मुद्रण कलेचा इतिहास

 

 मौखिक परंपरेच्या जोरावरच आपल्याकडे साहित्यादी गोष्टींची निर्मिती होत होती. लिखित परंपरेचा वारसा मात्र खूप नंतरच्या काळात अस्तित्वात आलेला दिसतो. जेव्हा कागद अस्तित्वात नव्हते, तेव्हा मानव आपल्या मनातील भावभावनांचे, आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टींचे चित्रण दगडांवर कोरून करत असे. काळाच्या ओघात, इ.स. ४०० च्या दरम्यान कोऱ्या शिक्क्यांच्या ठिकाणी काजळाच्या शाईचा वापर करून त्याचे शिक्के काढले जाऊ लागले. यानंतरच्या काळात ताडपत्रीवर किंवा झाडांच्या सालींवर, पानांवर बोरू, जांभळाचा रस, काजळी यांच्या साहाय्याने लिखाण केले जाई. दस्ताऐवजीकरणाची गरज जशी वाढत गेली, तसे लिखाणाच्या साधनांमध्ये बदल होत गेले. म्हणूनच काजळीची जागा शाईने घेतली, ताडपत्रीची जागा कागदाने घेतली आणि बोरूच्या जागेवर छपाई यंत्रे आली. एकूणच काय, तर यांत्रिक उत्क्रांती झाल्यावर छपाई तंत्रांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल होत गेले. २१व्या शतकात तर संगणक नामक ‘जादूच्या दिव्याने’ छपाई क्षेत्रात आमूलाग्र बदल केला.

चल खिळ्यांचा शोध : ‘बी शांग’ नावाच्या चिनी किमयागाराने इ.स. १०४१ ते ४८ या कालखंडामध्ये मुद्रणासाठी ‘चल खिळे’ तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन छपाईचे तंत्रज्ञान विकसित केले. चिकण माती व डिंक यांचे मिश्रण करून अक्षराचा खिळा तयार केला जाई. हा खिळा भाजून पक्का करण्यात येत असे. अशा प्रकारे तयार केलेले खिळे जुळवून त्यांच्या ओळी तयार करण्यात येत असत. एका लोखंडी पत्र्यावर राळ (राळधूप नावाच्या वृक्षाच्या खोडातून येणारा द्रवरूप पदार्थ), मेण व कागदाची राख यांचा थर पसरवून त्यावर अक्षरे ठेवून पत्रा गरम करून, तो थंड होइपर्यंत ठेवला जाई. यामुळे अक्षरे सरळ ओळीत आणि एकत्र राहत असत. या ओळींवर शाई लावून त्यावर कागद दाबून त्याचे मुद्रण केले जाई. नंतर हा पत्रा पुन्हा गरम करून सर्व अक्षरे सोडवून घेतली जात. या अक्षरांचा पुन्हा पुन्हा उपयोग करता येत असल्याने त्यांना ‘चल खिळे’ असे म्हटले जाई.

पहिले छपाई यंत्र : चीनप्रमाणेच इतर देशांमध्येही मुद्रणासंबंधित संशोधन आणि नवनवीन प्रयोग अनेक दशके सुरूच होते. साधारणत: १४४० मध्ये जर्मनीच्या ‘जॉन गटेनबर्ग’ यांना सर्वप्रथम मुद्रणयंत्र बनवण्यात यश आले. गटेनबर्ग यांनी अक्षरांचे ठसे बनवून ते दाबयंत्राच्या साहाय्याने दाबून पहिली छपाई केली. छापण्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची शाईही त्यांनीच सर्वप्रथम तयार केली. वितळवलेल्या तप्त धातूंपासून शिस्याच्या अक्षरांची खिळे पाडणारी व हाताने चालवता येणारी भट्टही त्यांनीच बनवली होती.

भारतात मुद्रण कलेची सुरूवात : इ.स. १५५० मध्ये भारतात मुद्रणाला सुरुवात झाली. पोर्तुगाल मिशनने धार्मिक पुस्तके छापण्यासाठी गोव्यात सर्वप्रथम छपाई कारखाना सुरू केला आणि १९५६ साली ‘केटेशिमो-डी-डाक्ट्रिन’ हे पुस्तक या कारखान्यात छापून प्रकाशित केले. यानंतर भारतात छपाई कलेचा विस्तार होत गेला आणि १८व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भारताच्या सर्व प्रमुख शहरांत छापखाने सुरू झाले होते. संगणकापूर्वी भारतात ‘लेटर प्रेस’ ही पद्धती अधिक लोकप्रिय होती. मुद्राक्षरे जुळवून मुद्रण केले जात असे. यामध्ये मुद्राक्षरांच्या तळाचे अक्षर उलटे असते. त्याला शाई लावल्यावर ते कागदावर सुलटे उमटत असे. यामध्ये देखील प्लॅटनयंत्र, सिलिंडर प्रेस, रोटरीयंत्र असा विकास होत गेला. लिथोग्राफी हा छपाईतला आणखी विकसित प्रकार. यामध्ये तीन रोलरच्या साहाय्याने छपाई केली जाते. ऑफसेट पद्धती ही लिथोग्राफीची सुधारित आवृत्ती. शाईची बचत, कमी मनुष्यबळ, स्वच्छ व आकर्षकपणा आणि कमी वेळात अधिक छपाई होत असल्याने ऑफसेट पद्धती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ऑफसेट छपाई आणि संगणकाने मुद्रणक्षेत्रात क्रांती केली आहे. टेबलाएवढ्या जागेत आज मुद्रणातील मोठ्यात मोठे आणि आकर्षक काम करणे सोपे झाले आहे. अलीकडच्या काळात भारतात डिजीटल मुद्रण प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आपण जी मोठमोठी प्लास्टिकची पोस्टर्स, बॅनर्स पाहतो, त्यासाठी डिजीटल मुद्रण पद्धतीचा वापर केला जातो. संगणकीय पद्धतीने अक्षरजुळणी करून मोठ्या आकारातील छपाई याद्वारे केली जाते.

१०४१ पासून आजतागायत मुद्रण कलेमध्ये सातत्याने विकास होत गेला. लाकडाची जागा हळूहळू लोखंडाने घेतली. हातांच्या साहाय्याने चालणारे यंत्र वाफेवर चालू लागले. इ.स. १८४९ मध्ये या यंत्रांना गती देण्यासाठी विजेचा वापर होऊ लागला. विजेवर चालणाऱ्या छपाईयंत्रामध्ये देखील विकास होत गेला. ऑफसेट प्रिंटिंगने तर ‘ना भूतो ना भविष्यति’ अशी क्रांतीच केली. रोजचे वर्तमानपत्र हे अशाच प्रक्रियेतून छापले जाणारे मुद्रित साहित्याचे उत्तम उदाहरण आहे. आज आपण विविध विषयांची पुस्तके, मासिके, ग्रंथ, पत्रके वाचू शकतो, ते केवळ मुद्रण क्रांतीमुळे.

- सायली नागदिवे