न्यूटनचे नियम

 

 

मुलांनो, आपल्या प्रगतीचा रामबाण उपाय म्हणजे आत्मपरीक्षण. दुसऱ्याने परीक्षण केल्यावर आपले गुण कमी होतात, पण आत्मपरीक्षणाने आपले गुण वाढतात आणि ही क्रिया आयुष्यभर चालायला हवी कारण आपण कधीही चुकू शकतो. म्हणून आज मी तुम्हाला खुद्द न्यूटन या महान शास्त्रज्ञाने ६२व्या वर्षी केलेल्या आत्मपरीक्षणाची गोष्ट सांगत आहे. त्याचे गतीचे नियम तुम्ही नववी, दहावीत शिकालाच असाल किंवा शिकत असाल, त्याच संबंधीची ही गोष्ट आहे. 

 

या बरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की, सध्याचा आघाडीचा शास्त्रज्ञ फ्रॅंक विल्कझेक व नोबेल विजेता, पण त्यालासुद्धा ५० वर्षापूर्वी शाळेत गतीचे नियम शिकणे अवघड वाटले. म्हणून तुम्हीसुद्धा कितीही वेडेवाकडे प्रश्न मनात आले, तरी ते मनात ठेवू नका मोकळेपणाने आम्हालाwww.shikshanvivek.com च्या माध्यमातून नक्की विचारा. आपोआपच तुम्हाला आत्मपरीक्षणाची सवय होईल आणि कोणी रमण, भाभा, कलाम यांसारखे शास्त्रज्ञ तयार होतील व इस्रोने नुकतीच १०० याने आकाशात सोडली, तर ५० वर्षांनी कदाचित तुम्ही २०० याने सोडाल. चला तर आता साठीतल्या न्यूटनने काय केले ते पाहूया. 

 

न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार, एखाद्या पदार्थावर असंतुलित बळ कार्य करत नसेल, तर तो पदार्थ स्थिर असेल तर स्थिर राहतो आणि एक समान गतीने चालत असेल तर तो तसाच चालत राहतो. हा नियम त्याने ४५व्या वर्षी मांडला. पुढे तो जवळजवळ १०/१२ वर्षे शांत बसला होता, अर्थात त्याचे विचारचक्र चालूच असणार; पण त्यानंतर या नियमातील एक अट त्याला खटकू लागली; ती म्हणजे एक समान गतीने चालणारा पदार्थ. त्याच्या मनात प्रश्न आला – अरेच्या!!पण पदार्थ चालायला कसा लागला हे आपल्याला सांगता आले पाहिजे, पण आपण ते केलेच नाही. आता मात्र हे करायला हवे. हा विचार न्यूटनच्या आधी २००० वर्षांपूर्वीअॅरिस्टॉटलच्या मनातसुद्धा आला होता. न्यूटन म्हणायचा की, “मी आधीच्या विचारवंतांच्या खांद्यावर उभा आहे, म्हणून मला आज पुढचे संशोधन करता येते.”

 

अर्थात न्यूटन व अॅरिस्टॉटल यांचे विचार काही बाबतीत अगदी भिन्न आहेत, पण निदान वरील विचारात साम्य दिसते व यात न्यूटनचा प्रामाणिकपणा व विलक्षण आत्मपरीक्षणसुद्धा दिसते. हे त्याचे गुण तुम्ही सुद्धा अंगी बाणवा. त्यातून आपण मानव म्हणून घडत जातो आणि आपल्या विचारांना, आपल्याला अभ्यासाला एक दिशा मिळत जाते.

 

आता काही वाचकांना प्रश्न पडेल की, मला ही माहिती कशी मिळाली. उत्तर सोपे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालयात जायचे, ग्रंथपालांची परवानगी काढायची आणि अमेरिकन जर्नल ऑफ फिजिक्सचा जानेवारी १९८४ चा अंक काढायचा, त्यातले प्रा. अँटनी फ्रेंच यांचे पत्र वाचायचे. वाटलं तर फोटोकॉपी काढायची आणि आपल्या संग्रही ठेवायची.

 

लेखक - दिलीप वि. साठे /निवृत्त उच्च - माध्यमिक शिक्षक 

भ्रमणध्वनी ९४२२३२१६६३ ई-मेल: [email protected]