हाय फ्रेंड्स! सध्या शिक्षणविवेकच्या माध्यमातून आपण विज्ञान आठवडा साजरा करतोय. विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांवर प्रकाश टाकतोय. विज्ञान किंवा शास्त्र म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतात ते ठरलेले विषय. विज्ञानाचा पेपर म्हणजे भौतिकशास्त्रातील नियम, रसायनशास्त्रातील प्रयोग आणि जीवशास्त्रातील आकृत्या हे आणि इतकंच आपल्याला माहिती असतं आणि तितकंच आपल्याला आठवतं. थोडं पुढे खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान या विषयांचा परिचय होतो. विज्ञानाच्या बाबतीत आपली गाडी यापुढे जात नाही. भाषाविज्ञानासारखे विषय तर कॉलेजमध्ये गेल्यावरच समजतात. तेसुद्धा आपण साहित्य हा विषय घेतला असेल तरच. असं असलं तरी भाषेलाही एक विज्ञान असतंच. भाषा आणि विज्ञान हे समीकरण कानाला वेगळं वाटत असलं तरी भाषा हे सुद्धा एक शास्त्र आहे. कसं ते पाहू या.

मित्रांनो, आपण बोलतो म्हणजे नेमकं काय करतो? एकमेकांशी संवाद साधतो. म्हणजे आपण एकमेकांशी शब्दांचा वापर करून बोलतो. आपल्याला काय वाटत ते सांगतो. पण शब्द अस्तित्वात येण्यापूर्वी आपण चित्रांच्या, हावभावाच्या, निरनिराळ्या आवाजांच्या माध्यमातून संवाद साधत होतो. शब्दांच्या माध्यमातून बोलता येतं ही क्षमता माणसाला कळून आली आणि संवादाचा मार्ग अधिक सोपा झाला. याचाच अर्थ शब्दभाषेमुळे बोलणं सोपं झालं. म्हणजेच भाषा झाली संवादाचं माध्यम. एक किंवा अनेक माणसांमध्ये संवाद साधणं,लिहिणं भाषेमुळेच शक्य झालं. मग निरनिराळे लोक आपापल्या क्षमतेप्रमाणे लिहू लागले. भाषणे देऊ लागले. समाजाला शिक्षित करण्याचं काम करू लागले. चांगली मूल्य आपल्या वर्तणुकीसह शब्दांच्या माध्यमातून समाजात रुजवू लागले. नाट्य, गीत, अभिनय, संगीत अशा अनेक कलांना यामुळे अधिक अर्थपूर्ण रूप आलं. थोडक्यात सांगायचं तर, भाषा ही अभिव्यक्त होण्याचं माध्यम झाली. त्याचबरोबर समाज आणि माणूस यांना जोडण्याचं; त्यांना सुसंस्कृत करण्याचं कार्यही भाषेनं केलं. म्हणून भाषा झाली एक व्यवस्था म्हणजेच सिस्टीम.

जन्म घेतल्यापासूनच आपला या व्यवस्थेशी संबंध येतो. आईच्या पोटात असल्यापासून आपण ऐकत असतो. थोडे मोठे झाल्यावर हळूहळू आधी बोबडे आणि मग ऐकून ऐकून नीट सुस्पष्ट बोलू लागतो. प्रत्येक इयत्तेत आपण भाषेचे वेगवेगळे स्तर शिकत जातो. आधी अ, आ, इ, ई, हे स्वर, क, ख, ग, घ ही व्यंजन, स्वर आणि व्यंजन यांच्या योग्य वापरातून अर्थपूर्ण शब्द, त्यानंतर अर्थ प्रकट करणारी वाक्य आणि मग धडे. असा साधारण भाषा शिकण्याचा क्रम असतो. भाषा शिकण्याची जी पातळी पहिलीत असते त्याच्या पुढची दुसरीत असते. भाषेचे हे स्तर ठरवण्यामागे असतं विज्ञान. कारण एखाद्या बालकाचा आकलनाचा जी क्षमता पहिलीत असते; त्यापेक्षा जास्त दुसरीत असते, त्यापेक्षा जास्त असते तिसरीत. त्यामुळे आपल्या क्रमिक पुस्तकांची रचनादेखील याच पद्धतीने केलेली असते. भाषेच्या शब्दांतून, वाक्यातून, त्या त्या परिच्छेदामधून काही न काही अर्थ आपल्यापर्यंत पोहोचत असतो.

मित्रांनो, केवळ काही अक्षरं एकत्र करून शब्द तयार होत नाहीत. ती अक्षरं योग्य क्रमाने, आवश्यक विरामचिन्हांचा वापर करून लिहावी लागतात. अगदी असंच आपल्याला वाक्यांच्या बाबतीतही म्हणता येतं. केवळ शब्दांच्या समूह म्हणजे वाक्य नव्हे. योग्य ते शब्द योग्य त्या क्रमाने लिहावी लागतात. मराठीत आपण सरळ वाक्य कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमाने लिहितो. आवश्यक असेल तेव्हा त्याचा क्रम बदलतो. त्याशिवाय हवा तो अर्थ ऐकणाऱ्या किंवा वाचनाऱ्या माणसापर्यंत पोहोचत नाही. फक्त शब्दांची रचना पाहूनही चालत नाही, तर योग्य ते शब्दही योजावे लागतात. म्हणजे एखाद्या चित्राला सुंदर म्हणायचं, रम्य म्हणायचं, की नेत्रसुखद म्हणायचं याचाही विचार करावा लागतो. हा सगळा विचार जेव्हा केला जातो, तेव्हाच अपेक्षित अर्थ सिद्ध होतो.

जेव्हा जेव्हा विज्ञान किंवा शास्त्र हा शब्द उच्चारला जातो, तेव्हा तेव्हा नियम, समीकरणे या गोष्टी अपेक्षित असतात. त्यामुळे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या प्रमाणेच भाषा हे देखील शास्त्र आहे आणि त्याचेही नियम आहेत आणि ते अर्थाच्या अचूकतेसाठी आहेत. म्हणूनच महाविद्यालयात भाषाशास्त्र हा वेगळा विषय आज शिकवला जातो. त्याचा परिचय तुम्हाला व्हावा म्हणून हा छोटासा लेख. कसा वाटतो ते नक्की सांगा.

- मृदुला राजवाडे 

-[email protected]