सूर्यनमस्काराचे महत्त्व

 

 

''ए आई नको गं... रोज रोज काय तो व्यायाम करायचा? मला नाही आवडत गं. रोज सक्काळी सक्काळी उठवतेस आणि सूर्यनमस्कार घालायला सांगतेस. मला झोपायचं असतं ना!'' - आदित्य अंथरुणातच बडबडत होता. 

पूर्वेकडे सूर्य उगवणं, घडयाळाचा गजर आणि आदित्यचा आईबरोबरचा हा संवाद ठरलेलाच. एकवेळ घडयाळ गजर करायला विसरेल, पण आदित्यचा कटकटीचा नेम काही चुकायचा नाही. साहजिकच आहे म्हणा. ‘तारे जमीन पर’मधल्या ईशानसारखं मस्तपैकी उशिरापर्यंत ताणून द्यावं असं कोणालाही वाटेल. उशिरापर्यंत झोपण्याचं काय मस्त फिलींग असतं माहितीये, कुण्णाला सांगून कळणार नाही. पण तरीही घरात आई-बाबा रोज व्यायाम कर, व्यायाम कर म्हणून मागे लागतात, हो ना?

आदित्यच्या घरात खूप वर्षांपासून एक प्रथा आहे. प्रत्येकाने उठल्यावर आपापल्या वयाप्रमाणे व्यायाम करायचा आणि सूर्यनमस्कार घालायचेच. आदित्यचे बाबा, आजोबा, आई, मोठा भाऊ सूरज सगळेच अगदी आवडीने सूर्यनमस्कार घालतात. त्याचे आजोबा तर आजही पैज लावतात नमस्कार घालण्याची. आदित्यसारखी अनेक घरात सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत असते. भारतात सूर्यनमस्काराला एवढं महत्त्व का त्याचा विचार अशा वेळी मनात डोकावतोच.

सूर्यनमस्काराला सर्वांगसुंदर व्यायाम असं म्हटलं जातं. सर्वांग आणि सुंदर या व्याख्येतच सर्व काही येतं. जो व्यायाम केल्याने आपलं सर्वांग शरीर-मनासह आरोग्यपूर्ण होतं तो सूर्यनमस्कार. तुम्ही शाळेत सूर्यनमस्कार शिकला असालच. छातीशी हात जोडलेल्या स्थितीत सुरू होणारा हा नमस्कार एका चक्रासारखा पुन्हा हात छातीशी जोडून संपतो. दरम्यानच्या काळात आपण जी शारीरिक कसरत करतो, तिचा प्रत्येक टप्पा म्हणजे एक एक स्वतंत्र योगासन आहे. सूर्यनमस्कार हा अनेक योगासनांचा समुच्चय आहे. प्रणामासन, हस्त उत्तानासन, उत्तानासन, अश्व संचालनासन, चतुरंग दंडासन, अष्टांग नमस्कार, भूजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्व संचालनासन, उत्तानासन, हस्त उत्तानासन, प्रणामासन या योगासनांचा सूर्यनमस्कारात समावेश होतो. या वेळी विशिष्ट पद्धतीने श्वास-उच्छवास केला जातो.

आपल्या शरीराला सूर्यनमस्काराचे अनेक फायदे होतात. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते, त्यामुळे चेहऱ्यावर तेज येतं, शरीर लवचिक होतं, पाठीचा कणा बळकट होतो, शरिरातील मेंदू-मान-हृदय-स्वादुपिंड-आतडं-जठर-पाय अशा डोक्यापासून पायापर्यंत सर्वच अवयवांची कार्यक्षमता वाढते. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना येणारा ताणाचं व्यवस्थापन होतं, मेंदूची कार्यक्षमता वाढते, पचन सुधारतं, पोट सुटत नाही, वजन नियंत्रणात राहतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य सुदृढ राहतं, उगीचच होणारी चीडचीड कमी होते, सकाळी उठल्या उठल्या नमस्कार घातले तर आळस निघून जातो आणि दिवसाची उत्साहपूर्ण सुरुवात होते, असे सूर्य नमस्काराचे एक ना अनेक फायदे आहेत. घरात नमस्कार घालण्याऐवजी घराबाहेर अंगणात मोकळया हवेत सूर्यनमस्कार घातले तर 'ड' जीवनसत्त्वाचा भरपूर पुरवठा आपल्याला होईल आणि हाडंही बळकट होतील आणि त्याचा दूरगामी परिणाम उतारवयात दिसून येईल.

सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम का म्हणतात ते आता तुम्हाला समजलं असेल ना? आई-बाबा, आजी-आजोबा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्यावर कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया देण्याआधी त्यामागची कारणं समजून घ्यायला शिका विद्यार्थी मित्रांनो. ते आपल्या फायद्यासाठीच सांगत असतात. बघा ना! सूर्यनमस्कारासारखा साधा व्यायाम; पण त्याचे फायदे आपल्याला आयुष्यभर पुरणारे आहेत. तेव्हा आदित्यसारखा कंटाळा करू नका.

माझी एक भाची लहान असताना कावळयाचं एक बडबडगीत म्हणायची,

‘अंगोळीचा मज तंताळा म्हणूनच आहे ताळा ताळा...’ अंघोळीचा कंटाळा केल्यामुळे कावळा आयुष्यभर काळा तो काळाच राहिला. त्याच्यासारखा तुम्ही व्यायामाचा ‘तंताळा’ केलात तर तुम्हालाही आयुष्यभर सुदृढ आरोग्याला मुकावं लागेल. त्यामुळे आजपासूनच सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करा आणि आईबाबांना चकित करा!

- मृदुला राजवाडे

[email protected]