शिक्षण माझा वसा' युवा पुरस्कारार्थी शिक्षकांसोबत शिक्षण अधिकारी सांगली व किशोर लुल्ला 
  'शिक्षण विवेक' , लुल्ला फाऊंडेशन आणि रोटरी क्लब सांगली  तर्फे नुकतेच महाराष्ट्रातल्या ध्येयवेड्या शिक्षकांना युवा शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात  आले. त्याविषयीचा हा वृतांत.... 
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या खडतर परिस्थितीतही  आपल्याकडच्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करत, नाविन्याची कास धरत, सामाजिक जाणिवेचे बीज मनात ठेवून काम करणाऱ्या युवा  शिक्षकांना उत्तेजन द्यायला हवे  हा विचार मनात ठेवून शिक्षण विवेकने  लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने अशा शिक्षकांना पुरस्कार द्यायचे ठरवले. त्यासाठी शिक्षण विवेक समूहाने  शिक्षण विभागाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना आव्हान केले. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या  शिक्षकांनी आपले वेगळे उपक्रम शिक्षण विवेककडे पाठवले. मोजक्या कालावधीत राज्यभरातून १०० हून अधिक  उपक्रम आले.  या उपक्रमांमधुन युवा शिक्षक पुरस्कारर्थीची निवड करण्यासाठी   शिक्षण विवेकने शिक्षण  तज्ज्ञाची  एक समिती नेमली. या शिक्षण विषयक समितीतल्या  तज्ञानी भाषा, गणित, विज्ञान, इंग्लिश, तंत्रज्ञान , विशेष, तसेच उपक्रमशील मुख्याध्यापक या विभागासाठीची ७ नावे काढली.  या शिक्षकांना पुरस्कार देणारा , त्यांच्या विभागातल्या कामाचा विचार करून त्याचा वापर करत , शैक्षणिक जाणिवा वाढवणारा कार्यक्रम सांगली  इथे  झाला.  
 
याकार्यक्रमात शिक्षण विषयक मुद्द्यावर विचार करायला लावणाऱ्या, पालकत्वाविषयी मंथन करणाऱ्या विषयांवरच्या विविध चित्रपटांच्या  चित्रफिती, छोट्या छोट्या नाटुकल्या, त्याविषयावर खास तयार केलेली गाणी-कविता  सादर करण्यात आल्या. दृक् श्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर, रंजक पद्धतीने सादरीकरण यामुळे कार्यक्रम प्रेक्षकांच्या दृष्टीनेही शिक्षण विषयातला कार्यक्रम असूनही तो धीरगंभीर ना होता, तरीही विचार करायला लावणारा ठरला. याशिवाय या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे कार्यक्रमाला  कोणतेही तारांकित व्यक्तिमत्त्व कार्यक्रमाला न  आणता,  प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सांगलीच्या शिक्षणाधिकारी श्रीमती निशा  वाघमोडे, डाएटचे प्राचार्य पी.  जाधव, शिक्षण विवेकचे  सल्लागार एम इ एस चे अनिल वळसंगकर,  सांगली रोटरीचे शिक्षण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, लुल्ला ट्रस्टचे किशोर लुल्ला, साप्ताहिक  विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न  झाला.  
 
 खेड्यापाड्यात काम करणारे हे शिक्षक आपल्या कामाचा सत्कार होतोय म्हणूनच नाही, तर आपल्या कामाचा उपयोग इतरांना व्हावा, आपली पद्धत अधिक  सोपी व्हावी या उद्देशाने आले होते. त्यांच्याशी बोलताना तसे  जाणवत  होते. प्रत्येकाने मंचावर  आपले मनोगत व्यक्त केले, तेव्हाही हेच  जाणवले. 
संजय शेळगे यांना गणितासाठीचा पुरस्कार मिळाला. ते म्हणाले, की " नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथल्या शाळेत मुलांना गणिताची आवड निर्माण करणं, त्यातून पुढे स्पर्धा परीक्षांकडे वळवणं , शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणं हे करण्याचा प्रयत्न केला.  त्यासाठी एका खेळावरून मी गणितातला मॅथंबोला हा खेळ तयार केला. आणि माझं उद्दिष्ट पूर्ण झालं." शेळगे सरांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्याचा शहरी शाळेकडे जाण्याचा वेग मंदावला. 
वैशाली सरोदे यांना कोरकू भाषिक मुलांना मराठी शिकवण्याच्या त्याच्या विशेष प्रयत्नासाठी पुरस्कार देण्यात आला. युवा शिक्षक पुरस्कार स्वीकारताना त्या म्हणाल्या, " मेळघाटातल्या विभागात काम करायला सुरुवात केली आणि जाणवलं की इथे शिकवण्यासाठी वेगळी माध्यमं  लागतील. म्हणून इथली स्थानिक भाषा  कोरकू शिकायला सुरुवात केली. मराठीत  शिकवण्यासाठी विद्यार्थाना आधी मुलांना मराठी समजणं, ते शिकावंसं वाटणं हेच गरजेचं होतं. त्यातूनच मी मराठी आणि कोरकू  या दोन भाषांना जोडणारी  दृक् श्राव्य माध्यमं, चित्रकार्डस वापरत गेले आणि मुलांचं शाळेत यायचं, शिकायचं, टिकायचं, वाचायचं , त्यातून  जायचं हे चक्र सुरु केला. " केवळ खिचडीसाठी नाही, तर शिकण्यासाठी मुले शाळेत जाऊ लागली. गुणवत्ता वाढू लागली. 
 
