विज्ञान ऋग्वेदातले  
 
 

 

 दचकलात ना हे शीर्षक वाचून? आपण स्वतःची एक भ्रामक समजूत करून घेतलेली असते की, ते वेदांसारखे प्राचीन ग्रंथ आपल्याला कळणार नाहीत. अगदी चुकीची कल्पना धर्म-तत्त्वज्ञान-संस्कृतीपासून ते पार खगोल ज्योतिषशास्त्रापर्यंत सगळं काही आपल्याला या वेदात सापडतं, विशेषत: ॠग्वेद संहितेमध्ये.

     वैदिक वाडःमयाच्या अवाढव्य पसाऱ्यातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ म्हणजे ॠग्वेद संहिता. फक्त आपल्याच नव्हे, तर संपूर्ण जगातल्या वाडःमयातला ‘ॠग्वेद’ हा प्राचीनतम ग्रंथ आहे. साधारणपणे, इ.स.पू. २५०० मध्ये म्हणजे आजच्या पेक्षा ४५०० वर्षांपूर्वीच्या वाडःमयातलं विज्ञान तुम्ही समजून घेणार आहात.

     या ॠग्वेदात अग्नि, इंद्र, उषा, सविता, पाऊस, यज्ञ, विवाह; इतकंच काय, पण अगदी नृत्यक्रीडेबद्दलही लिहिलं गेलंय. ॠग्वेदातल्या एकेका मंत्राला म्हणायचं ऋचा आणि अनेक ॠचाचं मिळून जे बनतं ते सूक्तः म्हणजे कविताच. अर्थात, या सुक्तात काही शास्त्र आणि विज्ञानाचे धडे नसताता दिलेले. पण काही उल्लेख, काही संदर्भ, असे मिळून आपल्या समोर तत्कालीन समाजचित्र उभं करतात.

     त्यात मग हातात वज्र वगैरे शस्त्र घेऊन रथातून वेगाने जाणारे योद्धे येतात. म्हणजे, रथ तयार करण्यासाठीचं सुतारकाम काम, त्यासाठी लागणारी धातूची हत्यारं आणि ती हत्यारं आणि रथाची चाकं, आरे किंवा अगदी धनुष्यबाण बनवण्यासाठी लागणारं धातुशास्त्र (metallurgy) त्यांना माहीत असलंच पाहिजे. यज्ञ व्हायचे, त्यात निरनिराळी पात्रं लागायची, वेगवेगळ्या आकाराच्या पळ्या लागायच्या. म्हणजे आलंच पुन्हा धातुशास्त्राचं ज्ञान.

     स्त्रियांच्या आणि काही प्रमाणात, पुररुषांच्याही दगिन्यांचा उल्लेख येतो. म्हणजे, सोनं काढणं, शुद्ध करणं, त्यात इतर धातू योग्य प्रमाणात मिसळून मग अलंकार करणं, यातल्या प्रत्येक टप्प्यांवर धातुशास्त्राच्या आणि इतर विज्ञानाचा हात धरूनच पुढे जावं लागतं. स्त्रिया बारीकशा सुईनं कपड्यावर भरतकाम करतात, असे उल्लेख आहेत. त्यात त्या कधीकधी साधा धागा, तर कधी कधी खऱ्या जरीने, म्हणजे सोन्याच्या बारीक तारेने भरतकाम कराचच्या. ४५०० वर्षांपूर्वी, अशी इतकी बारीक सोन्याची तार (तीही न मोडणारी!) काढणं आणि त्यासाठी लागणारी बारीकशी सुई बनवणं, या प्रक्रियेमागचं विज्ञान आता येतंय ना लक्षात?

     यज्ञासाठी निरनिराळ्या आकाराची अग्निकुंड असत. एका यज्ञासाठी तर कधी ससाणा, कधी चक्र, कधी चौरस असे निरनिराळे आकार असत. यातला बांधकामाचा भाग ठीकच आहे. पण यातली मेख अशी होती की, ससाणा असो वा चक्र वा चौरस-सगळ्याचं क्षेत्रफळ एकच विशिष्ट असायचं म्हणजे, गणित, भूमिती  trigometery ही सारीच शास्त्र किती प्रगत असली पाहिजेत याची कल्पनाच करवत नाही.

     गणिताच्या बाबतीत तर वैदिक संस्कृती पार पुढे गेलेली होती. कारण, खगोल ज्योतिष astrophysics हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय गणिताशिवाय पुढेच सरकणार नाही. तुम्हाला माहिती आहे की, १४ व्या शतकापर्यत पाश्चिमात्य देशांत अशी कल्पना घेती की, पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो! पण आपल्याकडे अगदी वैदिक काळातही पक्कं माहीत होतं की, सूर्याभोवती पृथ्वी फिरते. एका ॠचेत म्हटलंय, ‘आपल्याकडे रात्र असते, तेव्हा सूर्यकिरण कुठे बरं प्रकाश देत असतात? पृथ्वी, चंद्र यांची गती त्यांना माहीत होती. प्रत्येकातलं अंतर ठाऊक होतं. त्यासाठी त्यांच्याकडे कोणती साधनं होती, दुर्बिणी वगैरे होत्या का? त्यांनी ती प्रचंड गणित कशी सोडवली? कशी मांडली? दुदैवाने त्या कशाहीबद्दल आता माहिती मिळत नाही. पण चांद्रमास आणि सौरमास, या दोन कालगणना निश्चित चालू होत्या. त्या दोन्हीतला फरक मिळवण्यासाठी दर 3 वर्षांनी येणारा ‘अधिक महिना’ ॠग्वेदात ‘मरिम्लुच’ नावाने येतो. कृतिका वगैरे काही नक्षत्रांची नावं येतात. त्यावरून तर त्यांचं खगोलविषयक ज्ञान पुरेपूर लक्षात येतं. ॠग्वेदानंतर येणाऱ्या यजुर्वेदात तर सगळया सत्तावीस नक्षत्राची नावं येतात!

     याहून कमालीची गोष्ट म्हणजे अत्रि ॠषींनी ॠग्वेदात चक्क सूर्यग्रहणाचा उल्लेख केलेला आहे. सूर्यावर तमस म्हणजे काळोख किंवा सावली पडते, असा स्पष्ट उल्लेख आहे. पाश्चात्य जगातही ‘सूर्यग्रहणाचा सर्वात पहिला उल्लेख भारताच्या ॠग्वेद नावाच्या जुन्या ग्रंथात आढळतो’, असं सांगितलं जातं. पण आपण भारतीय असे करंटे की, आपल्याला मुळी आपल्या या समृद्ध वारशाची कल्पनाच नसते.

     पण आता, थोडक्यात का होईना, पण तुम्हांला कल्पना आली असेल की, आपल्या ॠग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथात इतर विषयांबरोबरच विज्ञानही आलेलं आहे. त्याचा नसता अभिमानच धरू नका. ते इतरांपर्यत पोचवा आणि जमेल तेवढी तुम्हीही त्याची ओळख करून घ्या.

 

                                                - सुचेता परांजपे

                                                 [email protected]