शिवजयंती वृत्त

शिशुविहार कर्वेनगर या शाळेत शिवजयंतीनिमित्त मोहन शेटे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम घेण्यात आला. ‘लेखक, कवी, वक्ते यांचा विद्यार्थ्यांशी संवाद’ या शिक्षणविवेक उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळात झालेल्या कार्यक्रमात वक्ते मोहन शेटे यांच्यासोबत मुख्याध्यापिका मिनाक्षी खिरीड आणि शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमात मुख्याध्यापिका मिनाक्षी खिरीड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अर्चना कुडतरकर यांनी शिक्षणविवेक वेबसाईटबद्दल विद्यार्थिनीशी संवाद साधला. इतिहास विषयात एम. ए. झालेल्या आणि इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष म्हणून दायित्व सांभाळणाऱ्या मोहन शेटे यांनी दीड तास विद्यार्थिनींना आणि सर्व शिक्षकांना अगदी खिळवून ठेवले होते. ‘क्रांतिसूर्य सावरकर’ या महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन करणाऱ्या मोहन शेटे यांचा शिवाजी महाराज या विषयाचा अभ्यास या वेळी ऐकायला मिळाला.

‘स्वराज्याची पहिली लढाई’ ही कथा सर्व विद्यार्थिनींना अक्षरशः त्या काळात जाऊन अनुभवायला मिळाली. शिवरायांचे गड किल्ले बांधण्यामागचे तंत्र, सपाट जागांपेक्षा डोंगर-दऱ्यावरील बांधकाम यांच्यापासून सुरुवात झालेल्या कथाकथनात गड, किल्ले पाहताना इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचा अनुभव आणि ‘देशभक्तीच सिमेंट’ यांचा उल्लेख मोहन शेटे यांनी आवर्जून केला. आदिलशहाने पाठवलेला पहिला मुघल सरदार म्हणजे फत्तेखान. या फत्तेखानाला मावळ्यांनी दाखवलेला ‘हिसका’ ऐकताना संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. जणू ती पूर्ण लढाई आपण समोर पाहत आहोत, असे भाव सर्वांच्या चेहेऱ्यावर  होते. शत्रूजवळ आल्यावर रयतेचा थरकाप, सोनोपंत डबीर, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे या मावळ्यांचा आत्मविश्वास, ७००० सैन्यावर ३०० मावळ्यांनी केलेली चाल, शिवाजी महाराजांची युद्धनीती, गनिमी कावा आणि गोदाजी जगताप या सेनापतींची कामगिरी याचे हुबेहूब चित्र त्यांनी आपल्या कथाकथनातून रंगवले. या लढाईमध्ये १२ वर्षाचा बाजी जेधे हा कुमार केवळ लढाई पाहण्यासाठी म्हणून गेला होता. ‘केवळ लढाई पाहण्यासाठी’ म्हणून गेलेल्या बाजी जेधेने भगवा ध्वज सांभाळण्यात मारलेली ‘बाजी’ ऐकताना श्रोत्यांच्या मनातील आवेशही लक्षात येत होता. दोन्ही हातात दाणपट्टे, तोंडात घोड्याचा लगाम आणि डोळ्यात केवळ भगव्या ध्वजाविषयी आदर हे वर्णन ऐकताना अक्षरशः स्फुरण चढत होते. ही देशभक्तीची रुजवण करणारे शिवाजी महाराज म्हणजे रयतेसाठी प्रेरणास्थान होते. पुरंदरावर शत्रू चालून आल्यावर शस्त्रे उपलब्ध नसताना शिवरायांनी दगड-गोट्यांचा वापर करून दाखवलेले प्रसंगावधान देखील त्यांनी या वेळी वर्णन केले. कथाकथनात बगावत, भागो, कम्बख्त असे शब्द कानी पडत असल्यामुळे अगदी शिवकालीन युध्दप्रसंग साकारला गेला. ‘स्वराज्याची पहिली लढाई’ पहिल्यांदाच मोहन शेटे यांच्याकडून विद्यार्थिनींनी अनुभवली. कथा ऐकताना विद्यार्थिनींच्या डोळ्यात शिवरायांबद्दल आदर आणि तोंडातून ‘हर हर महादेव’ हे उद्गार निघत होते. या वेळी संपूर्ण वातावरण शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने उत्साह्मय झाले होते.  

-रुपाली  सुरनिस

[email protected]