सोनेरी सकाळ

दिंनाक: 03 Feb 2017 11:11:13

 

सोनेरी सूर्योदयमाझा मुलगा ‘स्वानंद’ पहिलीत असताना त्याचे वर्गमित्र, बिबवेवाडी परिसरातील लहान मुले, त्यांचे पालक यांना घेऊन आम्ही कात्रज घाटाच्या पलीकडे असलेल्या एका छानशा टेकडीवर गेलो. पहाटेची अतिशय प्रसन्न वेळ. शहराच्या गोंगाटापासून एकदम दूर, अगदी शांत अशी ती जागा होती. टेकडीच्या माथ्यावर, जमीन थोडी स्वच्छ करून आम्ही सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. सर्व जण अतिशय तन्मयतेने, धीरगंभीर आवाजात सूर्याची प्रार्थना, सूर्यनमस्काराचे मंत्र म्हणत नमस्कार घालत होते. ‘सूर्याच्या तेजावर ध्यान’ म्हणजे काय हे बुद्धीने न कळण्याच्या वयातच, ती सगळी मुलं, जणू त्या तेजाशी प्रत्यक्षपणे एकरूप होऊन गेली होती.काही वर्षांपूर्वी  ‘स्वामी विवेकांनंद योगसंस्था’ या संस्थेतर्फे लहान मुलांसाठी एका टेकडीवर सांघिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम घेतला होता.

    थोड्या वेळाने, टेकडीच्या मागे असणाऱ्या दोन डोंगरांच्या मधून हळूहळू सूर्याचा केसरी बिंढा वर येऊ लागला. आम्ही सर्व जण नमस्कार घालण्याचे थांबवून सूर्योदय पाहू लागलो. सुर्योदयाचं हे विलोभनीय दृश्य आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या त्यांच्या विस्फारलेल्या, उत्सुक, छोट्या- छोट्या डोळ्यांमध्ये मी एकाच वेळी जणू अनेक सूर्योदय पाहिले.

काही क्षणातच, सूर्याचे कोवळे किरण टेकडीवर पडायला लागले. कोणत्याही प्रदूषणाचा लवलेशही नसलेला तो स्वच्छ परिसर जणू सोनेरी रंगाने भरला गेला. गवतावर पडलेले दवबिंदूही त्या कोवळ्या किरणांनी चमकून उठले.

    बरोबर नेलेला खाऊ मुलांना वाटत असताना काही शब्द माझ्या कानावर पडले. माझा मुलगा, त्याच्या मित्राला सांगत होता, ”अरे बिट्टू, आपल्या आपटेबाई कविता शिकवताना सोनेरी सकाळ, सोनेरी सकाळ म्हणतात ना ती हीच असेल अरे!”

त्याक्षणी आमच्या अंगावर रोमांच उठले. हजारो शब्दांत सांगूनही आम्हा मोठ्यांना जी कल्पना समजली नसती, ती त्या कोवळ्या, निरागस मानत किती अलगदपणे जाऊन भिडली होती!

    उगवत्या सूर्याला नमस्कार करताना माझ्याही मनात सहजपणे भाव उमटले, “दिव्यत्वाची जेथ प्रचिती....... तेथे कर माझे जुळती!!!  

-मनोज पटवर्धन 

[email protected]