कृषी संस्कृती ही आपल्या देशाची महत्त्वाची संस्कृती मानली जाते. मात्र आजच्या औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत ही संस्कृती आणि तिची परिभाषा हळूहळू लोप पावत आहे. ती परिभाषा आपल्याला लोकसाहित्यामधून आजही जपलेली दिसते. कृषी संस्कृतीशी निगडित शब्द, परंपरा, संस्कृती आजही अस्तिवात आहेच. गरज आहे ती पाठ्यपुस्तकांबाहेर जाऊन अवांतर वाचन करण्याची! 
ग्रामजीवन, कृषी व्यवस्था, निसर्ग यांचं दर्शन घडवणारं ‘इर्जिक’ हे अरुण जाखडे लिखित पुस्तक वाचनात आलं. त्यातील ‘इर्जिक’ या पहिल्याच लेखामधून ‘इर्जिक म्हणजे समूहमनाचा आविष्कार’ असं म्हणत त्यांनी ही संकल्पना स्पष्ट केली आहे. 
बैलजोडी किंवा इतर साधनं नाहीत; म्हणून मोडून पडायची वेळ आलेला शेतकरी इर्जिक घालायचा. त्याने इर्जिक घालतोय म्हटलं, की सारं गाव आपला एक दिवस त्याच्यासाठी द्यायचा. शेतीच्या कामांसाठी लागणारी सारी हत्यारं-अवजारं घेऊन, त्याच्या शेतात राबून, त्याची अडलेली कामं करून द्यायचा. 
शेतकर्‍याच्या शेताला बहर यायचा आणि शेतकर्‍याला नवा जोम. मग तो शेतकरी सगळ्यांसाठी गोडाच्या जेवणाचा बेत करायचा. त्या वेळीही आवश्यकतेनुसार स्वयंपाकघरातील साधनं घेऊन गावातील स्त्रिया त्याच्या घरी येऊन स्वयंपाक करत आणि सर्व जण एकत्र जेवत. जणू काही उत्सवच साजरा करत. 
मदत घेणार्‍याकडे अपमान नसे की, मदत करणार्‍याकडे बडेजाव नसे. किती समृद्ध विचार होता या इर्जिक घालण्याच्या पद्धतीमध्ये! आजच्या काळात आर्थिक मदत करणार्‍यांची संख्या खूप आहे; परंतु इर्जिक घालण्याच्या या परंपरेपुढे अशा प्रकारची मदत थिटी पडणारीच आहे, असं वाटतं.
लेख वाचल्यानंतर लोकसंस्कृतीतील, कृषीसंस्कृतीतील असे अनेक अर्थपूर्ण शब्द भाषेतून लुप्त झाले आहेत, याची खंत वाटली. पण त्याच वेळी मनात आलं की, अशा शब्दांची ओळख करून घेऊन, त्यांचं महत्त्व समजून घेतलं, तर या शब्दांची कास धरून, आजच्या काळाच्या दृष्टीने त्यांचा वापर करत सहजतेने चांगलं काही करता येईल. भाषिक समृद्धताही जपता येईल आणि लोकसंस्कृतीतील बलस्थानं समजून घेता येतील.
इर्जिक! ‘एकमेका साहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।’ ही उक्ती सार्थ ठरवणारा हा शब्द आणि ही परंपरा आपल्या भाषेतून, संस्कृतीतून, जगण्यातून हद्दपार झाली आहे. आपण खूप शिकून ज्ञानार्जनाने समृद्ध होत असलो, तरी खूपच स्व-केंद्रित होत चाललो आहोत. ‘मी’, ‘माझं’ यापलीकडे जाऊन ‘आपण’, ‘आपलं’ असं म्हणत आपल्याबरोबरच्या समूहाचा विचार केला, तर इर्जिक घालण्याची सुंदर परंपरा आपल्याला आपापल्या कार्यक्षेत्रात रुजवता येईल. आपल्या क्षेत्रात रुजवायची म्हणजे नेमकं काय करायचं? सोप्पं आहे! आपण विद्यार्थी आहोत. आपलं कार्यक्षेत्र म्हणजे शाळा, अभ्यास!  प्रत्येकाची आकलनक्षमता भिन्न असते. म्हणूनच वर्गात शिकवलेल्या विषयांबाबत एकमेकांशी संवाद साधला, तर एखद्याला अर्थबोध होण्याच्या दृष्टीने आपण मदत करू शकतो; आपल्याला न समजलेली एखादी संकल्पना आपण इतरांकडून समजून घेऊ शकतो. अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूंबाबतही हा विचार करता येईल. आपल्याकडे असलेली पट्टी, पेन, वही यांसारखी एखादी गोष्ट वर्गात शिकणार्‍या एखाद्या मुलाकडे बर्‍याचदा नसते. अशा वेळी त्याला ती दिली, तर त्याचं अडलेलं काम पूर्ण तर होईलच; शिवाय आपल्याकडच्या ‘असण्याला’ मोल प्राप्त होईल.
असं हे परस्पर सहकार्याचं ‘इर्जिक’ जपताना आपल्या साहित्यातून आपल्या वाचनात येणारे शब्द आपण शोधून त्याचा वापर केला तर आपली भाषा आणि तिच्या जपणुकीला नक्कीच मदत होईल.  
- चित्रा नातू - वझे