स्वातंत्र्यसूर्य - स्वातंत्र्यवीर सावरकर

 


 

 

‘‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने।

लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने॥

जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे।

बुद्धयाचि वाण धरिले करि हे सतीचे॥

मित्र-मैत्रिणींनो, समज आल्यापासून सावरकरांनी भारतभूमी बंधमुक्त करण्याचे व्रत आंधळेपणाने स्वीकारलेले नव्हते, हे यावरून आपल्याला कळते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे जणू तेजोरश्मीने दाहक असे स्वातंत्र्यसूर्य होते. स्वातंत्र्यप्राप्तीकरता कोणतेही कार्य करण्याची तयारी असतानाच, प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरायला मात्र ते विसरत नसत. स्वतांत्र्यपूर्व काळात कधीही कोणालाही ठोठावण्यात न आलेली दोन जन्मठेपेंची शिक्षा म्हणजे पन्नास वर्षांच्या कारावासाची शिक्षा खांद्यावर खेळवताना सावरकर म्हणाले होते, ‘आपली प्रिय मातृभूमी अंतिम विजयापर्यंत पोहोचवायची असेल, तर आम्ही अशा हालअपेष्टा, असे त्याग सहन केले; तरच ती पोहाचू शकेल अशी माझी श्रद्धा आहे.’ जन्मठेपेचा सारा कालखंड त्यांना अंदमानच्या अंधारकोठडीत व्यतीत करायचा होता, पण मातृभूमीपासून दूर जाताना या स्वातंत्र्यवीराने तिला अभिवचन दिलं -

‘‘सारथी जिचा अभिमानी, कृष्णजी अणी राम सेनानी।

अशी तीस कोटि तव सेना।

ती आम्हाविना थांबेना।

परि करूनि दृष्टदलदलना।

रोविलचि स्वकरी स्वातंत्र्याचा हिमाजयावरि झेंडा जरतारी॥

अंदमानात तेलाचा कोलू फिरवताना वर्षानुवर्षे त्यांनी प्रचंड हालअपेष्टांना तोंड दिले. एकांतवासही स्वीकारला, कारण मनात एकच दुर्दम्य इच्छा होती, माझा भारत स्वतंत्र व्हावा, बलशाली व्हावा. हे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांची रणनीती अंगिकारली होती. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ हा त्यांचा संदेश होता, कॉलेजमध्ये असताना सावरकरांनी रचलेला तानाजीचा पोवाडा तरुणाईमध्ये भयंकर जोश भरून गेला होता.

‘‘तानाजी चढू लागले।

सद्भाग्य चढू लागले।

स्वातंत्र्य चढू लागले हो जी.. जी.. जी..।’’

स्वातंत्र्यप्राप्तीचा यज्ञ सफल व्हावा म्हणून त्यागाचे कंकण बांधून, कोणत्याही आहुती यज्ञकुंडात टाकाव्या लागल्या; तरी सावरकरांची तयारी होती. येसुवहिनींना लिहिलेल्या पत्रात सावरकरांनी लिहिले होते-

‘‘त्वत्स्थंडिलावहर बळी प्रिय बाल झाला।

त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला॥

हे काय बंधु असतो जरि सात आम्ही।

त्वत्स्थंडिलीच असते दिधले बळी मी॥

सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातला स्थायीभाव कोणता? या प्रश्‍नाचे देशभक्ती, एवढेच उत्तर दिले तर ते अपुरे पडेल. ते उत्तर पूर्ण करण्यासाठी देशभक्ती या शब्दाबरोबरच ‘स्वातंत्र्यलालसा’ या शब्दाचाही उपयोग करावा लागेल. सावरकर यांची देशभक्ती स्वातंत्र्यलालसामूलक आहे व त्यांना भारतीय स्वातंत्र्याची तळमळ होती. सर्व मानवजात सुखा-समाधानात नांदायची असेल, तर भारतीय मानवसमाजही सुखा-समाधानात नांदला पाहिजे व जोपर्यंत हा समाज परकी सत्तेच्या पुढे नम्र झालेला आहे, तोपर्यंत तो सुखात नांदणे शक्य नाही; अशी सावरकरांची विचारसरणी असल्यामुळे त्यांची भारतीय स्वातंत्र्याची लालसा नि:स्वार्थी व उदात्त होती.

अशा या अभिजात स्वातंत्र्यवीराच्या तेजस्वी जीवनाची महती गाताना कविवर्य ग.दि. माडगूळकर यांनी म्हटले आहे,

‘‘आकाशातून विशाल भासे त्यांचे व्यक्तिमत्त्व।

कर्पुरसे जो जाळी अपुले अवघे कर्तृत्त्व॥

चिरंजीव या हौतात्म्याचा विजयी अभिमान।

इतिहासाविण कुणी करावा याचा सन्मान॥

मित्र-मैत्रिणींनो शेवटी एवढेच म्हणते,

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान।

सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान॥

- शिवांगी विनय बोडस

-अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स