साताऱ्याच्या बालाजी जाधव यांनी तर स्वतः इंटरनेट माध्यम शिकून त्याचा तात्काळ वापर केला. स्वतः विविध परीक्षांसाठी प्रश्नमालिका देत, त्याविषयी ब्लॉग लिहीत,  व्हिडीओ टाकत , एक स्वतंत्र वेबसाईटही बनवत मुलांना शैक्षणिक मदत दिली. त्यांना पुरस्कार दिला तेव्हा त्यांनी आपल्या ऑनलाईन शैक्षणिक  गोष्टी  इंटरनेटची सुविधा नसणाऱ्या भागात ऑफलाईन पद्धतीने कशी येईल हे सांगितलं. 
रायगड जिल्ह्यातल्या  देवघरच्या  शाळेत विज्ञान विषय शिकवणार्‍या संदीप कृष्णा जाधव यांनी ज्ञानरचनावादी विज्ञानकोड्यामार्फत एक विज्ञान चळवळच उभारली आहे. व्हॉट्स अपच्या माध्यमातून हा उपक्रम दररोज 4 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, तेही मोफत. यात  विज्ञानातील गोष्टी, शोधांच्या व शास्त्रज्ञांच्या कथा, विविध प्रयोग, नित्यांच्या घडामोडीमागील विज्ञान व रंजक माहितीच असते. विद्यार्थ्यांना न कळणार्‍या, कंटाळवाण्या वाटणार्‍या विज्ञानातल्या संकल्पनांhee यात आहेत. त्यांच्या प्रयत्नासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला. 
पुरंदर तालुक्यातल्या सुपे इथल्या छाया जगदाळे यांना पुरस्कार दिला तो त्यांच्या गावातल्या मुलांना  इंग्लिश भाषा आपलीशी वाटायला लागावी या प्रयत्नासाठी. परिसरातल्या वस्तूंच्या साहाय्याने, मुलांच्याच मदतीने वस्तू जमवत त्यांनी मुलांना इंग्लिशची गोडी लावली. तर मुरबाड तालुक्यातल्या वनोटे इथल्या  विनोद सुरवसे यांनी आदिवासी कातकरी समाजातल्या कुटुंबांच्या आयुष्यात विकासात्मक बदल घडवून आणला. त्यांना जगप्रवाहात आणण्यासाठी त्यांचं वीटभट्टीच्या कामामुळे होणारं स्थलांतर थांबवलं. 
  रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतळूक गावातल्या दिनेश जाक्कर यांनी मुख्याध्यापक पदी काम करून संपूर्ण गावाचाच कायापालट केला. शाळेतल्या विद्यार्थ्याना अभ्यासाबरोबर कौशल्य प्रशिक्षण देत,विद्यार्थी असलेला समाज म्हणजेच तिथले गावकरी यांचा  सहभाग वाढवत कृतीशील शिक्षणावरही भर दिलाय.
 
  या सातही पुरस्कारार्थीची एकमेकांशी चर्चा व्हावी, त्यांनी एकमेकांचे प्रयोग वापरावेत याचाही कार्यक्रमाच्या आखणीत विचार केला होता. 
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सुमेधा दातार, यशवंत कुलकर्णी यांनी केले. 
 
 
युवा शिक्षक पुरस्कारसमयी मनोरंजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यशवंत कुलकर्णी (रेडियो सिटीचा 'बाबूभाई') आणि सुमेधा दातार