विज्ञान - मोजमापे

दररोजच्या व्यवहारात अनेक मोजमापांचा आपण विचार करत असतो. जसे - १ किलो वजनात किती बटाटे येतात? या मोटरीचा वेग किती आहे? इ. थोडक्यात काय तर आपल्या अनेक क्रिया, विविध कृती यांचा या मोजमापांशी फार जवळचा संबंध आहे आणि तो अगदी रोजचा आहे.

मोजमापे म्हणजे ग्रॅम-किलोग्रॅम; सेंटीमीटर-मीटर; इंच-फुटी- मैल; या गोष्टी आहेतच, पण ही मापे अस्तित्वात कशी आली? असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना, या मोजमापांचा आधार मुळात आपल्या शारीरिक मोजमापांवर आहे, हेही आपल्याला कळते. 

पूर्वी जेव्हा मोजमाप करायला उपकरणे उपलब्ध नव्हती, तेव्हा आपल्या शारीर अवयवांनी मोजमाप केले जायचे. चालताना किती लांब चाललो याचा अंदाज घेण्यासाठी ‘फूट’ हे मोजमाप आले. इंग्लिशमधील फूट या शब्दाचा अर्थ पायाची लांबी असा आहेआणि त्यावरूनच लांबीचे मोजमाप फुटात केले जाते. टाचेपासून अंगठ्यापर्यंतची लांबी म्हणजे ‘फूट’ म्हणजे आपले पाऊल. आपली अशी तीन पावलं म्हणजे एक यार्ड. याचप्रमाणे हातांचाही वापर लांबी मोजताना करत असत. एकंदरीत ‘मापनपद्धतीचा विकास’ अभ्यासणे अगदी मनोरंजक आहे.

या मापन पद्धतीचा म्हणजे गणिताचा आणि विज्ञानाचा फार जवळचा संबंध आहे. ओघानेच गणित आणि विज्ञान यात या मापनपद्धतींचे स्थान फार मूलभूत असणार हेही आपल्याला कळते. ‘मेट्रिक’ पद्धती आणि ‘इपिरिअल’ पद्धती या दोन परिमाण पद्धतींचा वापर आज प्रामुख्याने केला जातो. यातील परिमाणांना Si (system international) परिमाणे असे म्हणतात.

लांबी, वस्तुमान आणि काळ ही मोजमापे मूलभूत आहेत; तर वेग, बल, दाब, घनता...यांसारखी परिमाणे या मूलभूत मोजमापांवरून तयार होतात. सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष, शतक, दशक, शतक, याप्रमाणे कालमापन केले जाते.

सध्याचे कालमापन अणूतील स्पंदनांवरून निश्चित केले गेले आहे. या स्वरूपाची अॅटॅामिक वेळ एक लाख वर्षांपर्यंत काहीही फरक न करता चालेल.या मोजमापांमुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची प्रगती होत आहे. मानवाचे दैनंदिनजीवन हे प्रमाणबद्ध झाले आहे.

प्रत्येक सजीवाच्या जगण्यासाठी हवा, पाणी, जमीन या अत्यावश्यक बाबी आहेत. पाण्याची उपलब्धता किती? शुद्ध हवेचे प्रमाण किती? वातावरणातील फरक का होतात? शेत जमिनीची सुपीकता का बदलते? यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे विज्ञानातील मापन क्रियेशी जोडलेली आहेत.

हवेचा दाब मोजण्याच्या यंत्राला ‘बॅरॅामीटर’ असे म्हणतात. हवेचा दाब ‘मिलीबारमध्ये’ सांगितला जातो. समुद्र सपाटीला १००० मिलीबार इतका दाब सर्वसाधारणपणे असतो.

‘बॅरॅामीटर’ या यंत्राची आवश्यकता मुख्यत: विमानात भासते. विमान जितके उंच उडेल, तितका दाब कमी होत जातो. त्यामुळे ‘हवेचा दाब’ योग्य ठेवून विमान संचार करत असते. ‘बॅरॅामीटर’ या यंत्राची सर्वात जास्त गरज वेधशाळेला आहे. हवेच्या दाबमापानासाठी पाऊस, वादळे, इत्यादींचा अंदाज ठरवण्यासाठी शास्त्राज्ञांचे लक्ष सतत बॅरॅामीटरवर असते.

आता दुसरी अत्यावश्यक बाब म्हणजे पाण्याचा वापर. अंघोळ, दात घासणे इ. व्यक्तिगत गरजा, अन्न शिजवणे, पिण्यासाठी, धुणे-भांडी, बागकाम व इतर स्वच्छता या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक माणसास अंदाजे २५० लीटर पाणी लागते. गेल्या दहा वर्षापासून पाणी टंचाई ही उग्र समस्या झाली आहे. पाण्याचे नैसर्गिक साठे त्यांचे पुनरुज्जीवन यासाठी पाण्याचा वापर मोजूनमापूनकरण्यासाठी विज्ञानानुसार मापन पद्धतीच उपयुक्त आहे.

आणि आता तिसरी महत्त्वाची गरज म्हणजे शेतजमीन व तिची सुपीकता. यासाठी जमिनीतील विविध घटकांचे मापन करून जमिनीची आम्लता ठरवावी लागते. तेही वैज्ञानिक मापनानुसार phमोजूनच करतात.

      विज्ञानातील मोजमापे आपले संपूर्ण जीवन व्यापून आहेत, हे यावरून लक्षात आले असेलच, मुलांनो.. तर आता आपल्या रोजच्या आयुष्यातील या मोज्मापांचे निरीक्षण करा आणि गणित आणि विज्ञान यांची सांगड घालायला शिका.

- रेखा मुळे