इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च (IISER) आणि ब्रिटिश कौन्सिल यांनी एकत्रित आयोजित केलेली "वीमेन इन सायन्स" ही कार्यशाळा १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात पार पडली. भारतातील काही  नामवंत संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्थांमधून आलेल्या सुमारे ५० संशोधक स्त्रियांचा यात सहभाग होता. स्त्रियांचा विज्ञान संशोधनातील  सहभाग वाढावा; तसेच  वैज्ञानिक संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन कार्यपद्धतींची माहिती त्यांना मिळावी, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

भारतात हळूहळू विज्ञान संशोधनात स्त्रियांचा सहभाग वाढत आहे. विशेषतः जीवशास्त्र(Biology), औषधीशास्त्र (Pharmacy), सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), जेनेटिक्स अशा विषयात अनेक स्त्रिया, तरुण संशोधिका  काम करत आहेत. तसेच नव्याने उदय पावलेल्या नॅनो टेक्नॉलॉजी, कॉम्पुटर सायन्स, रोबोटिक्स अशा क्षेत्रातही अनेक जणी उत्तम काम करतात. या कार्यशाळेत प्रामुख्याने जीवशास्त्र आणि लाईफ सायन्सेस या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञ आल्या होत्या. अनेक वेगवेगळे रोग, त्यामागचे जिवाणू-विषाणू, त्यावरील उपचार, नवनवीन औषधे आणि त्यांचे होणारे परिणाम अशा प्रकारचे फार मोलाचे संशोधन या शास्त्रज्ञ स्त्रिया करत आहेत. तसेच नॅनोटेक्नॉलॉजी  या शाखेत काम करणाऱ्या स्त्रियादेखील होत्या. नॅनो ट्यूब्जचा वापर करून औषधे सरळ हव्या त्या अवयवांपर्यंत पोहोचवणाऱ्या पद्धती निर्माण करणे असे संशोधन ही शास्त्रज्ञ मंडळी करत आहेत. सौरऊर्जेचा प्रभावी वापर करणारी उपकरणे आणि त्यांचा अभ्यास करणाऱ्या काही संशोधिकाही कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. आपल्या देशात सांडपाणी आणि त्यामुळे होणारे नद्या, तलाव यांचे प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातील हानिकारक घटक काढून टाकण्याचे अतिशय महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या काहीजणी होत्या. काही स्त्रिया आकाशातून येणारे रेडिओ तरंग प्राप्त करून त्याचे विश्लेषण करून तारे, आकाशगंगा आदींचा अभ्यास करणाऱ्या होत्या. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याचा उपयोग करून रोगनिदान करणारे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या काही इंजिनिअर स्त्रियाही होत्या, या कार्यशाळेत होत्या.

आपल्याला नेहमीच या सगळ्या संशोधकांचं यश पटकन दिसतं, आपण त्यांच्याकडे कौतुकाने पाहतोही, पण संशोधक म्हणून काम करताना त्यांच्या आयुष्याला एक शिस्त असते, ती मात्र आपल्याला वरवरून फारशी दिसत नाही. पण कार्यशाळेत या बाबीही लक्षात आल्या. त्या येथे नोंदवत आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्यालाही अमलात आणता येऊ शकतात.संशोधक म्हणून कामकरण्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते. त्याचबरोबर संशोधन करण्याची योग्य पद्धतही  लागते. सुयोग्य पद्धतीने केलेले काम यशस्वी होते आणि आपल्याला यशही प्राप्त करून देते. शास्त्रीय संशोधन जर प्रयोगाने सिद्ध केलेले असेल तर ते प्रयोग कसे केले, पुन्हा कसे करून पाहता येतील याचीही माहिती द्यावी लागते. त्यावर इतर संशोधक आणि संस्थांची मान्यता मिळवावी लागते. एकदा संशोधन मान्यता पावले की ते सुलभ भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे हेदेखील मोठे काम असते. तेनेटक्या आणि नेमक्या शब्दात मांडावे लागते. अनेकदा काही किचकट माहिती सोपी करून सांगणे कठीण असते. त्यासाठी केवळ तीनच मिनिटात आपले संशोधन लोकांसमोर मांडण्याच्या पद्धती आहेत. प्रश्न, संशोधन, प्रयोग, सिद्धता आणि पडताळा या सर्व पायऱ्यांवर उपयोगी पडतील अशा काही प्रभावी पद्धतींची चर्चाही या कार्यशाळेत झाली.

नुकतेच भारताने विक्रमी संख्येने उपग्रह आकाशात नेऊन सोडले. त्याबद्दल इसरोचे जगभर मोठे कौतुक  झाले. या मिशनमध्ये काही स्त्रियांचा मोठा सह्भाग होता. टेसी थॉमस, मौमिता दत्त, नंदिनी हरिनाथ, रितू करीधल, मीनल संपत, के अनुराधा अशा काहीजणी इसरोमध्ये वैज्ञानिक म्हणून मोठी कामगिरी पार पाडत आहेत.गेल्या काही वर्षांत मेरी कोम, सायना नेहवाल, सिंधू, साक्षी मलिक, फोगट भगिनी, मेरी कोम किंवा सानिया मिर्झा या खेळाडूंची कामगिरी पाहून अनेक मुलींना खेळाडू म्हणून करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. तसेचआता "इसरो"च्या विक्रमी यशात स्त्रियांचा असलेला सहभाग पाहून विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात येण्यासाठी अनेक तरुण मुलींना निश्चित प्रेरणा मिळणार आहे.      

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला उमलते, हुशार आणि मेहनती तरुण-तरुणी हवे आहेत. या तरुण मुलामुलींना विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारचे अनेक उपक्रम आहेत. "डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजी"च्या वेबसाईटवर याउपक्रमांची अधिक माहिती मिळू शकेल. येत्या विज्ञानदिनाला (२८ फेब्रुवारी) तुम्ही देशातल्या वैज्ञानिक संशोधन संस्था आतून पाहू शकता. तेथील संशोधनाची माहिती घेऊ शकता. विज्ञान संशोधनातील आनंद कसा असतो, वैज्ञानिक कसे असतात हे पाहून तुमच्यापैकी अनेक जण संशोधनाची प्रेरणा घेतील याची मला खात्री आहे.

-अपर्णा जोशी

-[email protected]

(लेखिका तंत्रज्ञान सल्लागार आहेत. )