पृथ्वीवरचे जीवन

पृथ्वी निर्माण झाल्यावर ती क्रमाक्रमाने थंड होत गेली. सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर निर्माण झालेली वैशिष्ट्यपूर्ण  स्थिर परिस्थिती ही जीवसृष्टीच्या उगमाची पहिली पायरी समजली जाते.

विज्ञानाने नमूद केले आहे की, पृथ्वीवरील सजीवांच्या ९९ टक्के जाती आजपर्यंतच्या करोडो वर्षांच्या इतिहासात नष्ट झाल्या आहेत. पृथ्वीवरील जीवन सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी सुरू झाले. तेव्हापासून आजपर्यंत  अनेक सजीव निर्माण झाले आणि नष्टही झाले. पृथ्वीवरील जीवन सर्वात प्रथम पाण्यात,महासागरात निर्माण झाले असे सांगण्यात येते. शार्कसारखे मासेदेखील खूप प्राचीन आहेत.

सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी  पृथ्वीवरील वातावरण सजीवांसाठी पोषक बनले. प्रथम हे वातावरण दमट, उष्ण होते. त्यामुळे सतत पाण्याची वाफ होऊन ढग तयार होत असत व भरपूर पाऊस पडत असे. प्रचंड विजांच्या गडगडाटाने वातावरण भरून जाई. काही काळानंतर म्हणजेच ३०० कोटी वर्षांपूर्वी जीव निर्माण होण्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम पाण्यामध्ये एकपेशीय जीव आणि जमिनीवर वनस्पती उगवण्यास सुरुवात झाली.

असा हा पृथ्वीचा इतिहास आपण थोडक्यात पुढीलप्रमाणे क्रमवारीने सांगू शकतो.

१) जन्म – सुमारे ५०० कोटी वर्षांपूर्वी

२) त्यानंतर जिवांची उत्पत्ती होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी सुमारे २०० कोटी वर्षे लागली.

३)२०० कोटी वर्षांनंतर आणखी १०० कोटी वर्षे पृथ्वीवर भयंकर पाऊस पडत राहिला आणि तेव्हाच महासागर, सागर,नद्या व इतर जलाशयांची निर्मिती झाली असावी. एवढ्या प्रदीर्घ काळाच्या दरम्यानच येथील जीवसृष्टीला सुरुवात झाली. परंतु ते  जीवन फक्त सूक्ष्म (अदृश्य) जीवजंतूवरच सीमित राहिले.

४)१०० कोटी वर्षांपासून सुमुद्रात  काही प्राथमिक प्राणी व वनस्पतींची निर्मिती होऊ लागली.

५) ६४ कोटी वर्षांपूर्वी जमिनीवर झुडपे तयार झाली.

६) ५० कोटी वर्षांपूर्वी प्राथमिक स्वरूपातील मासे तयार होण्यास सुरुवात झाली.

७) ४० कोटी वर्षांपूर्वी पाण्यात माश्यांव्यतिरिक्त अन्य जिवांची निर्मिती झाली.

८)३२ कोटी वर्षांपूर्वी दलदल असलेल्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात घनदाट जंगले तयार झाली. तसेच पंख असणारे कीटक तयार होऊन ते उडूही लागले.

९)२८ कोटी वर्षांपूर्वी साप व तत्सम प्राण्यांची म्हणजेच सरपटणाऱ्या प्राण्यांची निर्मिती झाली. थोडक्यात जलचर,भूचर आणि उभयचर प्राण्यांचा  उगम झाला.

१०)२५ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर या महाकाय प्राण्याचा जन्म झाला. ज्याचे पृथ्वीवर सुमारे १८ कोटी वर्षे एवढ्या काळापर्यंत वास्तव्य होते.

परंतु, या काळात मानवाचा उद्यही झाला नव्हता. मानवाच्या वंशाची सुरुवात देखील झाली नव्हती. केवळ शाकाहारी व मांसाहारी डायनोसॉर होते. त्यानंतर काही काळाने हे प्राणी नष्ट झाले. परंतु या महाकाय प्राण्यांचा अस्त कसा झाला याचे कारण सांगता येत नाही.

याच काळात काही सस्तन म्हणजेच पिल्लांना जन्म देणाऱ्या प्राण्यांचा उदय झाला. या काळात उडणारे प्राणीसुद्धा अस्तित्वात होते.

११)सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी फुलझाडे तयार झाली आधुनिक प्रकारचे मासे तयार झाले.

१२) सुमारे ६ कोटी वर्षांपूर्वी चांगले विकसित सस्तन प्राणी तयार झाले. घोड्याचा वंशज याच काळात उदयास आला.

या सर्वांमध्ये आश्चर्यकारक गोष्ट अशी की, १८ कोटी वर्षांपूर्वी नांदणारी डायनोसॉरची जात कशी नष्ट झाली? कदाचित ते एखाद्या साथीच्या रोगाने नष्ट झाले असावेत.

१३)सुमारे ३.५ कोटी वर्षांपूर्वी मानवाचे वंशज तयार झाले. त्याचप्रमाणे शाकाहारी सस्तन प्राणी तयार झाले, उदा., बैल, गाय यांसारखे प्राणी.

१४)२ कोटी वर्षांपूर्वी हिमालय पर्वत निर्माण झाला. हिमालयाची निर्मिती अजूनही पूर्ण झालेली नाही. अद्यापही त्यावरच्या घडामोडी चालूच आहेत.याच  काळात वाघसुद्धा निर्माण झाले.

सजीवांच्या निर्मितीच्या या क्रमात मानवाची निर्मिती मात्र फारच उशीरा व सर्वात शेवटी झाली. पृथ्वीवरील हा मानव हाच सर्वात शेवटचा सजीव असावा.

१५)मानवाच्या निर्मितीची सुरुवात केवळ ६० लाख वर्षांपूर्वीच झाली आणि ही प्रक्रिया पुढे सुमारे ४० लाख वर्षे सुरूच होती. मानव फार तर १० लाख वर्षांपूर्वी म्हणजे अगदी अलीकडे तयार झाला असावा.

प्रथम निर्माण झालेल्या जीवसृष्टीचा अभ्यास आपण पुढच्या लेखात करूया.

-    सुनीती भागवत