प्रयोगशील शिक्षक : बालाजी बाबुराव जाधव  

 

शिक्षकाचे नाव: बालाजी बाबुराव जाधव

शिक्षण :बी.ए.,  डी.एड.

शाळेचे नाव : जि. प. प्राथमिक शाळा  पुळकोटी, ता. माण, जि. सातारा .

 

सातारा जिल्ह्यातील जि.प.प्राथमिक शाळा पुळकोटी माण या शाळेतील  बालाजी बाबूराव जाधव या शिक्षकाने अध्ययन-अध्यापनासाठी माहितीजालाचा (इंटरनेटचा) वापर करून २५ अॅपची निर्मिती केली. इंटरनेटचा गंधही नसणाऱ्या जाधव सरांनी  नव्या युगाचा मंत्र ठरलेले इंटरनेटचे तंत्र स्वतः शिकून कमीतकमी वेळेत अनेकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने शिक्षण भक्ती नावाची  स्वत:ची वेबसाईट तयार केली. इ.४ थीच्या शिष्यवृत्तीसाठी ब्लॉग्ज लिहिले. त्यात रोज २० नवीन प्रश्न दिले. ऑनलाईन टेस्ट सुरू केल्या. ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या लक्षात घेऊन या परीक्षा ऑफलाइनही देता येतील अशी सोय त्यांनी केली. दररोज १० ते १५ हजार विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ लागले आहेत. या अॅप आणि संकेतस्थळाचा वापर करून शिष्यवृत्ती परीक्षेत  अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्याही मिळवल्या आहेत. सराव परीक्षांसोबत त्यांनी अभ्यासक्रमातील  संकल्पनांचे  व्हिडीओही तयार केले आहेत.त्यामुळे एका क्लिकवर सर्व विषयाचा अभ्यास सहजतेने उपलब्ध झाला.  ‘सुलभ प्रशासन’ नावाचे वेब पेज तयार करून त्यावर शाळेतून द्याव्या लागणाऱ्या सर्व प्रशासकीय माहितीचे गुगल फॉर्म्स आहेत. आज वेगवेगळ्या खेड्यांतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या माहितीचा उपयोग होत आहे. शिक्षणातला एक चांगला प्रयोग लाखो विद्यार्थ्यांपर्यत सहज, एकाचवेळी पोहोचणे, हे  जाधव सरांच्या तंत्रज्ञानिक प्रयत्नांमुळे सोपे  झाले  आहे.