भाषेतून स्व-ओळख

दिंनाक: 22 Feb 2017 14:59:22
भाषा शिकणं म्हणजे संस्कृतीची ओळख करून घेणं

 

     ‘भाषा’ हे संवादाचं एक प्रमुख माध्यम आहे. भाषा शिकणे म्हणजेच ती संस्कृती शिकणे. खूप लहानपणीच आसपास बोलल्या जाणाऱ्या भाषा आपण नकळत शिकत असतो. पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे आणि विद्यार्थ्यांनी याचे विश्लेषण स्वत:च करायला हवे. या अनुभवरूपी लेखातली देवयानी हेच सांगत आहे.

      साधारण ११ वीत असताना ‘जर्मन’ ही परकीय भाषा मी शिकायला सुरुवात केली. मी कला शाखेत असल्याने तसे सगळेच विषय विचारांना चालना देणारे होते, पणजर्मन या भाषेच्या बाबतीत काहीतरी वेगळेच घडले. जर्मन शिकताना पहिली काही (म्हणजे १/२ ) वर्षे तसे त्या भाषेशी नातं तयार व्हायलाच लागतात. मुळात ते मी स्वेच्छेने निवडले नव्हते, माझ्या कॉलेजमधल्या शिक्षकांनी मला तो विषय घ्यायला लावला होता. पण जसे जसे मी जर्मन सोबत वेळ काढू लागले, अजून खोलात ती भाषा शिकायला लागले, तसेतसे मी केवळ ती भाषाच नव्हे तर त्या भाषेतील शब्दांच्या आणि व्याकरणाच्या पलीकडचे जग अनुभवू लागले आणि आता माझ्यासाठी जर्मन हे फक्त एक परकीय भाषा न राहता दुसरी मातृभाषा झाली आहे,असे म्हणायला हरकत नाही.कारण आता मी याच भाषेत करिअर करायचे ठरवले आहे.

    माझ्या मतानुसार एखादी भाषा शिकणे म्हणजे एक नवीन आयुष्यच जगण्यासारखे आहे. तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण ‘भाषा’ या एका संज्ञेत आयुष्यातल्या खूप गोष्टी दडलेल्या आहेत. भाषा ही संवादामधली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी मानव शारीरिक आणि चेहऱ्याच्या हालचालींमधून विचारांची व भावनांची देवाण-घेवाण करायचा, मग त्याने स्वतःची अशी बोली भाषा निर्माण केली. त्यात वाढ होऊन मानवाने गरजेनुसार अनेक भाषा निर्माण केल्या आणि आजच्या काळात साधारण अंदाजे ८० ते ९०,००० भाषा अस्तित्वात आहेत. हे सर्व सांगण्यामागील कारण असे की, जर्मन शिकताना असेच काहीसे अनुभव मी घेतले. म्हणजे लहान मूल पहिल्यांदा बोलायला लागल्यावर त्याला काय वाटत असेल, कसे वाटत असेल हे आम्ही अनुभवतो. एखादी भाषा शिकणे म्हणजे काय, तर त्यादेशातील संस्कृती, आचार-विचार, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, माणसं, त्यांच्या सवयी हे सर्व शिकावे लागते. म्हणजे हे नवीन आयुष्य जगल्यासारखेच नाही का?

      परकीय भाषा शिकताना सर्वात पहिले आपल्या विचारांवर प्रभाव पडतो. अगदी घरातल्या छोट्या गोष्टीपासून ते जगभरातल्या गोष्टी व त्यामागील विचार हे आपल्यापेक्षा किती वेगळे आहेत, याची जाणीव होते. माहीत असणे व जाणीव होणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यातून हे कळून चुकते की, ‘मानव’ कुठेही गेला तरी सारखाच असतो. त्याच्या भावना या सारख्याच असतात. परकीय देशातील आणि (माझ्या बाबतीत) जर्मनीमधील विविध सण, त्याचा इतिहास; तसेच त्या देशातील रूढी, परंपरा, चाली-रिती यांवरून त्या देशातील विचारपद्धती लक्षात येते. आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो. माणसाची विचारक्षमता रुंदावते. माणूस नवीन गोष्टींचा स्वीकार करायला शिकतो. एखाद्या भावानेकडे वेगवेगळ्या पैलूंनी बघायची सवय माणसाला लागते. उदा.,जर्मनीमधील शैक्षणिक पद्धत वेगळी आहे. तसेच त्या देशात शिक्षण फुकट किंवा कमी खर्चात होते. तसेच स्वच्छता, शिस्त यापेक्षा जर्मनी आपल्या देशाहून खूप पुढे आहे किंवा शिक्षकांना ‘एकेरीत’ संबोधण्याची पद्धत आपल्याकडे नाही, पण जर्मनीत आहे. त्यामागील विचार असा की, एकेरी संबोधण्याने मनातली भीती, नात्यामधील अंतर कमी होते व मुलं आणि शिक्षकांमध्ये मैत्रीची भावना निर्माण होते. अशा एक ना अनेक गोष्टी परकीय भाषा शिकताना बघायला मिळतात. कही गोष्टी अशाही आहेत, ज्या परकीय देशात नाही, पण आपल्या देशात आहेत. उदा., शेजारधर्म, कुटुंबसंस्थ. त्यामुळे आपल्या देशातल्या या रूढी–परंपरांची जाणीव आपल्याला होते. थोडक्यात काय तर, परकीय भाषा शिकणे म्हणजे स्वतःबद्दल अधिक शिकणे.

language is the limit! 

 -देवयानी फडणीस