पालक म्हणून घडताना.. कार्यशाळा

 

पालक म्हणून घडताना ...

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवाण्याच्या आव्हानाला पालक स्वतः सामोरे जात असतात, त्यात मुलानाही घडवण्याची एक मोठी जबाबदारीही पालकांवर असते. पालकांनी मुलांशी कसे वागावे? याचे अनेक सल्ले पालकांना ऐकायला मिळतात. हे सल्ले गर्भाधारानेपासूनच सुरू होतात. अमुक एक स्तोत्र म्हण, सकारात्मक विचार कर, वगैरे. ही यादी वाढतच जाते.

हल्ली आईबरोबरच वडीलही मुलांच्या वाढीमध्येसक्रिय सहभाग घेताना दिसतात. एक काळ असा होता की, मुलांनी मोठ्या माणसांसारखा वागणे अपेक्षित असे. हळूहळू मुलांच्या बाल्यावस्थेतील गरजा वेगळ्या असतात, असे लक्षात आल्यावर त्यांच्या गरजेनुसार अभ्यास सुरू झाला. पालकांना मिळणाऱ्या विविध सल्ल्यांचा उपयोगहोतोच असे नाही. कारण त्याला बरेचदा शास्त्रीय आधार नसतो. हे सल्ले बरेचदा कानगोष्टीसारख्या असतात. एक जण एक शब्द सांगतो तो पुढच्याला सांगत जायचा असतो आणि शेवटचा तो शब्द सांगतो तेव्हा तो वेगळाच निघतो. तसेच काहीसे या सल्ल्यांच्या बाबतीत असते. एक पालक एखादी युक्ती करून पाहतात त्यांच्या घराची परिस्थिती, घटना वेगळीच असते. त्यांना ती युक्ती लागू पडली म्हणून आपल्याला पडेलच असे नाही. आपण जे सल्ले ऐकतो त्याचा मुलांवर काय परिणाम होतो? हेही तितकेच महत्त्वाचे असते. आता हा अपेक्षित परिणाम मुलांनी माझ ऐकलं पाहिजे, असा असेल तर. त्या फक्त तात्पुरता विचार करून वापरलेल्या युक्त्या असतात.

जेव्हा मूल लहान असते तेव्हा त्याचे विश्वही लहान असते. आई, बाबा, आज्जी, आजोबा असे कुटुंबापुरातेच मर्यादित असते. मग हळूहळू ते वाढत जाते. मुले शाळेत जाऊ लागतात. शाळेची इमारत, शिक्षक, नवीन मुले या सगळ्यांशी जुळवून घ्यायचे आव्हान मुलांसमोर निर्माण होते. हे मुलांना आव्हान असते तसे पालाकांनाही असते, मुलांना शाळेत जायचेच नसते, मग त्यासाठी आवरणेही मुले टाळू लागतात. शाळेचा गणवेश बघितल्यावरच, मुले ‘नको’ म्हणून रडू लागतात. शाळेत सोडताना मग हळूच पालकांकडून सांगायला सुरुवात होते; “आज शाळेत रडला नाहीस ना तर घरी आल्यावर गोळी देईन.” अशी प्रलोभने देणे पुढे चालू होते आणि चालूच राहते. घटना फक्त बदलतात. “आत्ता एवढं पान लिहून काढालसंतर T.V. बघून देईन.” अशा प्रकारे मुलांनी ऐकावे म्हणून नाना प्रकारच्या युक्त्या पालक वापरत असतात.

प्रत्येक पालकाचा मूल वाढवताना वेगळा विश्वास मनात असतो.काही पालकांना वाटते की, मुलांना कायम समजावून सांगावे. काही पालकांना वाटते शिक्षा केल्याशिवाय, धाक दाखवल्याशिवाय मुले ऐकत नाहीत. काही पालकांना वाटत मुलाला अजिबात लागू नये, ते पडू नये म्हणून ते मुलाला खूप जपतात. सगळीकडे त्यांच्याबरोबर राहतात. बागेमध्ये बरेच पालक घसरगुंडीवर चढून खाली येतात बागेचा रक्षक मागून ओरडत येतो. पालकांनी वर चढणं अपेक्षित नसतं म्हणून. काही पालकांचा समज असतो, मुलाला आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. अजिबात त्याचा वेळ वाया जाता कामा नये.म्हणून त्यांना वेगवेगळे क्लास, activity center, ground येथे सहभागी होण्यासाठी आग्रह धरतात. आपापल्या वृत्तीनुसार पालक वागत असतात, मुलांना वाढवत असतात. पण त्याचवेळेस आपण करतो आहोत ते बरोबर की चूक? याचे काय परिणाम होतील असे अनेक प्रश्नही पालकांच्या मनात असतात. या सगळ्या प्रश्नांना, पालकांच्या मनात निर्माण झालेल्या गोंधळाला एक शास्त्रीय बैठक मिळावी म्हणून शिक्षणविवेक आयोजित करत आहे, “पालक म्हणून घडताना...” ही कार्यशाळा.