सोपे सोपे गणित

 

“मावशी तू कधी येणार आहेस?“ राधाच्या आवाजातील उत्सुकता फोनवरून सुद्धा अनघाच्या लक्षात येत होती. गणित विषय नावडीचा होता तो तिच्या आवडीचा झाला होता. सुरुवात तरी पाढ्यापासून झाली होती.

“अगं राधा, मी पोचतेच आहे दहा मिनिटात.“

“मावशी, पाढ्यांच्या बेरजेची गंमत दाखवली होतीस ना, तशीच एक गंमत मी दाखवणार आहे तुला.”

अनघाच्या लक्षात एव्हाना आलं होतं की, ती जी गंमत राधाला दाखवणार होती ती तिने स्वतःच शोधून काढली होती. विचार करता करता ती राधाच्या घरी कधी पोचली तिला कळलंच नाही.

राधाने लगेच आपली वही अनघाला दाखवली.

 

 

 

५ –२ = ३

१०

१०–४ = ६

१५

१५–६ = ९

२०

२०–८ = १२

२५

१०

२५–१० = १५

३०

१२

३० - १२ = १८ 

३५

१४

३५ - १४ = २१

४०

१६

४० - १६ = २४

४५

१८

४५ - १८ = २७

५०

२०

५० - २० = ३०

 

 

“अरे वा! राधा, तू तर संशोधक झालीस गणिताची. कसं सुचलं तुला हे?”

“मावशी, अग तू पाढ्यांची बेरीज शिकवलीस तेव्हा ३+२ = ५ म्हणून ३ आणि २ च्या पाढ्यांची बेरीज करून आपण ५ चा पाढा तयार केला होता ना! तेव्हा मला अशी कल्पना सुचली की,५ - २ = ३. मग आपण ५ आणि ३ च्या पाढ्यांची वजाबाकी केली तर! “

“छान,छान! म्हणजे आता१३ चा तुला अवघड वाटणारा पाढा पटकन तयार करता येईल तुला! “

“हो मावशी. अगं १५ च्या पाढ्यामधून २ चा पाढा वजा केला की, झाला१३ चा पाढा तयार. आता आज९ च्या पाढ्याची जादू दाखवणार आहेस ना? “

“दाखवणार आहे तर! आता मी सांगते तसं कर. ० ते ९ अंक एका खाली एक लिही आणि नंतर तेच अंक उलट्या क्रमाने आधीच्या अंकांच्या शेजारी लिही पाहू.”

राधाने० ते ९ अंक लिहिले आणि त्यांच्या शेजारी उलट्या क्रमाने तेच अंक लिहिले

 

 

 

“अय्या मावशी, हा तर ९ चा पाढा तयार झाला.”

“राधा, ९ च्या पाढ्याची अजून एक गंमत आहे. शोध पाहू तू! बघू तुला सापडतीये का?”

राधाने ९ च्या पाढ्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि थोड्याच वेळात तिला ती गंमत सापडली.

“मावशी,९ च्या पाढ्यात ज्या संख्या आहेत ना त्यातील अंकांची बेरीज ९ येतीये. म्हणजे,

०+९ = ९, १+८ = ९, २+७ = ९,३+६ = ९ ........... मावशी, किती मजा आहे ना ९ च्या पाढ्याची.”

“विशेष पाढा आहे हा! एकदम स्पेशल. आता पुन्हा येईन तेंव्हा कोणताही पाढा तयार करण्याची युक्ती दाखवेन तुला.”

“कोणताही म्हणजे अगदी ३० पेक्षा मोठ्या संख्येचा पण का? “

“हो, अगदी ३० पेक्षा मोठ्या संख्येचा सुद्धा.”

“पुन्हा लवकर ये हं मावशी.”

“येईन हं राधा, पण तो पर्यंत ......”

“१५ पर्यंतचे पाढे पाठ करून ठेवायचे.“ राधा अनघाची नक्कल करत म्हणाली.

राधाला आता मावशीची ही अट पाठच झाली होती.

- शुभांगी पुरोहित

 [email protected]