कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेचा रसास्वाद : मराठी भाषादिनानिमित्त

२७ फेब्रुवारी, मराठी भाषादिन. तो का?, कशासाठी?, कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ?, कधीपासून? साजरा केला जातो वैगरे सगळे तपशील आता आपल्या सगळ्याना अगदी तोंडपाठ झाले आहेत. अगदी रात्री झोपेतून उठवून जरी आपल्याला कुणी विचारलं तरी आपण सांगू शकतो. नाही का? या एका दिवशी आपण त्याची उजळणी करतो, या सगळ्याचं कौतुक पण करतो आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, तिची आजची स्थिती किती वाईट आहे, आपण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, वैगरे खंत ही व्यक्त करतो. पण तिच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, याचं उत्तर मात्र शोधत नाही. सध्या शिक्षणाचं माध्यम बदललं आहे, त्याचे गोडवेही गायले जातात, तेच माध्यम मुलाचा विकास साधण्यासाठी, त्याचं भवितव्य घडवण्यासाठी योग्य आहे, असा प्रचारही केला जातो आणि मुलानांही तेच शिकवलं जातं. मूलही तेच योग्य असतं असं मानतात आणि मग त्याचं आपल्या भाषेशी असणारं नातं, आपल्या भाषेशी असणारी नाळ तुटते. हे नाळ तुटणं, भाषेशी असणारं नातं संपणं योग्य नाही, हे कुठेतारी थांबलं पाहिजे, यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असं मनात येत असतानाच मंगेश पाडगावकर यांची पिंकी कविता वाचनात आली. या कवितेतील युक्तिवाद करणारा आणि त्यात जिंकणारा तो (हा तो म्हणजे कोण ते तुम्हीच शोधा बरं. कविता अनेकार्थक्षम असते, हे कवितेचं महत्त्वाचं लक्षण असतं, बरं का? हा तो कुणाला मित्र वाटेल, कुणाला आजोबा, कुणाला मार्गदर्शक. पण तो कवितेच्या समीक्षेच्या भाषेत सांगायचं झालं, तर तो असतो, 'कवितागत मी'. या कवितागत 'मी'ला सोयीसाठी इथे 'तो' म्हणणार आहे आणि कवितेच्या समीक्षेच्या भाषेत पिंकी ही कवितागात 'तू' आहे. आपल्या लहानग्या वाचकांचा वाचताना गोंधळ होऊ नये म्हणून पिंकीला कवितागत तू न म्हणता पिंकीचं म्हटलं आहे.) मला खूप भावला. पिंकीला, समजेल, रुचेल आणि ती अमलात आणू शकेल, अशी सहज, साधी कृती या कवितेतील तो करतो. ती कविता इथे मुद्दाम देत आहे.

पिंकी

पिंकी इंग्लिश शाळेत जाते,

मी तिला फार भितो!

ती वाटर ड्रिंक करते,

मी आपला पाणी पितो!

 

जाडे जाडे इंग्लिश शब्द

तिच्या तोंडात ऊठसूट,

माझ्या पायात साधी चप्पल,

तिच्या पायात छान बूट!

 

ती म्हणाली, ‘केक या शब्दाला

मराठी शब्द कुठला?

आता गप्प बसलास ना?

बघ तुला घाम फुटला !'

 

मराठीच्या प्रेमामुळे

गप्प मला बसवे ना,

इंग्रजीची तिची ऐट

मुळीच मला ऐकवे ना!

 

मी तिला ताडकन म्हटले,

‘वरणभात आणि पिठले

यांना तुझ्या इंग्रजीत

सांग बरे शब्द कुठले?'

 

हे ऐकून पिंकी गप्प,

तिला काही सुचे ना,

इंग्रजीत पिठले खाईल

असा शब्द मिळे ना!

 

आता पिंकी घरी गुपचूप

मराठीत पिठले खाते,

आणि वरणभातावर

मराठीत लिंबू पिळते!

 

  या कवितेतील 'तो'चा पिंकीला सांस्कृतिक संचित देण्याचा विचार खरंच आपल्याला खूप काही शिकवून जातो. दुसऱ्या भाषेचा अतिवापर आपल्या भाषेला मारक असतो, आपली संस्कृती संपवणारा असतो असा एक साधा विचार या कवितेतला 'तो' करतो. पिंकीचं इंग्रजी भाषा प्रेम या कवितेतील 'तो'ला खूप त्रास देतं आहे, पण पिंकी मात्र त्याला प्रिय आहे, हवीशी आहे. म्हणूनच तिला आपल्या भाषेविषयी प्रेम वाटलं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा 'तो' बाळगतो. हा जो 'तो' आहे, ना तो भाषेची आवड जोपासणारा, तिचं महत्त्व जाणणारा आहे. ती आवड, ती जाण पिंकीमध्येही यावी, तिचा इंग्रजी भाषेबद्दलचा तोरा आणि मराठी भाषेबद्दलचा अनादर संपावा असं त्याला वाटतं आहे. (ही अपेक्षा आपणही व्यक्त केली तर, काय होईल जरा विचार करा.)

