाणे मिसळावे. थंडगार रायते खाण्यासाठी तयार.

  • तजेला आणणारे शहाळ्याचे पेय

साहित्य: मलई असलेले शहाळे, रोज सिरप, लिंबाचा रस, सब्जा बी.

कृती: शहाळ्याची मलई व थोडे शहाळ्यातील पाणी मिक्सरवर फिरवून घ्यावे, ते मिश्रण फ्रीजमध्ये गार करावे. ग्लासमध्ये भिजवलेले सब्जाचे बी घालून त्यात रोज सिरप घालून ढवळावे. गार झालेली मलई व शहाळ्याच्या पाण्याचे मिश्रण ग्लासात घालून उरलेले शहाळ्याचे पाणी व लिंबाचा रस घालावा.

  • लाल माठ – नाचणी पराठा

साहित्य: एक वाटी चिरलेली लाल माठाची भाजी, एक वाटी नाचणी पीठ, एक वाटी गव्हाचे पीठ, मीठ, चवीपुरती साखर, एक चमचा जिरे, आलं-लसूण पेस्ट, तेल किंवा तूप.

कृती: एक वाटी पाणी उकळत ठेवावे. त्यात चमचाभर मोठे मीठ, आलं– लसूण पेस्ट, जिरेपावडर घालावी. पाण्याला चांगली उकळी आली की, त्यात चिरलेली लाल माठाची भाजी घालावी. तसेच एक वाटी नाचणीचे पीठ घालून गॅस बंद करावा. त्यावर झाकण ठेवून द्यावे. एक वाटी गव्हाचे पीठ त्यात मीठ, तेल घालून मऊसर मळून ठेवावे. त्यानंतर नाचणीच्या पिठाची जी उकड केली ती चांगली मळून घेऊन त्याचा एक गोळा तयार करावा. गव्हाच्या पिठाचा लिंबाएवढा घेऊन त्याची पारी करावी. त्यामध्ये नाचणीच्या पिठाची गोळी घालून पुरणपोळी प्रमाणे अलगद लाटावी. तेल किंवा तूप सोडून पराठा भाजावा.

नाचणी व लाल माठ क्षारयुक्त व पौष्टिक आहे. लहान मुलांच्या वाढीसाठी हा पराठा अतिशय उपयुक्त आहे.

    चला तर मग नैसर्गिक रंगाच्या उधळणीत रंगताना रंगीबेरंगी पौष्टिक पदार्थ खाऊया आणि खिलवू या.

- हर्षाली अवचरे