संवादाचा थेंब.....

दिंनाक: 28 Feb 2017 11:36:32

 

थेंबाची कविता : वैज्ञानिक कविता

दोन आठवड्यांपूर्वी "थेंबा, थेंबा येतोस कोठून ?" ही कविता आठवणीतील कविता या अँपवर वाचायला मिळाली. या कवितेच्या खाली नाव दिलं आहे ताराबाई मोडक. म्हणून मी आपल्या बालशिक्षणाच्या पुरस्कर्त्या ताराबाई मोडक यांच्या नावावर ही कविता मिळते का? ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यांचे जे साहित्य उपलब्ध झाले; त्यात काही ही कविता मिळाली नाही. अनेकांना सदर कवितेबद्दल विचारले; पण कुठूनच काही माहिती मिळाली नाही. पण या कवितेतून व्यक्त होणारा आशय मला काही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे या कवितेबद्दल लिहिण्याचा मोह मला टाळता आला नाही. सदर कविता जशी मला वाचायला मिळाली तशीच येथे देत आहे. (या संदर्भातला तपशील कुणाला मिळाला तर तो अवश्य कळवावा.)

 

थेंबा, थेंबा येतोस कोठून ?

 

"थेंबा, थेंबा कोठून येतोस ?

कोठे जातोस ? कोठे राहतोस ? "

 

"बाळ, मी लांबून येतो, उंचावरून येतो

आणि जमिनीच्या पोटात शिरतो ."

 

"थेंबा, थेंबा खरं खरं सांग— 

कोठून येतोस, कोठे जातोस ?"

 

"मी जमिनीवरून वर जातो,

आकाशातून खाली येतो .

खाली नि वर,

वर नि खाली,

येतो नि जातो,

जातो नि येतो ."

 

"अरे, आकाशातून येतोस,

हे तर खरं आहे;

पण खालून वर जातोस कसा?"

 

"उन्हाळ्यात फार ऊन पडतं ना ?

मग आम्ही खूप खूप तापतो.

वाफ होऊन आम्ही वर जातो.

वर जाऊन खूप खेळतो .

इकडून तिकडे, तिकडून इकडे

धावतो, पळतो,

डोलतो, लोळतो.

मग खाली येतो.

 

आम्ही नसलो तर

नद्या, नाले आटतील.

तळी, विहिरी आटतील.

शेते सुकतील.

मग खाल काय ? प्याल काय ?"

 

"खरंच भाऊ, किती तुझा उपयोग ! "

 

 

— ताराबाई मोडक

 

विज्ञानाची एक प्रक्रिया सांगणारी ही कविता आहे. या कवितेतून लहान मुलाला पावसाच्या निर्मितीबद्दल पडलेला प्रश्न येतो आहे. (प्रश्न विचारणं आणि उत्तरं मिळवणं यातच रमलेली असतात नाही लहान मूल.) खरं तर ते या लहान मुलाचं कुतूहल आहे. ते कवितेतसारख्या साहित्य प्रकारातून व्यक्त होतं आहे. कवितेतल्या मुलाचं वय पाहता हा मुलगा खूप लहान आहे, हे कळतं आहे, ते "बाळ" या संबोधनातून. थेंब आपल्याला दिसतो, पण तो कुठून येतो, कुठे राहतो हे मात्र या लहान मुलाच्या बुद्धीला आकलन होत नाही. म्हणून त्याला खूप प्रश्न पडतात. ते प्रश्न कुणाला विचारणार हा लहान मुलगा? म्हणून ज्याला विचारला पाहिजे त्या “थेंबा”लाच तो प्रश्न विचारतो, खूप प्रश्न विचारतो. अगदी घाईघाईत विचारतो. त्याच्या या प्रश्न विचारण्याच्या वेगात एक निरागसपण दडलेलं आहे. त्या निरागसपणाला त्या थेंबाने खूप छान समजून घेतलं आहे. त्या लहानग्याच्या प्रश्नांना तो थेंब खूप छान उत्तर देतो आहे. त्याला समजेल, उमजेल आणि त्याच्या कुतूहलाला उत्तेजेन मिळेल अशी उत्तरं देत आहे. त्याची एक झलक -

"मी जमिनीवरून वर जातो,

आकाशातून खाली येतो .

खाली नि वर,

वर नि खाली,

येतो नि जातो,

जातो नि येतो ."

उत्तरं अशी की, ज्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील आणि त्यातली लय अशी की मुलाला नेमकेपणाने कळेल ती थेंबाची प्रक्रिया कशी.

बालकविता या सदरात मोडणारी, पण विज्ञान सांगणारी ही कविता अगदी साधेपणाने आपल्यासमोर येते. ते साधेपण आपल्याला विज्ञान शिकवताना, समजून घेताना नक्कीच मदत करत राहतं. या थेंबाचा प्रवास “वर नि खाली, खाली नि वर” या लयीतून मुलाला लक्षात राहण्याजोगा मांडला आहे. कुणाही लहान मुलाला ही कविता ऐकवली तर लहान मूल, या थेंबाचं आणि पर्यायाने पावसाचं चक्र कधीच विसरणार नाही.    

क्रियापदांचा योग्य तो उपयोग या कवितेत आला आहे. या क्रियापदांनी खरं तर कवितेला एक लय आली आहे. मुलांना आवडतील, रुचतील आणि लक्षात राहतील असा क्रम या कविता लेखनामागचा उद्देश सफल करताना दिसतात, “धावतो, पळतो, डोलतो, लोळतो.” कवितेच्या शेवटी थेंब आणि लहान मूल यातलं जे नवीन निरागस नातं दिसतं आहे, ते एकदम दिलखुलास आहे. हा लहान मुलगा या थेंबाला काय म्हणतो आहे, पाहा "खरंच भाऊ, किती तुझा उपयोग !" हा उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण मुलाला तो कळतो आहे तो थेंबाकडून, ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. थेंब, थेंबाचं महत्त्व कवितेत माणूस नाही सांगत, थेंब सांगतो, निसर्ग सांगतो, तेही एका लहान, वयाने अपरिपक्व असलेल्या मुलाला सांगतो आणि त्या अल्लड मुलाला ते नेमकं कळतं आहे. (किती योग्य विज्ञान आहे नाही हे.)

“अवघड ते काहीच नाही”, असा एक सुज्ञ सल्ला ही कविता देते. विज्ञानही सोप्या; मुलांना आणि मोठ्यानाही समजेल अशा पद्धतीने सांगण्याची ही सहज, सोपी पद्धत मला खूप भावली. आपल्या शिक्षणव्यवस्थेने अशा अभ्यासपूरक गोष्टीचा शोध घ्यायला हवा आणि अभ्यासक्रमात समावेश करायला हवा. काय वाटतं तुम्हाला? नक्की सांगा. आपण अशा छान गोष्टी शोधू शकतो आणि आपल्या मुलांना देऊ शकतो. तुम्हाला मिळाल्या, तर नक्की पाठवा. आपण आपल्या संकेतस्थळावर नक्की देऊ. त्याचा संग्रह करू.        

-    डॉ. अर्चना कुडतरकर

[email protected]