निसर्गाची किमया

 निसर्गाबद्दलची आवड थोड्या-बहुत प्रमाणात सर्वांमध्ये असते. त्याप्रमाणे लोक त्याचा आनंदही लुटतात. काहींना निसर्गाबद्दल मर्यादित आवड असते, किंबहुना ती मर्यादा आपणच स्वतःला घालून घेतलेली असते. मर्यादा म्हणजे , आपला Focus ठरलेला असतो,की निसर्गात आपल्याला काय पाहायचं आहे आणि काय नाही. उदाहरणार्थ, जंगलामध्ये गेल्यावर वाघ दिसलाच पाहिजे. तो नाही दिसला तर सगळं व्यर्थ. कधी कधी निसर्गाची परिभाषाही ठरलेली असते. काहींना निसर्ग फक्त समुद्र वाटतो, काहींना फक्त डोंगर वाटतो, तर काही लोकांना एखादे छोटे डबके किंवा एखादी पाणथळ जागा पण भावून जाते. तुम्ही त्याकडे काय दृष्टीने पाहता यावर सर्व अवलंबून असते. कारण निसर्गाकडून तुम्ही अपेक्षा ठेवू शकत नाही. पण तशी अपेक्षा आपण ठेवतो आणि निसर्गदर्शनाला गेलो की आपला भ्रमनिरास होतो. लोक जंगलामध्ये फिरताना ठरवतातच की  आम्हाला फक्त वाघ बघायचा आहे आणि तो नाही दिसला तर चेहेरे उतरतात. कारण डोळे आणि मन पूर्ण वेळ फक्त त्याच एका प्राण्याचा शोध घेत असल्यामुळे बाकी काही दृष्टीपथास पडतच नाही. इथे हिंडताना डोळस नजरेनी पाहावं लागतं. कधी काय समोर दिसेल याची शाश्वती नसते.

जंगलामध्येच नव्हे तर सर्वत्र प्राण्यांचा अधिवास (Habitat) ठरलेला असतो.

गवताळ प्रदेशातही विशिष्ट पक्षी आढळतात

(Grassland) गवती कुरणं/ माळरान याठिकाणी कोल्हे, लांडगे, चिंकारा, तरस हे प्राणी आणि पक्षांमध्ये विविध प्रकारचे (Larks)चंडोल, (Courser) धाविक, (Pipits) तीरचिमणी, (Francolins) तित्तिर, (Hoopoe) हुदहुद, (Shrike) खाटिक, (Stonechat &Bushchat) गप्पीदास यांसारखे अनेक पक्षी दिसतात.

पाणथळजागांमध्येही  पक्षी 

 (Coastal area) समुद्राच्या ठिकाणी तर फारच विविधता दिसते. बहुतेकदा तटांवर समुद्री गरुडांची (White-bellied sea eagle) आणि समुद्री घारींची (Brahminy kite) घरटी असतातच. (Sandpipers) तुतारी, (Stints) तिलवा, (Curlews) कोरल असे अनेक पक्षी दिसतात. पण समुद्रावर गेल्यावर यांच्याकडे लक्षच जात नाही किंवा त्यात आपल्याला काही स्वारस्य नसतं. 

(Wetland) पाणथळजागांमध्ये (Egrets) बगळे, (Herons) ढोकरी, (Kingfisher) धीवर, (Storks) करकोचे, (Lapwing) टिटवीयापेक्षा कित्येक स्थलांतरित पक्षी (Migratory Birds) दिसतात.

(Rocky Areas) खडकाळ जागी बिबट्या, तरस असे प्राणी आणि (Indian Eagle Owls) मोठ्या आकाराची घुबडे, (Nightjar) रातवा असे काही फारसे माहीत नसलेले पक्षी दिसतात. कुठेही बाहेर गेल्यावर हे अधिवास आपल्यासमोर येतातच, पण तेव्हा आपण ‘याच्यात काय पाहायचंय’ असं म्हणून पुढे निघून जातो.

घनदाट अरण्य

धबधबा दिसला की, त्या पाण्यात कधी डुंबतो असं होतं. पण थोडा वेळ शांत बसून तिथेच निरीक्षण करत बसायचं ठरवलं, तर आपल्याला कळतं की हा धबधबा म्हणजे निव्वळ पाणी नसून कितीतरी वन्यजीवांचा अधिवास आहे, ज्याच्याभोवती त्यांचं जीवन फुलतं, समृद्ध होतं. आपण आवाज करता किंवा आपलं अस्तित्व जाणवू न देता बसलो ना तरी आपल्याला पक्षांचे एक अनोखे विश्व पाहायला मिळेल. सर्व प्राणी-पक्षांच्या अगदी साध्या पाणी प्यायच्या, अंघोळीच्या पद्धतीमध्येसुद्धा खूप विविधता आहे. Purified Water पिणारे आपण हे विसरतो की अशा धबधब्याचं पाणी पर्वतावरून येत असताना खडकांमधून आपोपाप Purify होऊनच येत. निसर्गाने निर्माण केलेल्या purifierमधून, जिथे चुकीला जागाच नाही. जेव्हा असं निरीक्षण करतो ना तेव्हा कळत की, या पाण्यात कोण कोण येऊन गेलंय. तरीही ते पाणी प्यायल्यावर आपल्याला बाधत नाही हीच तर निसर्गाची खरी किमया आहे. एकदा का हे सगळं अनुभवण्याची सवय किंवा आवड निर्माण झाली ना की, मगच त्यातली खरी गंमत चाखता येते. त्यामुळे भरपूर फिरा.. निरपेक्ष फिरा, जे समोर येईल ते पाहा त्यातला आनंद मिळवायचा प्रयत्न करा आणि मग बघा निसर्ग किती जवळचा वाटतो ते !

-अमोल बापट 

[email protected]