मुलांबरोबर गुणात्मक वेळ महत्त्वाचा

 शिक्षणानंतर लगेचच नोकरीला लागल्याने घरी राहणं फारसं झालचं नव्हतं. मुलीच्या निमित्ताने तो योग जुळून आला. 'घरून काम'ही संकल्पना याच काळात रुजत होती. त्याचा फायदा घेत प्रसारमाध्यमातील नोकरी सोडून घरून काम करायला सुरुवात केली, तेव्हा विविध बातम्यांचे भाषांतर करून देण्याचं ऑनलाईन काम मी करत होते.हे काम मुख्यतः दुपारनंतर सुरू होत असल्याने घर आणि काम यात समन्वय साधला जात होता.यातूनच खऱ्या अर्थाने पालकत्वाचा आनंद थोडासा उशीरा का होईना, पण घ्यायला सुरुवात झाली. या पालकत्वात अती काळजी,टेन्शन यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला. आपली एकुलती एक मुलगी - मग तिने हेच करावे,हे करू नये,या क्लासला जावे,तिला त्या क्लासला घाल असा सक्तीचा प्रकार आम्ही दोघांनीही अजिबात केला नाही. पहिली अडीच वर्षे माझ्या आईच्या देखरेखीखाली मुलगी वाढली होती. त्यामुळे पाया भक्कम झाला होता. मला पुढील संस्कारांची जडणघडण करायची होती ती ही सावकाश,हळूहळू मुलीबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवता यावा,यासाठी शाळेत स्वतः आणायला व पोहोचवायला लागले. घरून शाळेत जाताना वा परत येताना शाळेत शिकविलेल्या कविता म्हणणे,पाढे म्हणणे,छोटी छोटी बेरीज वजाबाकीची गणिते तोंडी सोडवत येणे हे प्रकार आम्ही दोघीही आनंद घेऊन करायला लागलो."ममा तुला पगाराचे किती पैसे मिळतात?तू जर नोकरी नाही केलीस, तर एकट्या बाबाच्या पगारात आपलं भागणार नाही का?मी हट्ट करणार नाही,मला तुझे पैसे नकोत,पण तू हवी आहेस ममा. प्लीज नोकरी सोड नं." डोळ्यांत पाणी आणून, अगदी कळवळून माझी मुलगी मला विनवत होती. वय वर्षे फक्त अडीच. पण या उद्गारांनी माझ्यातल्या पालकत्वाची जाणीव अधोरेखित झाली. खरं तरमी आणि माझा जोडीदार दोघेही प्रसारमाध्यमात काम करणारे. त्यामुळे शिफ्ट ड्यूटी,वेळी-अवेळी कार्यालयात जाणं,महत्त्वाच्या घडामोडींच्यावेळी ड्यूटी व्यतिरिक्त अधिक तास थांबणं हा दिनक्रम अंगवळणी पडलेला. गरोदरपणातही दुपारी ४ ते रात्री १२ अशा शशिफ्टमध्ये काम केलेलं. त्यामुळे पालकत्वही आपण सहजपणे निभावू शकतो,असा काहीसा समज झाला होता. या समजातून मुलीच्या वरच्या उद्गारांनी वास्तवाचं भान आलंआणि तत्काळ निर्णय घेतला तो नोकरी बदलण्याचा.

सुट्टीच्या दिवशी कुठे बाहेर प्रवासाला जाताना ट्रेनमध्येही शब्दांच्या भेंड्या खेळणं हा आमचा आवडीचा खेळ होता आणि आजही आहे. यातून अनेक इंग्रजी,मराठी शब्द आम्ही शिकलो. याशिवाय पुस्तकांच्या दुकानात आवर्जून फेरी मारणे हा सुट्टीच्या दिवशीचा आमचा आवडीचा कार्यक्रम. पुस्तके हाताळून बघणे,त्यातील चित्रे बघणे यातून मुलीची वाचनाची आवड वाढली. इंग्रजी, मराठीतील अनेक पुस्तके आज तिच्या स्वतःच्या लायब्ररीत आहेत. याशिवाय शाळेतल्या लायब्ररीतूनही पुस्तके आणण्याची सवय तिला आहे. लहानपणी झोपताना तिला गोष्टी सांगण्याची सवय मला होती. पण ती ऐकून झोपी जाणे हा मुलीचा स्वभाव नव्हता. सांगितलेल्या गोष्टींवर ती विचार करते याची जाणीव झाली. म्हणूनच भीम बकासुराची कथा ऐकल्यावर दुसर्‍या दिवशी तिने प्रश्न विचारला, "आई बकासूर जर एवढा गाडाभरून जेवत होता,मग त्याची शी शी किती असेल नं?"खरंच किती योग्य प्रश्न तिला पडला होता. तिथूनच तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जावीत यासाठी आईवडील म्हणून आम्ही दोघेही प्रयत्नशील असतो.

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात हातात मोबाईल घेऊन तासन्तास त्यात रमणार्‍या पिढीत माझी मुलगी ही येतेच. मात्र त्यावर अत्यंत डोळसपणे,तिच्या नकळत आम्ही निर्बंध घातले आहेत. रात्री १०नंतर तर तिचा मोबाईल माझ्याच ताब्यात असतो. या छोट्या छोट्या नियमांमुळे मुलगी संध्याकाळी मैदानावर खेळायला जायला लागली. यातून तिला व्हॉलीबॉलची गोडी लागली. आतातर ती शाळेच्या टीममध्ये खेळते. तालुका आणि जिल्हा स्तरावर एक उत्तम टीम म्हणून त्यांची ओळख बनली आहे. याशिवाय तिचं खाणंपिणं सांभाळणं ही एक मोठी कसरत आहे,कारण घरचं ताजं,गरमगरम खाणं तिला स्वतःला आवडतं. त्यामुळे बाहेरच्या खाण्यावर बरेच निर्बंध आले आहेत. याशिवाय शाळेतही तिच्या डब्याची सर्वजण वाट बघत असतात, ते त्यातील विविधतेमुळे. पोळीभाजीपासून घरी केलेल्या पिझ्झा,बर्गरपर्यंतचे पदार्थ तिला डब्यात घेऊन जायला आवडतात. म्हणूनच रविवारी दुपारीच ती पुढील आठवड्याचं डब्याचं वेळापत्रक मला लिहून देते. जेणेकरून मलाही तयारीला वेळ मिळतो.

वस्तुतः पालकत्व ही न संपणारी गोष्ट आहे. आपल्या पाल्याच्या वयाच्या विविध टप्प्यांवर आपलीही भूमिका सतत बदलत असते. पालकत्वाचे कोणतेही क्लास नाहीत,त्याचा अभ्यासक्रम नाही. चुकतमाकत,अनुभवांमधून शिकण्याची ही गोष्ट आहे. त्यामुळे पालकत्वाचे अनुभवही वेगवेगळे असणार हे नक्की!

- आराधना जोशी

[email protected]

(लेखिका सध्या विरारच्या विवा महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत. त्याआधी १० वर्षे विविध मराठी वाहिन्यांसाठी काम केले आहे.)