भाषा बदलली की, जगण्याचा परिघच बदलून जातो, आपलं राहणीमान बदलतं, त्यात तफावत येते, आचार-विचार बदलतात, रोजच्या गोष्टी परभाषेतून व्यक्त होऊ लागतात, याचं नेमकं भान ही कविता देते. खरं तर भाषेतून येणारं परिवर्तन भाषेपुरतं मर्यादित न राहता ते आपलं सगळं जीवनच बदलून टाकतं, याचाही हिशोब ही कविता मांडते. (याची खरंच काही गरज नसताना हे घडतं, हे आपल्या आजूबाजूला पहिलं की, आपल्याला सहज उमगून येतं) कवितेचं पहिलं, दुसरं कडवं आपल्याला तेच सांगतं. आचरा-विचारातील हा भेद अगदी खाद्यसंस्कृतीपर्यंत पोहोचतो आणि कवितेतील हा तो “जागा” होतो आणि तारतम्य बाळगत सगळा विषय आपल्या हातात घेतो आणि केकचं महात्म्य वरणभातावर आणतो. पिंकीला, तिला समजेल अशा भाषेत गप्प बसवतो. पण ते गप्प बसवणं जे आहे, ते एकदम भारी आहे. ते भारी का आहे, तर ते कायमचं झालेलं परिवर्तन आहे म्हणून भारी आहे. त्यासाठी कवितेचं शेवटचं कडवं परत एकदा वाचा.

ही कविता आपल्यासमोर 'तो' आणि पिंकी यांच्यातला एक संवाद मांडते. हा संवाद भाषेच्या संदर्भातला आहे, पण त्यात एक संघर्षही आहे. तो संघर्ष भाषेसंदर्भातलाच आहे. परभाषा आणि मातृभाषा यांच्यातील फरक मांडणारा हा छोटा संवाद, सद्य परिस्थितीविषयी खूप छान बोलतो. सात कडवी असणारी ही कविता; साध्या, सोप्या शब्दातील हा संवाद भाषादिनादिवशी मुद्दाम वाचा. सुज्ञ वाचकांना त्याचं महत्त्व पटल्याशिवाय राहणार नाही. या कवितेचा रूपबंधही आपल्याला मराठी भाषेचं वेगळेपण सांगणारा आहे. भाषेची लिंगव्यवस्था सांभाळत, योग्य तिथे यमक जुळवत तरी मुक्तछंदात लिहिली गेलेली ही कविता कोणताही अडथळा न येता आपल्याला शेवटपर्यंत वाचावीशी वाटते आणि परत परत वाचावीशी वाटते, यातच या कवितेचं यश आहे.

खरं तर हे बडबडगीत वाचताना मला एक प्रश्न पडला की, मंगेश पाडगावकरांनी इतका गंभीर विषय इतक्या लहान मुलांसाठी का निवडला असेल? पण जेव्हा मी कविता दोन-तीन वेळा वाचली, तेव्हा लक्षात आलं की, अरे हो, या वयाची मुलं असणारे पालकच ही गीतं वाचणार आणि याच वयाच्या मुलांना हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे नाही का? या वयात होणारा ‘स्व’भाषेचा संस्कार अधिक महत्त्वाचा आहे आणि मूलभूत आहे. या वयाच्या मुलांवर नव्हे, तर त्यांच्या पालकांवर संस्कार होणंही तितकंच अगत्याचं आहे, असा संदेश देणारी ही कविता नक्की वाचा आणि त्यातला विचार कृतीत आणा. या कवितेतला विचार कृतीत आणला असेल तर आम्हाला नक्की सांगा.

-    अर्चना कुडतरकर

[email protected] 

(ही कविता मंगेश पाडगावकर यांच्या ‘अफाटराव’ या संग्रहातील आहे. देखणी चित्र असणाऱ्या या संग्रहात एकूण २४ बडबडगीतं आहेत. हा संग्रह मुळातून वाचलात तर तुम्हाला खूप आनंद मिळेल. अगदी छोटी छोटी आहेत ही गीतं. २०-२५ मिनिटात सगळी गीतं वाचून होतात. आणि आपण अफाट काहीतरी मिळवल्याचं समाधानही देतात.)