विज्ञानकोडे

दिंनाक: 24 Feb 2017 12:03:11

 

विज्ञान शिक्षक संदीप जाधव : विज्ञानशिक्षणाचा  प्रसार करताना

शिक्षकाचे नाव :  संदीप कृष्णा जाधव  

शिक्षण : एम .ए.,  डी.एड., बी. एड.

शाळेचे नाव : जि.प.प्राथ.शाळा देवघर, जि. रायगड.

 

विज्ञान हा अत्यंत मनोरंजक आणि सर्वसमावेशक विषय आहे . मात्र अभ्यासात मागे असणाऱ्या व विज्ञान विषयाची आवड नसणाऱ्या  विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणे महत्त्वाचे आहे. विज्ञानाच्या प्रयोगांव्यतिरिक्त विज्ञानाचे ज्ञान मिळवताना विद्यार्थ्यांना निरसता वाटते. विद्यार्थ्यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत उत्फूर्तपणे सहभागी होणे गरजेचे आहे. भिन्न गुणवत्ता पातळीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मनोरंजनातून विज्ञान शिकावावे असे जि.प.प्राथ.शाळा देवघर, जि. रायगड या शाळेतील संदीप जाधव यांना वाटत होते.

‘विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास’ हे ब्रीद मनाशी बाळगून संदीप जाधव यांनी ‘नोबेल सायन्स’  या द्वैमासिकाचे  काम सुरू केले आहे. या द्वैमासिकाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त विज्ञान घडामोडी, प्रेरक शास्त्रज्ञ, विज्ञानाच्या गमतीजमती, वैज्ञानिक दिनविशेष, विज्ञानाचे प्रयोग, वैज्ञानिक उपकरणे अशी वैविध्यपूर्ण माहिती असते. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा विचार करून विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना सचित्र स्पष्ट केलेल्या असतात.

या मासिकाचे संपादक  संदीप जाधव यांनी त्यांच्या जि.प.प्राथ.शाळा देवघर, जि. रायगड या शाळेत ‘विज्ञानकोडे’ हा उपक्रम सर्वप्रथम राबवला. यामध्ये विज्ञान विषयातील कठीण घटकांचे संबोध, संकल्पना या सहज, सोप्या व मनोरंजक पद्धतीने मांडल्या जातात. चार ते सहा ओळींत दिलेल्या गुणवैशिष्ट्यांवरून विज्ञानकोडे सोडवायचे असते. मोबाईलवरूनही या उपक्रमाचा उपयोग करून घेता येतो. व्हॉटस अपवर दररोज एक विज्ञानकोडे पाठवले जाते. शिक्षक हे कोडे परिपाठ फलकावर लिहितात. कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी एक दिवसाचा वेळ दिला जातो. या वेळी विद्यार्थी आपसांत, पालकांशी चर्चा करतात. दुसऱ्या दिवशी परिपाठाच्या वेळी त्याचे उत्तर दिले जाते. शिक्षक या उत्तराचे वैज्ञानिक स्पष्टिकरण देतात. सर्वप्रथम उत्तर सांगणाऱ्या विद्यार्थ्याला एका शास्त्रज्ञाचे नाव देऊन त्या शास्त्रज्ञाच्या कार्याची माहिती सांगितली जाते. परिपाठ फलकावर विद्यार्थ्याच्या नावासमोर शास्त्रज्ञाचे नाव लिहून त्या विद्यार्थ्याचा सत्कार केला जातो. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन विज्ञानकोडे दिले जाते. अशा स्वरूपात ऑगस्ट २०११ पासून चिखलप केंद्रामध्ये व नंतर म्हसळा तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जातो. महाराष्ट्रातील मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दु माध्यमाच्या ३००० पेक्षा जास्त शाळांमध्ये राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात दररोज चार लाख पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतात.  तसेच कर्नाटकमधील बेळगाव परिसरातील मराठी भाषिक शाळा, दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील मराठी भाषिक शाळा स्वयंस्फू स्फुर्तीने हा उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता व चिकित्सक वृत्ती वाढून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. विज्ञान अभ्यासाची भीती नाहीशी होऊन त्यांचे सामान्यज्ञान वाढते. काही शाळांतील विद्यार्थी स्वत: कोडी तयार करू लागले आहेत, असा अनेक शाळांचा अनुभव संदीप जाधव यांनी सांगतात. विज्ञानकोडे हा उपक्रम रायगड जिल्ह्यामधून प्रथम क्रमांकाने निवडला गेला आहे. राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी २०१६-२०१७ साठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५० उपक्रमांमध्ये या उपक्रमाची निवड झाली होती. तसेच ‘शिक्षणविवेक’ व टी.बी. लुल्ला फाउंडेशन आयोजित ‘शिक्षण माझा वसा’ या पुरस्काराने संदीप जाधव यांना गौरवण्यात आले आहे.   आपणही असा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना विज्ञान साक्षर करू  शकतो.

 

-रुपाली सुरनिस

[email protected]