कहाणी जिद्दीची

दिंनाक: 07 Feb 2017 12:10:15

 

२०१२ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार स्वीकारताना :सायली आगवणे


Stop waiting for things to happen

 go out and make them happen.

अशी काही आपल्याला ऊर्जा देणारी वाक्यं आपण वाचतो. पण ही काही प्रेरणा देणारी वाक्यं एखादी व्यक्ती खर्‍या अर्थानं जगते, तेव्हा मग सगळेजण तिच्याकडे आदरानं पाहतात. सायली-जुईली आणि त्यांचे आई-वडील मनिषा आणि नंदकिशोर अगावणे हे असंच खंबीरपणे अडथळ्यांवर मात करणारं आणि इतरांनाही प्रेरणा देणारं कुटुंब.

सायली... १५ वर्षांपासून कथक नृत्य आणि९ वर्षांपासून वेस्टर्न नृत्य शिकणारी मुलगी...

२०१२मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून तिने मिळविले राष्ट्रीय पारितोषिक... ओरिसा, बँकॉक, थायलंड, श्रीलंका आणि सिंगापूर येथे नृत्याविष्कार सादर... 2013 रोजी डॉ. बात्राज् पॉझिटिव्ह हेल्थ अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेते ह्रतिक रोशन यांच्या हस्ते प्राप्त...  

हे सगळं मिळवणं सायलीसाठी अजिबात सहज शक्य नव्हतं. डॉक्टरांनी तिचा जन्म झाल्यावर तिच्या आई-वडिलांना सांगितलं ही ‘मंगोल चाईल्ड’ आहे. डाऊन सिंड्रोम. याचा अर्थ काय असं अगावणे यांनी विचारल्यावर साहाय्यक डॉक्टरांकडून उत्तर मिळालं, ‘‘शाळेत घातलं तर ही मुलगी पहिली येईल पण कायम शेवटून.’’ त्याक्षणी तिची आई खचली नाही, तर याच वाक्याचा त्यांनी सकारात्मक उपयोग करून घेतला. आपण आपल्या मुलीला घडवायचं असं आई-वडिलांनी ठरवलं. विशेष मुलगी म्हणून जन्मलेल्या सायलीनं खरोखर विशेष अशीच कामगिरी केली.

सायलीला व्यवस्थित चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. पण आई-वडिलांबरोबर नृत्यगुरूंनी तिला खूप चांगलं प्रशिक्षण दिलं. पायाची पावलं सपाट असलेल्या सायलीला चालता यावं म्हणून आईनं तिला दगडातूनही हळूहळू चालण्याचा सराव दिला. केवळ तिला सेन्सेशन जाणवावं म्हणून. सायलीनं या सर्व प्रयत्नांना साथ दिली. तिनंही कधी कंटाळा केला नाही. 

जुईली ही सायलीची लहान बहीण. ती नृत्याच्या क्लासला जायची. मग सायलीही तिच्याबरोबर जायला लागली. जुईली सायलीला जसं जमेल तसं नृत्य शिकवायची. हळूहळू सायलीला त्यात गती असल्याचं आईला जाणवलं. इथूनच सुरू झाला सायलीचा पदन्यासाचा प्रवास. यासाठी ‘रूपक नृत्यालयानं’ तिच्यासाठी खूप कष्ट घेतले. 

चालताना मदतीची गरज लागणारी सायली कथक नृत्यातील पदन्यास लीलया करू लागली. त्यासाठी ती स्वतः कष्ट घ्यायला लागली. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिच्या आईनं तिला नियमितपणे सरावासाठी नेणं, विविध कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये भाग घ्यायला उद्युक्त करणं सुरू केलं. यामुळे सायलीतील नृत्यकलेला अधिकच वाव मिळत गेला. तिने देश-परदेशांत जाऊन नृत्य करण्यास सुरुवात केली.

तिचे वडील म्हणतात, ‘सायलीनं एखाद्या गाण्यावर नृत्य करायला सुरुवात केली की, ती त्यात पूर्ण दंग होऊन जाते. उत्तम सादरीकरण करते.’

यामध्ये तिची बहीण जुईली, आई-वडील, नृत्यगुरू यांचं जितकं योगदान आहे; तितकंच सायलीच्या चिकाटीचं, जिद्दीचं.


सायलीची स्वतःची स्वप्नं आहेत. थोडं अडखळत बोलत असली तरी सतत जाणवतं सायलीमधील जिद्द. ती म्हणते, ‘‘मी ज्या मुलांना शिकवते त्यांना असं वाटेल, सायली आपली एकटी टिव्हीवर जाऊन आली. पण मी या मुलांनाही टिव्हीवर नृत्य सादरीकरण करण्यासाठी नेणार आहे. त्यांना खूप छान नृत्य शिकवणार आहे.’’

 

सायली आगवणे: वेस्टर्न डान्स करताना


आपल्याला कशामध्ये आवड आहे, हे एकदा कळल्यानंतर त्यामध्ये झोकून देऊन प्रयत्न केले, तर कोणतीच गोष्ट अवघड नाही. गरज असते ती फक्त मनाची ताकद वाढविण्याची, कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची, प्रयत्नांची आणि सातत्याची. असं झालं तर यश फक्त तुमचं आहे. सायलीच्या उदाहरणावरून हेच शिकण्यासारखं आहे.सायलीच्या या वाटचालीतील महत्त्वाची पायरी म्हणजे आता सायलीनं तिच्या नावानं एक डान्स क्लास सुरू केला आहे. याचबरोबर ती चार वेगवेगळ्या शाळांमध्ये नृत्य शिकविण्यासाठी जाते. तिथे ती विशेष मुलांना नृत्य शिकवते. त्यांचे प्रोगॅम बसवते. त्यांना घेऊन विविध ठिकाणी सादरीकरणासाठी घेऊन जाते.नुकताच सायलीला २०१६चा ‘अरिहंत नॅशनल अवॉर्ड ’ याचबरोबर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचा ‘पीपल ऑफ द इयर अवॉर्ड’ मिळाला आहे. २०१६च्या सूर्यदता नॅशनल अ‍ॅवॉर्डचीही ती मानकरी ठरली आहे. अनेकविध पदकं, पारितोषिकं तिला मिळाली आहेत. नेहमी शेवटून पहिली येईल असं जिच्याबाबतीत विधान केलं होतं त्या सायलीनं हे पूर्ण खोडून काढलं. ‘शामक दावर अ‍ॅकॅडमी’मधून वेस्टर्न नृत्य शिकते आहे. त्याच्या सादरीकरणासाठी ती जाते. अनेक ज्येष्ठ कलाकार, अभिनेते, अभिनेत्री यांनी तिला शाब्बासकीची थाप दिली आहे. दूरचित्रवाणीवर तिचे कार्यक्रम झाले आहेत.  

 

-स्वराली गोखले

[email protected]